आणि ती आई झाली..
भाग - १०
आस्थाला सातवा महिना सुरू होता. प्रसादचे आई बाबा आस्थाची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे राहिले होते. प्रसाद त्याच्या उद्योगाच्या व्यापात व्यस्त झाला होता. प्रसादची आई आस्थाची काळजी घेत होती. पथ्यपाणी जपत होती. दोघी सासू सुना अगदी मायलेकीं सारख्या गुण्यागोविंदाने राहत होत्या.
एक दिवस दोघीजणी गप्पा मारत बसल्या होत्या. आई तिच्या जुन्या आठवणी सांगत होती.
“आई, तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली ओ?”
“पुढच्या महिन्याच्या आठ तारखेला पंचवीस वर्षे पूर्ण होतील”
आईने हसून उत्तर दिलं.
“अरे व्वा! म्हणजे ‘सिल्व्हर ज्युबिली’. किती आनंदाचा क्षण! आई आपण तुमच्या लग्नाचा वाढदिवस छान साजरा करूया. अगदी लग्न सोहळ्यासारखं. पुन्हा तुम्हाला नववधू आणि बाबांना नवरदेवाच्या भूमिकेत मला पुन्हा पहायचं आहे. तुमच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजळणी.. मी स्वतः तुम्हाला तयार करेन. प्रसादचं यावेळेस मी काही ऐकून घेणार नाही. त्याला आपल्यासाठी वेळ काढायला सांगेन. आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना,मित्रमैत्रिणींना आमंत्रण देऊया आणि छोटीशी पार्टी करूया.”
आस्था आनंदाने भरभरून बोलत होती. तिचा हा उत्साह पाहून आईला खूप हसू आलं.
“हो ग बाई, करू आपण. पण तू जास्त दगदग करू नको. तब्बेत सांभाळूनच सर्व कर.. समजलं ना तुला?”
आई लाडीकपणे रागवत तिला म्हणाली.
आस्थाने होकारार्थी मान हलवली. आस्था वाढदिवसाच्या तयारीला लागली. सर्व जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना निमंत्रणं केली. पूजेसाठी गुरुजींना बोलावलं. फुलांच्या सजावटीसाठी ऑर्डर दिली. रात्रीच्या भोजनासाठी केटर्सवाल्यांना ऑर्डर दिली. सगळं घर छान सजवलं. आस्था सर्व मनापासून उत्साहाने करत होती. आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. आस्था आणि प्रसादने सकाळी उठल्या उठल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आस्थाने आईबाबांचं औक्षण केलं. पूजेसाठी गुरुजी घरी आले. पूजेला सुरुवात झाली. आस्थाने आईला आणि प्रसादने बाबांना छान तयार केलं. आईबाबा पूजेला बसले. अगदी पंचवीस वर्षांपूर्वी लग्न सोहळा साजरी करण्यात आला होता तसा सोहळा साजरी होत होता. होम हवन, सप्तपदी अगदी तसच. सारं घर मंगलमय वातावरणात प्रसन्न वाटत होतं. सारेजण खूप आनंदात होते. लग्नविधी छान पार पडला. दुपारची साग्रसंगीत पंचपक्वानांचा पंगती उठल्या. जेवणं झाली. इतक्यात प्रसादचा मोबाईल वाजला. एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी त्याला जावं लागणार होतं. आस्था हिरमुसली. निदान आजतरी प्रसादने घरी असावं असं तिला मनोमन वाटत होतं. पण प्रसाद साठी मीटिंग महत्त्वाची होती. त्याच्या भवितव्याचा प्रश्न होता. ‘येतो लगेच’ असं सांगून आस्थाची समजूत काढून तो घराबाहेर पडला.
संध्याकाळी झाली. पाहुणे जमू लागले. आई बाबा खूप छान दिसत होते. सर्वजण आई बाबांना लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत होते. भेटवस्तू देत होते. आस्था सर्वांचे मनापासून स्वागत करत होती. प्रसाद नसतानाही तिने सारं छान नियोजन केलं होतं. पाहुण्यांच्या आदरतिथ्यात काहीच कसूर पडू देत नव्हती. सर्व पाहुण्यांची रात्रीची जेवणं आटोपली. लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस छान साजरी झाला. कार्यक्रम संपन्न झाला. सर्व पाहुणे आपपल्या घरी परतू लागले. संपूर्ण कार्यक्रमात प्रसादची कमतरता भासत होती. जो तो प्रसाद कुठे आहे? असा प्रश्न आस्थाला विचारत होते. ती त्याच्या मीटिंगचं कारण सांगत होती. आस्था प्रसादला फोन करत होती. पण तो कॉल्स घेत नव्हता. कदाचित तो मीटिंगमध्ये व्यस्त असेल असं म्हणून आस्थाने कॉल करणं बंद केलं आणि त्याची घरी परतण्याची वाट पाहू लागली.
बरीच रात्र झाली होती प्रसाद अजूनही घरी परतला नव्हता. आस्था त्याची वाट पाहत गॅलरीत फेऱ्या मारत होती. ती खूप अस्वस्थ जाणवत होती. ती हॉलमध्ये आली. तिथे येरझाऱ्या घालू लागली. अचानक तिचा पाय खाली अंथरलेल्या गालिचात अडकला. तिचा तोल गेला. आणि ती जोरात खाली पडली. खाली कोसळताच ती बेशुद्ध झाली. कसला आवाज आला म्हणून आईबाबा खोलीतून बाहेर आले. समोरचं दृष्य पाहून एकदम घाबरून गेले. आई आस्था जवळ आली. तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. बाबांनी शेजारच्या लोकांची मदत घेतली. शेजारच्या लोकांनी आस्थाला कारमध्ये टाकून तिला इस्पितळामध्ये घेऊन आले. आस्था इस्पितळात अत्यावस्थेत पोहचली. तिला अतिदक्षता विभागात नेण्यात आलं. डॉक्टरांनी ताबडतोब तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली.
आई रडू लागली. तिच्या गरोदरपणाच्या अवस्थेत अशी दुर्घटना खरंच चिंतेचं कारण बनलं. तिचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. आई बाबा प्रसादला फोन करत राहिले. तो कॉल्स घेत नव्हता. प्रसाद त्याच्या कामात व्यस्त होता. आई बाबा खूप चिंतेत होते. आस्थाची प्रकृती गंभीर होत होती. इतक्यात डॉक्टर अतीदक्षता विभागातून बाहेर आले आणि म्हणाले.,
“मिसेस करमरकर यांचीं प्रकृती चिंताजनक आहे. ऑपरेशन करावं लागेल. दोघांच्याही जीवाला धोका आहे. आम्ही दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करूनच पण आता अशी परिस्थिती उद्भवली आहे कि आम्हाला दोघांपैकी एकाला वाचवता येईल. हा फॉर्म भरा. यात दोघांपैकी कोणाला वाचवायचं? ते लिहावं लागेल. यांचे पती कुठे आहेत?”
“येईल इतक्यात, ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलाय. आम्ही त्याला कॉल करतोय. फोन लागत नाहीये.”
बाबांनी उत्तर दिलं. यावर डॉक्टर म्हणाले.,
“अजून थांबून चालणार नाही. तुम्हीच फॉर्म भरून द्या. कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल ना. खूप अर्जंट आहे. लवकर फॉर्म भरून द्या”
नर्स एक फॉर्म घेऊन आईबाबांकडे आली. बाबांनी फॉर्म घेतला आणि ते फॉर्म भरू लागले. आई प्रसादला फोन करत होती. पण तो कॉल उचलत नव्हता. सर्वजण चिंतेत पडले. मग प्रसादच्या बाबांनीच पाऊल उचललं. फॉर्मवर सह्या केल्या. बाळ आणि आई यापैकी आईला वाचवा असं लिहून दिलं. आस्थाला वाचवणं त्यांना जास्त गरजेचं वाटलं.
डॉक्टरांनी फॉर्म मिळाल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू केली. दोघांनाही वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. जवळजवळ पाच सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. ऑपरेशन थेटरचा दरवाजा उघडला गेला. डॉक्टर बाहेर आले. आईबाबांनी त्यांच्याकडे धाव घेतली.
“डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? आस्था ठीक आहे ना?”
डॉक्टरांनी मोठ्या दुःखी मनाने उत्तर दिलं
“सॉरी मिस्टर करमरकर, आम्ही मिसेस आस्थाला वाचवू शकलो पण आम्हाला बाळाला वाचवणं शक्य झालं नाही. अजून त्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. थोड्या वेळात येतील शुद्धीवर”
बाबांच्या मनावर प्रचंड आघात झाला होता. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आईही रडू लागली.
“आले देवाजीच्या मना.. तेथे कोणाचे चालेना..”
ते मनातल्या मनात पुटपुटले आणि त्यांनी डॉक्टरांना हात जोडले. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. प्रसादचा फोन होता. ‘हॅलो’ म्हणताच प्रसादने बोलायला सुरुवात केली.
“हॅलो बाबा, खूप आनंदाची बातमी आहे. माझी मीटिंग यशस्वी झाली. डिल फायनल झालं. आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. मी खूप खुश आहे. पण सॉरी बाबा, मी तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी बाहेर होतो. हजर राहू शकलो नाही.”
त्याचं बोलणं अर्धवट कापत बाबा म्हणाले.,
“प्रसाद, आधी फोन बघ. किती कॉल्स केलेत.”
“अरे बापरे, इतके कॉल्स? माझा फोन साईलंटला होता. काय झालं? सगळं ठीक आहे ना? आस्था कुठेय?”
आता मात्र प्रसाद खूप घाबरला. आस्थाची त्याला काळजी वाटू लागली.
“तू ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये निघून ये. आस्थाला ऍडमिट केलं आहे. बाकीचं आल्यावर सांगतो”
इतकं बोलून बाबांनी फोन ठेवून दिला. प्रसाद पटकन हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. प्रसादला प्रचंड दडपण आलं होतं. आणि मनात अपराधीपणाची भावना दाटून आली.
“इतके कॉल्स येऊन गेले तरी आपण कॉल घेतला नाही. मीटिंगमध्ये गुंग राहिलो. आस्थाची जरासुद्धा काळजी वाटू नये? तेही या अवस्थेत? माझंच चुकलं तिला या अवस्थेत एकटीला सोडून यायला नको होतं. आता गेल्या गेल्या पहिली तिची क्षमा मागेन.”
प्रसाद स्वतःशी मनातल्या मनात बोलत होता. तो इस्पितळात पोहचला. आईला रडताना पाहून तो खूप घाबरला.
“आई, का रडतेस? आस्था कशी आहे? काय झालं? मला सांगेल का कोणी?”- प्रसाद
“त्यासाठी कॉल घ्यावा लागतो. किती कॉल्स केलेत आम्ही. इतका बेफिकीर कसा तू? इतकीही तुला समज कशी नाही?”
बाबा चिडून बोलू लागले. आणि त्यांनी घडलेला सर्व वृतांत प्रसादला सांगितला. आस्थाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण ते बाळाला वाचवू शकले नाही. हे ऐकून प्रसाद सुन्न झाला. तो मटकन डोक्याला हात लावत खाली बसला. डोळ्यातून पाणी झरू लागलं.
“काय झालं हे? सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. आस्था शुद्धीवर येईल तेंव्हा तिला काय सांगू? बाळ गेल्याचं ऐकून आस्था कशी रिऍक्ट करेल?”
अनेक प्रश्नमालिका त्याच्या डोक्यात फेर धरू लागल्या. सर्वजण आस्थाच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागले.
पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा