Login

आणि ती आई झाली.. भाग ४

हि एका आईची कथा.. तिच्या मातृत्वाची कथा..

आणि ती आई झाली..

भाग - ४

प्रसाद आस्थाचं ते साजिरं रूप पाहून थक्कच झाला. आस्था खूप गोड दिसत होती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. ही गोष्ट अवीच्या लक्षात आली. 

“अरे बस्स यार, किती बघशील तिच्याकडे?नजर लागायची तुझीच. आणि असंही आता आयुष्यभर पाहायचंच आहे ना तुला.” 

त्याच्या या वाक्यासरशी सर्व मित्रमैत्रिणींमध्ये हास्याचे कारंजे उडाले. त्यांच्या अशा मोठ्या हसण्याने सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. आस्था लाजली. प्रसादही लाजून गालातल्या गालात हसू लागला. ऑफिसच्या कामकाजाची वेळ सुरू झाली. सर्वजण आत गेले. अवि बोलायला सुरुवात करणार इतक्यात इतक्यात आस्थाचे बाबा चार पाच लोकांसमवेत पोलिसांना घेऊन आत शिरले. 

“थांबा साहेब, हे लग्न होऊ शकत नाही. या नालायकाने माझ्या मुलीला फसवले आहे. तिच्याशी लग्न करून माझी संपत्ती हडप करण्याचा याचा प्लॅन आहे. याने तिला फूस लावून पळवून आणले आहे. तुला काय वाटलं आस्था, मला समजणार नाही का? माझी माणसं तुझ्या हालचालींवर पाळत ठेवून होतीच.  मला माहित होतं हा भामटा तुला लग्नाचं आमिष दाखवणार. तुला इथे घेऊन येणार. इन्स्पेक्टर साहेब, हे लग्न थांबवा. याला अटक करून तुरुंगात डांबून ठेवा”

आस्थाचे बाबा त्वेषाने बोलत होते. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून पोलिसांवर दबाव आणू पाहत होते. पण आस्थाने सावध पवित्रा घेतला. ती म्हणाली.,

“नाही साहेब, मला कोणीही फूस लावलेली नाही. माझं या मुलावर, प्रसादवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांना आमच्या आयुष्याचे भावी जोडीदार म्हणून निवडले आहे.  लग्न करायचं आहे आम्हाला आणि आम्ही दोघेही सज्ञान आहोत”

पोलीस आस्थाच्या वडिलांच्या तोंडाकडे पाहू लागले. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं. आस्था आपल्या मर्जीने प्रसाद सोबत घर सोडून निघून आली होती. त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. तरीही उसनं अवसान आणून प्रसादवर डाफरत म्हणाले,

“काय रे? श्रीमंतांच्या मुलींना गळाला लावण्याचा चांगला मार्ग आहे हा? पण कायदा नावाची गोष्ट असते की नाही? कोर्ट मॅरेज करताना असं लगेच लग्न लावता येत नाही. त्याचीही काही प्रक्रिया असते. उठले आणि आले लगेच तोंड वर करून लग्न करायला. चल आता तुला दाखवतो पोलिसी इंगा. प्रेम, लग्न हे विचार पार डोक्यातून निघून  जातील. मी त्यांना धुवून काढीन”

प्रसादच्या कॉलरला पकडत ते त्याला घेऊन जाऊ लागले. प्रसादचे मित्र त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले. इतक्यात  आस्थाने आवाज दिला.

“थांबा इन्स्पेक्टर साहेब, सोडा त्याला. तुम्ही प्रसादला असे गुन्हेगारासारखे घेऊन जाऊ शकत नाही. त्याने कोणताच गुन्हा केला नाही. आम्ही सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या आहेत.”

आस्थाने मृणालकडे पाहिलं. मृणालने मान डोलावली आणि आस्थाच्या पर्समधून एक कागद बाहेर काढला. आस्थाने तो कागद विवाह नोंदणी ऑफिसरच्या टेबलावर ठेवला. ऑफिसरने तो पेपर नीट वाचून पाहिला आणि पोलिसांना म्हणाला.

“साहेब, सोडा  त्यांना. यांनी विवाह नोंदणीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. या दोघांनी एक महिना आधीच कोर्टाची परवानगी घेतली आहे. कोर्टानेच त्यांना लग्नाची तारीख दिली आहे. त्यांना लग्न करण्यास कोणीही अडवू शकत नाही.”

आस्थाच्या बाबांनी तिच्याकडे पाहत एक जळजळीत कटाक्ष टाकला. ते रागाने लालबुंद झाले आणि म्हणाले,

“नालायक कार्टे, म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं तर. आईवडिलांच्या प्रतिष्ठेला काळिमा फासलास. लाज कशी वाटली नाही तुला?”

“हो डॅडा, माझं प्रसादवर खूप प्रेम आहे. लग्न करेन तर त्याच्याशीच. हे मनाशी मी पक्कं ठरवलं होतं. ज्यावेळीस  सरंजामे यांचं स्थळ आलं होतं त्याच वेळीस मी आणि प्रसादने विवाह नोंदणीचा अर्ज दाखल केला होता. पण आम्हाला वाटलं होतं की तुम्ही संमती द्याल. अशा रीतीने लग्न करण्याची वेळ आमच्यावर येईल असं कधीच वाटलं नव्हतं.”

आस्था डोळ्यांत पाणी आणून तिच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचे बाबा खूप चिडले होते. काहीच करता येत नाही म्हटल्यावर ते आणि पोलीस रागात पाय आपटत निघून गेले. आस्थाला मनातून खूप वाईट वाटत होतं. पण निर्णय झाला होता. प्रेम दोघांनी केलंय तर परिणामांची जबाबदारी पण दोघांचीच. पुढील कामकाजाला सुरुवात झाली. प्रसाद आणि आस्था यांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. रजिस्टरवर सह्या झाल्या. साक्षीदारांच्या सह्या झाल्या. आणि प्रसाद आणि आस्था विवाह बंधनात गुंफले गेले. कायदेशीररित्या पतिपत्नी झाले. सर्व मित्रमैत्रिणींनी त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि सर्वजण कार्यालयातून बाहेर पडले. अवि, मृणाल आणि बाकीचे मित्रमैत्रिणी सर्वांनी आपला मोर्चा प्रसादच्या भाड्याने घेतलेल्या नवीन घराकडे वळवला. प्रसाद आणि आस्थाला घेऊन ते नवीन घरी आले. मृणालने पटकन आत जाऊन धान्याने भरलेला कलश उंबरठ्यावर आणून ठेवला आणि आस्थाला गृहप्रवेश करायला सांगितलं. उंबरठ्यावरचं माप ओलांडून आस्थाने नवीन घरात प्रवेश केला. सर्वजण खूप आनंदांत होते.

मैत्रीचं नातं किती अनोखं असतं नाही? त्याचं नात्याने प्रसाद आणि आस्थाला नवीन उभारी दिली होती. प्रत्येकाने आपापल्या घरातून थोडी भांडीकुंडी, सिंगल गॅस शेगडी, आस्थासाठी कपडे, थोडं किराणा समान आणलं होतं. त्यांच्या छोट्याश्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केला होता. किती मोलाची मदत झाली होती. हेच मित्रमैत्रिणी नसते तर कशी तग धरू शकले असते? दोन्ही घरांनी नाकारल्यानंतर कुठे आसरा मिळाला असता? या मित्रांच्या रूपाने जणू साक्षात ईश्वरच मदतीला धावून आला होता. प्रत्येक संकटातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग मिळत गेला. आस्थाने मनोमन देवाचे आभार मानले. मृणालचे आभार मानले. प्रसादने सद्गदित होऊन अविला मिठी मारली. त्या मिठीतली भावना काहीही न बोलताही बरंच काही सांगून गेली. सर्व मित्रांचे आभार मानले.थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर सर्वांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते आपापल्या घरी परतले. 

सर्वजण गेल्यानंतर प्रसादने दार लावून घेतलं. धावत येऊन आस्था त्याच्या बाहुपाशात विसावली. प्रसादने प्रेमाने तिला जवळ घेतलं. आस्था म्हणाली.

“प्रसाद, या अशा परिस्थितीत आपल्याला लग्न करावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं रे. आपल्या दोघांच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न आपण केलं. मला भीती वाटते रे. काही विपरीत तर होणार नाही ना?”

“वेडी आहेस का तू? काही विपरीत होणार नाही. सगळं छान होणार आहे. आपले आई बाबा आता नाराज आहेत. पण त्यांचा राग निवळेल. ते आपल्याला माफ करतील.बघ तू. आस्था तुझे डॅडा म्हणाले होते. माझ्या पगाराइतका तुझा पॉकेटमनी आहे. पण आस्था मी तुला खूप सुखात ठेवेन. तुझ्या चेहऱ्यावर कधीही दुःखाचा लवलेशही दिसू देणार नाही. मी इतके पैसे कमवेन की एक दिवस तुझ्या बाबांपेक्षाही मोठा माणूस होईन. आणि त्यासाठी मला दिवसरात्र मेहनत करावी लागली तरी माझी तयारी आहे. मी करेन तुझ्या सुखासाठी मी काहीही करेन”

बोलताना प्रसाद भावुक झाला होता. आस्थाने त्याच्या डोळ्यातले भाव अचूक टिपले होते. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली.

“प्रसाद, मला काहीही नकोय,तू असाच कायम माझ्यावर प्रेम करत रहा. तुझं प्रेम माझ्यासाठी लाख मोलाचं आहे रे शोना..!  तू जिथे असशील तिथे मी सुखाने तुझ्यासोबत राहीन. मला काही नकोय रे”

आस्थाच्या बोलण्याने तिचं निस्वार्थ प्रेम पाहून प्रसादला अजूनच भरून आलं. त्याने तिला जवळ घेतलं. आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. आस्था मोहरली. मिठी अजूनच घट्ट झाली. 

थोड्या वेळात भानावर येत आस्थाची मिठी सैलावली. प्रसाद स्वतःला सावरत म्हणाला.

“चला मॅडम, जेवणाचं काही पाहावं लागेल. फक्त प्रेमाने पोट भरत नाही”

आणि तो खळखळून हसला. आस्थाच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली. ओशाळून ती म्हणाली,

“प्रसाद, मला स्वयंपाक करता येत नाही. आईने कधी  स्वयंपाकघरात येऊच दिलं नाही. आता रे काय करायचं?”

आस्थाला चिंतीत पाहून प्रसाद म्हणाला,

“कोई बात नही मॅडम. मी शिकवेन तुला सगळं. आईने मला थोडं फार शिकवलं आहे. चल आज मी तुला माझ्या हातची मुगाची खिचडी खाऊ घालतो”

मोठ्या उत्साहाने प्रसादने खिचडी बनवली. या घरातला स्वयंपाक करण्याची पहिलीच वेळ म्हणून केळीचं गोड शिकरण बनवलं. आस्थाही त्याच्या शेजारी उभी राहून कृती पाहत होती. सगळं मनात टिपून ठेवत होती. 

मृणाल पहिल्या पासूनच श्रद्धाळू वृत्तीची. मृणालने आस्थाला लग्नाची भेट म्हणून पूजेचं सामान, पाट, पाटावर अंथरण्याचं वस्त्र, कलश दिवा धूप गणपती बाप्पाची, आणि बालकृष्णाची चांदीची छोटी मूर्ती दिली होती. आणि रोज पूजा व्हायलाच पाहिजे असं आस्थाला बजावून गेली होती. मग आस्थानेही भक्तिभावाने छोट्याश्या पाटावर तांदळाची रास रचली त्यावर कलश मांडला. गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण त्या छोट्याश्या देवघरात स्थानापन्न झाले. आस्थाने केळीच्या गोड शिकरणाचा नैवैद्य दाखवला. देवापुढे दिवा लावला. उदबत्ती पेटवली. तिने हात जोडून भक्तिभावाने देवाला नमस्कार केला.

 “देवा, असाच कायम सोबत रहा. संकटाशी लढण्याचं बळ दे” 

मनोमन तिने देवाला साकडं घातलं. सारं वातावरण मंगलमय झालं होतं. 

थोड्याच वेळात आस्थाने गरम गरम खिचडी वाढून घेतली आणि दुसरं ताट करणार  इतक्यात प्रसादने तिला अडवलं. 

“नको आस्था, आज आपण एकाच ताटात जेवू. म्हणतात की, नवरा बायकोने एकाच ताटात जेवण केलं की प्रेम द्विगुणित होतं. आपलंही प्रेम असंच वृद्धिंगत व्हायला हवं ना.!”

त्याच्या बोलण्याने आस्था लाजली. दोघांसाठी एकच ताट तयार केलं. खिचडी, पापड लोणचं असा जेवणाचा छान बेत होता. पहिला घास प्रसादने आस्थाला भरवला. तिनेही प्रेमाने प्रसादला घास भरवला. आनंदाने हसतखेळत दोघांची जेवणं आटोपली.  

आस्थाने मित्रांनी दिलेली चादर खाली अंथरली. आणि प्रसादला झोपायला सांगितलं. प्रसाद खाली झोपला खरा पण डोक्यात विचारचक्र फिरू लागले.

“एका आलिशान बंगल्यात राहणारी, मखमली बिछान्यात झोपणारी माझी आस्था आता दोन रूमच्या खोलीत राहतेय. खाली जमिनीवर झोपतेय”

या विचारांनी तो अस्वस्थ झाला. डोळ्यांत पाणी तरळले. ही गोष्ट आस्थाच्या लक्षात आली. त्याच्या हातावर आपलं डोकं ठेवत ती त्याला बिलगली. 

“हेही दिवस जातील शोना..धीर धर. सगळं छान होणार आहे आपण दोघे छान करणार आहोत. आता शांतपणे झोप बरं.”

आस्था प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. त्याला समजावत होती. आणि दूर कुठेतरी रेडिओवर एक जुनं हिंदी गाणं वाजत होतं

“तेरा साथ है तो मुझे क्या कमी है| 

अंधेरोसे भी मिल रही रोशनी है| 

तेरा साथ है तो कुछ भी नही है तो कोई गम नही है| 

हर इक बेबसी बन गई चांदनी है|

एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती.  पुढे काय होतं? प्रसाद आणि आस्थाच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येणार आहे? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©निशा थोरे

0

🎭 Series Post

View all