Login

आणि ती आई झाली.. भाग ५

हि कथा एका आईची..तिच्या मातृत्वाची..

आणि ती आई झाली..

भाग - ५

प्रसादला आस्थाचा विचार करता करता बऱ्याच वेळाने झोप लागली. आस्था मात्र जागीच होती. मनात विचारांचं काहूर दाटलं होतं. मनात विचारांनी फेर धरला होता.

“माझ्या आणि प्रसादच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली.  इतर नवविवाहित दाम्पत्यासारखी काहीच हौसमौज झाली नाही. खरंतर प्रत्येक मुलीच्या मनात तिच्या लग्नसोहळ्याची स्वप्नं असतात. लग्नाचा विधी, अंतरपाट, सप्तपदी, विवाहसोहळा पार पडल्यानंतर लहान थोरांचे आशीर्वाद, सासरी आल्यावर गृहप्रवेश, सर्वांनी केलेली थट्टा मस्करी, देवदर्शन, कुलदेवतेची पूजा, बाहेर हनिमूनसाठी फिरायला  जाणं या साऱ्या गोष्टी प्रत्येक मुलीला हव्या असतात.  लग्नानंतरच्या त्या सोनेरी क्षणांसाठी मन आसुसलेलं असतं. मलाही हे सारं हवं होतं. पण माझ्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. माझ्या लग्नसोहळ्याच्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या. ते एक स्वप्नंच राहीलं. पण ईश्वरा, मी खूप आनंदी आहे. बाकीच्या गोष्टी नसतील मिळाल्या पण ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो माझा प्रसाद जोडीदार म्हणून कायम सोबत असणार आहे अजून काय हवं होतं मला? सगळं सुख मला माझ्या ईश्वराने भरभरून दिलंय. आणि तसंही बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आयुष्य पडलंय. सगळी हौसमौज नंतर करता येईल. पण आता मला माझ्या प्रसादला सांभाळायचं आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत त्याच्या सोबत राहायचं आहे. अगदी काडी काडी जमवून स्वतःचं इवलंसं घरकुल सजवायचं आहे. आम्हा दोघांना  मिळून आमचा संसार फुलवायचा आहे.”

आस्थाच्या मनाने केलेल्या निर्धाराने एक नवीनच तेज झळकत होतं. आता तिच्यासमोर परिस्थिती बिकट होती. प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी यांची सांगड घालायची होती. पण आस्था मुळीच घाबरली नव्हती. एक नवीन उमेद तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. बरीच रात्र उलटून गेली होती. विचारांच्या तंद्रीत खूप उशिरा तिचा डोळा लागला. 

झुंजूमंजू झालं. पाखरांच्या किलबिलाटानं आस्थाला जाग येत होती. झोपेतच तिने फर्मान सोडलं.

“ ममा, ऐ मम्मा, कॉफी दे ना प्लिज”  

आस्थाला झोपेतून उठल्या उठल्या प्यायला कॉफी लागायची. पण आता दोनदा आवाज दिला कोणीच आलं नाही म्हणून मग तिने डोळे किलकिले करून पाहिलं. ती तिच्या बेडरूममध्ये नव्हती. ती तिच्या नवऱ्याच्या, प्रसादच्या घरी होती. वस्तुस्थिती आता फारच निराळी होती. शेजारी प्रसाद शांतपणे निजला होता. 

“किती निरागस वाटतोय माझा प्रसाद! कालची चिंता आजिबात जाणवत नाही आता. किती शांत झोपलाय ना. देवा माझ्या प्रसादला कायम असंच सुखात ठेव. कितीही संकटं येऊ देत. पण त्याला लढण्याची शक्ती दे. त्याला उदंड निरोगी आयुष्य दे.”

बिछान्यातून उठून बसत आस्था हात जोडून मनातल्या मनात स्वतःशीच बडबडत होती. प्रसादच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून तिचं मन प्रेमाने भरून आलं आणि तिने अलगद प्रसादच्या भाळावर ओठ टेकवत चुंबन घेतलं. नकळत झोपेतच प्रसादच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं. आस्था उठू लागली. इतक्यात प्रसादने तिचा हात घट्ट पकडत तिला जवळ ओढलं. 

“नको ना जाऊ! झोप न थोडा वेळ!”

प्रसाद लडिवाळपणे बोलत होता. 

“नाही, नाही उठा चला. खूप उशीर झालाय. उन्ह घरात येऊ लागली आता. तू उठ बरं. मी पटकन फ्रेश होते. तुला मला ब्रेकफास्ट बनवायला शिकवायचं आहे ना. नाहीतर उपाशी राहावं लागेल.”

आस्थाने प्रसादच्या गोड मिठीतुन अलगद हसत स्वतःची सोडवणूक करून घेतली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. आस्थाच्या खोडकर बोलण्याची प्रसादला गंमत वाटली. तो आळोखेपिळोखे देत उठून बसला. अंथरुणाची नीट घडी घालून एका कोपऱ्यात ठेवून दिलं. घर नीट झाडून घेतलं. इतक्यात आस्था फ्रेश होऊन बाहेर आली. आरशासमोर उभी राहून ती तिचे ओले केस टॉवेलने पुसत होती. तिने घातलेल्या गुलाबी गाऊन मध्ये ती फार गोड दिसत होती. मोकळे सोडलेले ओले केस तिच्या सौन्दर्यात अजूनच भर घालत होते आणि त्या केसातून सोनेरी मोती ओघळत होते. ओले केस झटकताना ते तुषार प्रसादच्या चेहऱ्यावर उडाले. प्रसाद तिचं ओलं गोंडस रूप पाहून थक्क झाला. एकटक तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला असं एकटक न्याहाळताना पाहून आस्था लाजून चुर झाली. प्रसादला जागेवरून उठवत म्हणाली,

“पुरे ना प्रसाद, किती पाहशील? मला लाज वाटते. उठ बरं जा फ्रेश हो.” 

प्रसादने होकारार्थी मान डोलावली. तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. आस्थाने देवापुढे धूप अगरबत्ती लावली. पूजा केली. गॅस पेटवून दूध गरम करू लागली. प्रसाद बाहेर आल्यानंतर त्याने आस्थाला कॉफी बनवायला शिकवलं. ब्रेड गरम करून बटर लावून घेतलं. आणि दोघांनी मिळून ब्रेकफास्ट केला. 

ब्रेकफास्ट करता करता आस्था कसल्यातरी विचारात गर्क झाली. प्रसादने तिच्याकडे पाहिलं.,

“काय झालं आस्था? कसला विचार करतेय?” - प्रसाद

“काही नाही रे, आता आपण पुढे काय करायचं? हा विचार करतेय. प्रसाद आता आपल्याला दोघांना आपल्या संसाराची जबाबदारी घेतली पाहिजे. आठ दिवसांनी माझं नव्या ऑफिसला जॉईन व्हायचं आहे. तू कधी जॉईन होणार आहेस?”

आस्थाने त्याच्याकडे पाहून प्रश्न केला. 

“पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून जायचं आहे. पण आस्था एक सांगू? मला तुला खूप सुखात ठेवायचं आहे. मला तुझ्या बाबांसारखं मोठा उद्योगपती बनायचं आहे. माझं नोकरीत किती दिवस मन रमेल नाही सांगता येत ग.”

प्रसाद तिच्या डोळ्यांत पाहून म्हणाला.

“हे बघ प्रसाद, मी तुझ्याबरोबर खूप आनंदी आहे. मला श्रीमंत नाही तर सुखी व्हायचं आहे. आणि माझ्या सुखाची व्याख्या म्हणजे तू आहेस. तू सोबत असशील तर काहीच नको मला. आता आपल्याला जगण्यासाठी नोकरी करणं गरजेचं आहे. काही महिने नोकरी करू.थोडे पैसे गाठीशी पडले की आपण नक्की बिझनेसचा विचार करू. पण आता आपल्याला स्वतःचं लहान का असेना आपलं घरकुल बनवायचं आहे. हळूहळू निदान गरजेच्या वस्तू तरी खरेदी करायच्या आहेत. समजलं का? चला आता आपल्याला नोकरीवर रुजू व्हायला अजून काही दिवस वेळ आहे तोपर्यंत आपण घर लावून घेऊ. सर्व सामान जागेवर मांडून ठेवू.आणि हो आज खिचडी मी बनवणार आहे तू फक्त लांबून लक्ष दे. समजलं?”

प्रसादने तिच्या बोलण्यावर मान डोलावली. आणि दोघांनी मिळून सारं घर लावून घेतलं. समान नीट मांडून घेतलं. मग दोघेजण बाहेर भाजीमार्केटमध्ये जाऊन खूप साऱ्या भाज्या घेऊन आले. रोजच्या वापरातल्या वस्तूही आणल्या. छोटीशी मांडणी आणून भांडी नीट लावून घेतली. घरी आल्यावर आस्थाने स्वतः खिचडी बनवली. प्रसाद लांबून पाहत होता. तिला चुकलं की सांगत होता. आस्थाने खरोखरीच छान खिचडी बनवली होती. दुपारचं जेवण आटोपून छोटीशी वामकुक्षी घेतली. संध्याकाळी चहा कॉफी झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. 

रात्रीचा स्वयंपाक मात्र प्रसादने केला. वरण भात, बटाट्याची भाजी, पोळी, कोशिंबीर, पापड लोणचं असा साग्रसंगीत मराठमोळा बेत आखला होता. प्रसादला पोळ्या नीट गोल जमत नव्हत्या. आता काय करणार? मग आस्थाच्या डोक्यात एक कल्पना सुचली. तिने डब्याचं झाकण लाटलेल्या पोळीवर थापलं. बाजूचे काठ काढून टाकले. झाली गोल पोळी. मग साऱ्या पोळ्या तव्यावर छान भाजून घेतल्या. आज दोघेही स्वतःच्याच पाककृतीवर जाम खुश झाले होते. आस्था मात्र सगळं बारकाईने पाहत होती. काही गोष्टी लक्षात तर काही पानावर टिपून ठेवत होती. स्वयंपाक उरकला. 

थोडयाच वेळात आस्थाने दोघांची पानं मांडली. रात्रीची जेवणं उरकली आस्थाने भांडीकुंडी, किचन ओटा नीट पुसून आवरून घेतला. तोपर्यंत प्रसादने बाहेरची खोली झाडून पुसून घेतली. अंथरून घातलं. सगळं आवरून 1 आस्था झोपण्यासाठी खोलीत आली. प्रसाद अलगद तिला जवळ ओढत मिठीत घेत लाडिकपणे म्हणाला.,

“ओके बॉस, सगळं मान्य. तू म्हणशील तसं. नोकरी करूया.आपलं घर सजवूया. सगळं जागच्या जागी ठेवूया. पण मला सांग इतकं काम केल्यावर प्रेम कधी करायचं? तुला आठवतंय ना माझं स्वप्नं? दोन चार वर्षातच आपली दोन-तीन मूलं. तू आई आणि मी बाबा.तुला माहीत आहे ना!  मला लहान मुलं खूप आवडतात गं” 

आतापर्यंत हसत खेळत साऱ्या घरभर वावरणारी आस्था त्याच्या या बोलण्याने एकदम गंभीर झाली. आणि प्रसादला म्हणाली.,

“प्रसाद अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची राहून गेली. प्रसाद, मी एक निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आपण दोघे आपल्या नोकरीत स्थिरावत नाही. आपल्या संसाराची गाडी नीट रुळावर येऊन नीट धावत नाही. आपण आपल्या पायावर उभे राहून आपलं भवितव्य सुरक्षित करत नाही तोपर्यंत आपण आई बाबा होण्याचा विचार करणार नाही. सगळं नीट स्थिरावलं की आपण ठरवू. काय म्हणतोस?”

आस्थाच्या प्रश्नाने प्रसाद एकदम हडबडून गेला. आस्था सद्यस्थितीत आई होण्यास नकार देत होती. एक स्त्री तिचं मातृत्व लांबणीवर टाकत होती. आस्था असा काहीतरी निर्णय घेईल असं त्याला स्वप्नांतही वाटलं नव्हतं. प्रसाद आश्चर्यचकित झाला. आस्थाला काय उत्तर द्यावं त्याला समजत नव्हतं.

प्रसाद आस्थाचा निर्णय मान्य करेल का?  पुढे काय होईल?  पाहूया पुढील भागात..