आणि ती आई झाली..
भाग - ६
आस्थाच्या प्रश्नाने प्रसादला खूप नवल वाटलं. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला.,
“आस्था, मला तुझ्या या धाडसी निर्णयाचं नवल वाटतं आणि कौतुकही. पण आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. ते आईपण, त्या मातृत्वाची अनुभूती प्रत्येकीला हवी असते. मग तू का असा निर्णय?”
प्रसादच्या बोलण्यावर शांतपणे आस्था म्हणाली.,
“प्रसाद, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. मलाही ते सुख हवंय. मलाही आई व्हायचं आहे. मातृत्वाची अनुभूती मलाही घ्यायची आहे पण ती वेळ आता नाही. प्रसाद, आपण आपल्या बाळाला चांगलं सुरक्षित भविष्य देणार नसू तर त्या आईपणाचा काय उपयोग? आधी आपण आपल्या पायावर उभं राहू. त्याला त्याचं हक्काचं घर देऊ. त्याला सगळ्या सुखसोयी देता येतील इतके आपण सक्षम होऊ. मग आपल्या बाळाला या जगात आणू. तुला पटतंय का मी काय म्हणतेय ते?”
सारासार विचार केल्यानंतर प्रसादला आस्थाचं म्हणणं पटलं. सगळं नीट स्थिरावल्यानंतर बाळाचा विचार करणं अगदी योग्य होतं. आणि त्याने आस्थाचा निर्णय मान्य केला. तिच्या या निर्णयाला प्रसादने दुजोरा दिल्याने आस्था आनंदून गेली आणि अलगद त्याच्या कुशीत शिरली. प्रसादच्या कुशीत शांत झोपी गेली.
दिवस छान सरत होते. प्रसाद आणि आस्थाचा राजाराणीचा छान सुखाचा संसार सुरू झाला. दोघांच्याही आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं होतं. असं म्हणतात ‘पाण्यात पडलं की आपोआप पोहायला येतं. अगदी तसंच मुली संसारात पडल्या की संसार करायला शिकतात त्यांना काही शिकवावं लागत नाही.’ आस्थाने घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. आता ती बऱ्यापैकी छान स्वयंपाक करायला शिकली होती. दोघेही खूप सुखात आनंदात होते.
आस्थाने तिचं ऑफिस जॉईन केलं. स्वतःच्या कारने कॉलेजला येणारी आस्था ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट पाहत बसस्टॉप थांबू लागली. नोकरीचा पहिलाच अनुभव. पडत झडत शिकत होती. अनुभव घेत होती. मूळचीच हुशार असलेल्या आस्थाने ऑफिसमध्ये कमी अवधीतच आपल्या वक्तशीर, मनमोकळ्या स्वभावाने, कामातल्या नैपुण्यामूळे आपल्या वरिष्ठांची त्याच बरोबर सहकाऱ्यांचीही मनं जिंकली. सर्वजण तिच्या कामावर खुश होते. नोकरीत प्रगती होत गेली. प्रमोशन मिळत गेलं आणि त्याच बरोबर महिन्याचं वेतनही वाढत गेलं. कमी अवधीत मिळत गेलेल्या यशाने तिच्यावर जळणाऱ्यांचा एक वेगळा समूह तयार होऊ लागला. जसंजसं प्रमोशन वाढत गेलं तसं चांगल्या सहकाऱ्यांसोबत ईर्षा करणाऱ्या सहकाऱ्यांची संख्या वाढू लागली.
काही दिवसांनी प्रसादही नवीन नोकरीवर रुजू झाला. दोघांचं रुटीन सुरू झालं. सकाळी उठून घरातलं सर्व उरकून आस्था आणि प्रसाद ऑफिससाठी घराबाहेर पडायचे. बससाठी बस थांब्यावर वाट पाहत थांबायचे. मग बसची वाट पाहणं, तो बसचा प्रवास, धावत पळत ऑफिसला पोहचायचं, मग दिवसभर ऑफिसचं काम आणि मग ऑफिस सुटल्यावर घराकडे परतीचा प्रवास हे सारं आस्थाला आता सवयीचं झालं होतं. घरी येताना आस्था भाजी घेऊन यायची. आई वडिलांच्या घरी असताना भाजी, किराणा या विषयी तिला काहीच माहीत नव्हतं. पण आता ती चांगलाच भाव करायला शिकली होती. परिस्थिती माणसाला सगळं शिकवते हेच खरं.! संध्याकाळी घरी आल्यावर आस्था देवपूजा करून आस्था स्वयंपाकाला सुरुवात करायची. कधी प्रसाद ऑफिसवरून लवकर घरी आला की तोही आस्थाला घरकामात मदत करायचा. सगळं छान सुरळीत सुरू होतं.
दोघांचा सुखी संसार सुरू झाला. दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत होते. एकमेकांना सांभाळून घेत होते. आता आजूबाजूच्या लोकांशी ओळखी वाढू लागल्या. शेजारी पाजारी सुट्टीच्या दिवशी घरी येऊ लागले. गप्पा रंगू लागल्या. आस्थालाही बायका हळदीकुंकु, बारसं, वाढदिवस, मुंज, लग्न अशा कार्यात आमंत्रणं येऊ लागली. लोकांत दोघेही आनंदाने सहभागी होऊ लागले. आता घरात प्रत्येक महिन्याला नवनवीन गृहोपयोगी वस्तू येऊ लागल्या.
भविष्याच्या विचार होऊ लागला. टेलव्हिजन, फ्रीज, वॉशिंग मशीन, शोकेस, सोफा, बेड, कपाट, स्वयंपाकघरातल्या लहानसहान वस्तू एक एक करत या साऱ्या वस्तू खरेदी होऊ लागल्या. संसार फुलू लागला. छान सजू लागला.
बघता बघता दोन वर्षे सरली होती. एक दिवस आस्था जाहिरातीचं पत्रक घेऊन घरी आली. प्रसाद घरी आल्यावर तिने ते पत्रक त्याला दाखवलं. आस्था त्याला म्हणाली,
“प्रसाद, हे बघ काय आहे हे! ऑफिसमधल्या माझ्या एका मैत्रिणीने मला दिलंय एका घरकुल प्रकल्पाची जाहिरात आहे ही. शहरापासून थोडं दूर आहे. पण प्रकल्प छान वाटतोय. शिवाय आपल्या बजेटमध्येही. उद्या रविवार आहे आपल्या दोघांनाही सुट्टी. पाहून येऊया का? काय म्हणतोस?”
आस्था खूप उत्साहाने बोलत होती.
“अग आस्था, खूप घाई होतेय असं नाही का वाटत तुला? चल ठीक आहे आपण पाहून आलो. आवडला आपल्याला पुढे काय? बिल्डरला कसे पैसे देणार आहोत?”
प्रसादच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती. ते पाहून आस्था म्हणाली.,
“प्रसाद, आधी आपण पाहून तर येऊ. तू काळजी करू नको आजवर आपण केलं ना सगळं मॅनेज. मग हेही होईल. आपण 'बँक लोन' करू. सुरुवातीला डाऊन पेमेंटची सोय करावी लागेल. करू आपण. पण पाहूया ना! प्रसाद, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं रे, आपलं हक्काचं स्वतःचं घर असावं. असं कासवासारखं पाठीवर बिऱ्हाड घेऊन संसार अजून किती दिवस करायचा? नेहमी डोक्यावर घर खाली करण्याची टांगती तलवार. मला माझं स्वतःचं घर हवंय. मला काही माहीत नाही. आपण उद्या पाहून येऊ.”
आस्था प्रसादला आर्जवे करत होती. तिची ती केविलवाणी धडपड पाहून प्रसाद विरघळला. आणि त्याने तो घरकुल प्रकल्प पाहण्यासाठी आस्थाला होकार दिला.
दुसऱ्या दिवशी आस्था लवकर उठली. प्रसादलाही लवकर उठवलं. कंटाळा करत आळोखेपिळोखे देत प्रसाद उठला. दोघेही फ्रेश झाले.आस्थाने सकाळचा नाश्त्यासाठी कांदेपोहे केले होते. दोघांनी मिळून नाश्ता केला. त्यानंतर आस्थाने पटापट सकाळची कामे आटोपली. दुपारचा स्वयंपाकही करून घेतला. प्रसादला सोबत घेऊन आस्था तो गृहप्रकल्प पाहायला घराबाहेर पडली.
ते दोघे प्रकल्पाच्या ठिकाणी पोहचले. समोरच मोठा बोर्ड दिसला. “ड्रीमवर्ल्ड”. खरंच स्वप्ननगरी होती ती. पाच हजार घरांचा मोठा प्रकल्प. मुलांना खेळण्यासाठी मोठं गार्डन. स्विमिंगपूल, सभागृह, मधोमध गणपती बाप्पाचं मंदिर, लिफ्ट, जनरेटर बॅकअप, चोवीस तास पाण्याची सोय, जवळच भाजी मार्केट. दहा मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप, रिक्षास्टॅण्ड. सगळं आस्थाच्या मनासारखं होतं. तिथल्या काही बिल्डींगचे काम पूर्ण झाले होते. काही अजून अर्धवट अवस्थेत. बिल्डरच्या ऑफिसमध्ये पोहचल्यावर त्याने दोघांचं हसून स्वागत केलं. त्याच्या माणसाला दोघांना फ्लॅट दाखवायला सांगितलं. प्रसाद आणि आस्था दोघेही फ्लॅट पाहून आले. खूप सुंदर फ्लॅट होता. दोघांनाही फ्लॅट खूप आवडला होता. फ्लॅट पाहून झाल्यावर ते पुन्हा बिल्डरच्या ऑफिसमध्ये आले. त्याने प्रसादला सगळी स्कीम समजावून सांगितली. आस्थाही नीट समजून घेत होती. आस्थाने जागेची सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी कागदपत्रांचा एक सेट बिल्डरला मागितला. जेणेकरून ते कागदपत्र बँकेत दाखवता येतील. सदोष कागदपत्र असतील तर सर्वात आधी बँकच फाईल रद्द करेल. म्हणून तिने तपासून घेण्यासाठी कागदपत्रांची फाईल स्वतः कडे घेतली. सुरुवातीला निदान फ्लॅटच्या रक्कमेच्या वीस टक्के रक्कम तरी डाऊनपेमेंट करायला लागणार होती. आणि बाकीची रक्कम बँक लोन करून द्यायची होती. प्रसादच्या दृष्टीने ती रक्कम मोठी होती. त्यामुळे प्रसादने बिल्डरला ‘विचार करून कळवतो’ असं सांगून दोघांनीही तिथून निरोप घेतला.
आस्था आणि प्रसाद दोघे घरी परतले. घरी येता येता दुपार झाली होती. भुकेने पोटात कावळे ओरडू लागले होते. दोघेही हातपाय धुवून फ्रेश झाले. आस्थाने पानं वाढून घेतली. आस्था अजूनही त्या प्रोजेक्टचाच विचार करत होती. तिला फ्लॅट खूप आवडला होता. जेवणं झाल्यावर तिने प्रसाद जवळ विषय काढला.
“प्रसाद, कसा वाटला फ्लॅट? छान होता ना.! तुला आवडला का? मला खूप आवडला बघ. मला जसं घर हवं होतं ते सगळं तिथे आहे. प्रसाद, काय ठरवलंय तू?”
तिच्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. तिला थांबवत प्रसाद म्हणाला.
“अग शोना, फ्लॅट खूप छान आहे. मलाही खूप आवडला. पण आपण एवढी मोठी रक्कम कशी उभी करणार? बँक लोन होईल पण वीस टक्के म्हणजे निदान चार लाख इतकी रक्कम तरी आपल्याला भरावी लागेल ना? मला थोडं कठीण वाटतंय.”
“काही कठीण नाही. जमवू आपण. हे बघ दोन वर्षे झाली आपण नोकरी करतोय. नोकरी लागलेल्या पहिल्याच महिन्यापासून मी बँकेत दरमहा पाच हजार रक्कमेचं रिकरिंग अकाउंट सुरू केलं होतं. तेंव्हापासून आपल्या पगारातून काही रक्कम बाजुला पडत होती. काटकसर करून मी बचत करत होते. मला माहित होतं अशाच काही अडचणीत हीच रक्कम कामी येईल. ती रक्कम जवळपास दीड लाख असेल. आणि बघ आमची महिला मंडळाची भिशी सुरू आहे. ते पन्नास हजार होतील. बाकीचे आपण करू उभे. तू काळजी करू नको. बघूया कसं काय होईल ते. मी उद्याच बँकेत जाते आणि माझी रिकरिंग रक्कम किती आहे ते पहाते. आणि या प्रोजेक्ट बद्दलही त्यांना सांगते. म्हणजे लोन पण तिथूनच करता येईल”
आस्था भरभरून बोलत होती. आपण घर घ्यायचंच तिने जणू मनाशी पक्का निर्धारच केला होता. आस्थाने केलेल्या बचतीबद्दल ऐकून तो एकदम थक्कच झाला आणि तिचे कौतुकही वाटले. तिचा तो उत्साह पाहून त्यालाही तिला नाही म्हणवत नव्हतं. आणि तिच्या म्हणण्याला होकार दिला.
पुढे काय होतं? आस्थाचं स्वतःचं हक्काचं घर होईल का? तिचं स्वप्नं पूर्ण होईल का? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा