Login

आणि ती आई झाली..

हि कथा एका आईची..

आणि ती आई झाली..

आज आस्थाच्या लग्नाचा वाढदिवस होता. प्रसादने वाढदिवसाचं छान नियोजन केलं होतं. तिच्यासाठी मोरपंखी रंगांची साडी घेतली होती. मोगऱ्याचा गजरा, तिची आवडती काजू कतली मिठाई आणली होती. बाहेरुन केक शॉपीमधून छानसा केक मागवला होता. आज रात्री त्याने त्याच्या घरी छोटीशी पार्टी आयोजित केली होती. आस्थाच्या आणि त्याच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना त्याने आमंत्रित केलं होतं. हे सारं करण्यामागे प्रसादचं  खास  कारणहीं होतं. आस्थाला आनंदी ठेवण्यासाठी तो हे सारं करत होता. तिला खास फील करवण्याचा त्याचा प्रयत्न होता. निदान त्या निमित्ताने तरी तिच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य परतून येईल त्याच्या वेड्या मनाची वेडी आशा. संध्याकाळी त्याने आस्थाला छान नटवून तयार केलं. केसात तिच्या गजरा माळला. आस्थाच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला. मोरपंखी रंगाच्या  साडीत तीच रूप अजूनच खुलून दिसत होतं. तिचं सौन्दर्य पाहून तो थक्क झाला. आजारपणामूळे तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं जरी आली असली तरी तेच भुलवणारं सौन्दर्य आजही शाबूत होतं. आपसूक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. 

“किती गोड दिसतेय आस्था..! अगदी तशीच दिसतेस जशी कॉलेजमध्ये होतीस.”

आस्थाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. हलकेसे स्मित हास्य करत ती प्रसादच्या मिठीत विसावली. प्रसाद कायम असंच रोमँटिक बोलायचा. त्याच्या याच लाघवी बोलण्याची तिला भुरळ पडली होती. आणि ती त्याच्या प्रेमात पडली होती. थोड्या वेळाने त्याच्या मिठीतुन स्वतःची सोडवणूक करून घेत ती त्याला चेष्टेने म्हणाली,

“चल पुरे आता, लग्नाला बारा वर्षे झाली तरी अजून तुझा फाजीलपणा काही कमी होत नाही. चल, आता बाहेर जाऊ.. सगळे वाट पहात असतील आपली.”

प्रसादने होकारार्थी मान डोलावली. तिचा हात हातात घेऊन सावकाश तो तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन आला. सर्व मित्रपरिवार आधीच एकत्र जमला होता. सर्वांनी दोघां उभयत्यांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. दोघांनी हसून अभिवादन करत सर्वांच्या सदिच्छांचा स्वीकार केला. केक कापला.  नव्या जुन्या गाण्यांवर सर्वांची पाऊले थिरकली. सर्वजण आनंदात होते. बाहेर गार्डन मध्ये सर्व मित्रमंडळींच्या जेवणाची खास सोय करण्यात आली होती. बुफे ठेवण्यात आला. रात्री खूप उशिरापर्यंत सेलिब्रेशन सुरू होतं. लग्नाचा वाढदिवस अगदी थाटामाटात साजरा झाला. जेवणं उरकून सर्वांनी दोघांचा निरोप घेतला आणि ते आपापल्या घरी परतले. आस्था आणि प्रसाद जेवण आटोपून नोकरांना कामाच्या सूचना देऊन आपल्या खोलीत आले. आस्थाने कपडे बदलले आणि नाईट गाऊन घातला. आणि बेडवर येऊन बसली. इतक्यात प्रसाद तिच्याकडे पाहत म्हणाला,

“मॅडम, रात्रीचं औषध घ्यायचं विसरलात ना!! हे घ्या लवकर चला.. आणि झोपी जा. बरीच रात्र झालीयं.”

प्रसादने  गोळ्या आणि पाणी आणून दिलं. आस्थाने कंटाळवाणा चेहरा करत गोळ्या घेतल्या आणि म्हणाली, 

“प्रसाद, आजचा कार्यक्रम छान झाला ना! सगळ्यांनीच छान एन्जॉय केल” 

“हो यार, या पार्टीच्या निमित्याने का होईना घरात चैतन्य आलं. बंगला हसू लागला. आस्था, किती भुर्रकन हि मधली वर्षे उडून गेली ना!  राणी, आपल्या लग्नाला बारा वर्ष झाली. खरंच वाटत नाही.  आपलं एवढं वय झालंय?”

आणि तो तिच्याकडे पाहून मिश्किलपणे हसला. आस्थानेही मान डोलावून दुजोरा दिला.  

“अगदी खरंय रे, असं वाटतं कि आताच सारं काल परवा घडलेल्या घटना. किती मस्त होते ना ते कॉलेजचे दिवस!”

आणि बोलता बोलता आस्था जुन्या आठवणीत रमून गेली. 

आस्था आणि प्रसाद यांची ओळख अभियांत्रिकी  कॉलेजपासूनची. दोघेही प्रचंड हुशार. आस्था दिसायला खूप सुंदर. गोरा रंग, लांब केस, चाफेकळी नाक, नाजूक गुलाबी ओठांच्या पाकळ्या. प्रसादला तर ती पाहता क्षणीच आवडली होती. सुरुवातीला मैत्री झाली. आणि मग हळुहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.  प्रसादनेच तिला आधी प्रपोज केलं. सुरुवातीला नाही म्हणणारी आस्था  कधी त्याच्या प्रेमात पडली तीचं तिलाच समजलं नाही. आणि एक दिवस सर्वांसमोर तिने प्रसादच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि तिचा होकार त्याला कळवला. 

मग काय! प्रसाद एकदम ‘सातवें आसमान पर.’ आता  कॉलेजमध्ये, लायब्ररीत, कँटीनमध्ये, कॉलेज कट्यावर सर्वत्र एकत्र दिसू लागले. बाईकवरून रपेट, रानावनात भटकंती, हॉटेलिंग, शॉपिंग प्रत्येक ठिकाणी आस्था आणि प्रसादची लैला मजनूची  जोडी दिसू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. 

दिवस छान सरत होते. आता दोघेही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. परीक्षेला एक दोन महिनेच उरले होते. एक दिवस आस्था प्रसादला म्हणाली,

“प्रसाद, आता आपल्याला करियरच्या दृष्टीने विचार करायला हवा. कॉलेज कॅम्पस मधून मुलाखतीं पण सुरू झाल्यात. चांगले जॉब्स मिळाले की आपल्या विषयी घरी सांगता येईल. आणि आपली आपण दोघांनी जी भविष्याची स्वप्नं पाहिलीत ती पूर्ण करता येतील. तेव्हा आता आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायला हवं. आता फक्त अभ्यास एके अभ्यास. समजलं का तुला प्रसाद?”

आस्था निक्षून सांगत होती. प्रसादलाही तिचं म्हणणं पटलं आणि तो म्हणाला,

“अगदी बरोबर आहे ग, आता आपण अभ्यासावर फोकस करू. चांगले मार्क्स मिळवू. नोकऱ्या मिळवू. आणि मग घरी आपल्या बद्दल सांगून टाकू. आपल्या घरचे खुश होतील आणि आपलं लग्न लावून देतील. मग आपण आपल्या सुखी संसाराला सुरुवात करू. दोन चार वर्षातच आपली दोन-तीन मूलं असतील. तू आई आणि मी बाबा होईन.” 

“अरे, ए शेखचिल्ली, स्टॉप.. स्टॉप.. ब्रेक दे जरा तुझ्या गाडीला. कुठे पोहचलास तू? हे म्हणजे असं झालं,‘बाजारात तुरी आणि घरात भट भटणीला मारी’ वेडा आहेस तू..”

आस्था प्रसादाच्या बोलण्यावर खळखळून हसली. प्रसादही हसू लागला. 

“पण माझं हे स्वप्नं मी नक्कीच पूर्ण करणार. बघच तू आस्था” - प्रसाद

“ओके बाबा. तू म्हणशील तसं. आता तरी अभ्यास करूया ना?”

आस्थाने प्रसादच्या डोक्यात चेष्टेने टपली मारली. प्रसादने होकारार्थी मान डोलावली. पुढे दोन महिने दोघेही परीक्षेच्या, कॅम्पस मधल्या मुलाखतीच्या तयारीत गुंतले गेले. दोघांनीही खूप अभ्यास केला.रात्रंदिवस मेहनत घेतली. एकमेकांशी जास्त बोलणं नाही. कॉल्स कमी, भेटीगाठी कमी, बाहेर वेळ घालवणं पूर्णपणे बंद केलं.फक्त अभ्यास सुरू होता. परीक्षा सुरू झाल्या. दोघांनाही छान पेपर जात होते. परीक्षा संपल्या आणि दोघांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. खरंतर आस्था आणि प्रसाद या दोघांनी मिळून पाहिलेल्या स्वप्नांना त्यांना योग्य दिशा द्यायची होती. आणि तेच त्यांचं ध्येय होतं. कॉलेजच्या कॅम्पस मधून आधीच दोघांचीही चांगल्या मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली होती. आता दोघे निकालाची वाट पाहत होते. पेपर तर छान गेले होते पण  निकालावर नोकरी मिळणार की नाही हे बरंचसं अवलंबून होतं. 

सरते शेवटी निकालाचा दिवस जवळ आला. दोघांचाही हृदयाची धडधड वाढली होती.  ऑनलाईन रिझल्ट जाहीर होणार होता. आस्था लॅपटॉप घेऊन कॉलेजची वेबसाईट पुन्हा पुन्हा ओपन करून पाहत होती. दुपारी तीन वाजता निकाल जाहीर होणार म्हणून आधीच माहीत असताना तरीही आस्था आधीच निकालाची वाट पाहत बसली होती. दोघांचेही नंबर तिच्या हातात होते. देवाच्या धावा करत होती आणि अखेरीस निकाल जाहीर झाला. तिने आधी प्रसादचा नंबर चेक केला आणि मग स्वतःचा. तिच्या चेहरा आनंदाने उजळून निघाला. आस्था आणि प्रसाद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. तिने आनंदाने प्रसादला कॉल केला.

“हेय प्रसाद, अभिनंदन डियर.. आपण पास झालो तेही फर्स्ट क्लास मध्ये. मस्त ना.!. प्रसाद आपलं एक स्वप्न पूर्ण झालं रे! मी खूप आनंदात आहे.”

ती आनंदाने भरभरून बोलत होती. डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते. 

“काय सांगते यार.. खरंच? आपण पास झालो. व्वा छानच! तुझेही खूप अभिनंदन.. आता चल भेट लवकर.. आणि पार्टी दे.. सेलिब्रेशन तो बनता है ना यार!!” - प्रसाद

“हो नक्कीच, आज संध्याकाळीच भेटू.. आपण कोणाची उधारी ठेवत नाही बाबा.. ये लवकर.. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे“

सुरुवातीला खळखळून हसणारी आस्था शेवटी थोडी गंभीर झाली. संध्याकाळी भेटण्याची जागा आणि वेळ ठरवून तिने  कॉल ठेवून दिला.

पुढे काय होतं? आस्था आणि प्रसाद यांची स्वप्नं पूर्ण होतील का? पाहूया पुढील भागात..

© निशा थोरे

0

🎭 Series Post

View all