Login

अंत भाग- 3

Gosht eka kutumbachi


सायली जोशी
टीम कोल्हापूर
कथामालिका विषय: कौटुंबिक कथा
शीर्षक: अंत भाग -3

झाल्या प्रकारानंतर पंत शांतच होते. आपल्या  खोलीतून फारसे बाहेर पडत नव्हते आणि कोणाशी जास्त बोलतही नव्हते. वसुधाबाईंची महेशकडून चौकशी मात्र रोज करत होते.

वसुधाबाईंना थोडं बरं वाटू लागलं, तसं त्यांनी महेशला आणि मेघनाला बोलावून घेतलं आणि कीर्तीसाठी स्थळ पाहायला सुचवलं. 'आपल्या
एकुलत्या एका मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं' अशी वसुधाबाईंची इच्छा होती.
महेशने पंतांच्या कानावर हे सारे घातले. त्यांनीही होकार दिला आणि कीर्तीसाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली. तशा कीर्तीच्या फारशा अपेक्षा नव्हत्या. फक्त 'सुयोग्य स्थळ मिळावं' अशीच तिची इच्छा होती.
कीर्ती पंतांची 'लाडकी लेक' होती. त्यांची काळजी घेणारी, प्रसंगी पंतांसोबत वाद घालू शकणारी.  पंतांना आपला एकुलता एक जावई श्रीमंत असावा, त्याच मोठं घर असावं, घराणं बडं असावं असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी आपल्या मनातल्या इच्छा कोणाला बोलून दाखवल्या नाहीत.

साधारण दोन -तीन स्थळ पाहिल्यानंतर कीर्तीसाठी जवळच्या शहरातलं एक स्थळ चालून आलं. स्थळ पंतांच्या अपेक्षेप्रमाणे होतं. घरात साऱ्यांना पसंतही होतं.
खरं तर मुलाकडील मंडळींना कीर्ती पसंत होती. केवळ औपचारिकता बाकी होती. आता सगळचं जुळून आलं म्हणताना, वसुधाबाईंनी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आणि रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला.
पंत, 'वसुधा आपल्याला परवानगी विचारते का' हे पाहण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण वसुधाबाईंनी महेशकडून पंतांना निरोप धाडला, 'साऱ्यांना हे स्थळ पसंत आहे, चौकशी केली तसा मुलगाही उत्तम आहे, घराणं चांगल आहे. कृपया मोडता घालू नका."
हे ऐकून पंतांना आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याला 'डावलल्याची ' भावना झाली.

निंबाळकर मंडळी रविवारी ठरल्यावेळी देशमुखांच्या घरी हजर झाली. चहा -पोह्याचा कार्यक्रम पार पडला आणि कीर्ती आणि धीरज मोकळ्या वातावरणात बोलायला म्हणून घराबाहेर आले. खरं तर पंतांना त्यांना असं बाहेर पाठवलेलं अजिबात आवडल नाही. ते बसल्या जागी चूळबूळ करू लागले. आपल्याकडे ही रीत नाही म्हणून! पण नव्या पाहुण्यांपुढे उगीच वाद नको,  म्हणून ते गप्प बसले. शिवाय वसुधाबाईंचे शब्दही त्यांना आठवत होते..'कृपया कार्यात मोडता घालू नये.'

जांभळ्या रंगाची, नाजूक काठाची साडी नेसलेली कीर्ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर केसांच्या बटा विसावल्या होत्या, त्या बाजूला करताना तिची होणारी धडपड पाहून धीरजच्या हृदयाची धडधड वाढत होती. काजळाची बारीक रेष ओढलेले तिचे डोळे अधून - मधून उंचपुऱ्या, देखण्या धीरजच्या नजरेचा वेध घेत होते.
बराच वेळ दोघांना काय बोलावे हे सुचत नव्हते. शब्दांची जुळवाजुळव करण्यातच त्यांचा बराच वेळ गेला.

इतक्यात मेघना आणि प्रिती या दोघांना शोधत घराच्या मागच्या बाजूला आल्या. त्या दोघींच्याही चेहऱ्यावर खट्याळ हसू होते.
"बोलून झाले असेल तर जायचे का?" मेघना कीर्ती कडे पाहत म्हणाली. तशी कीर्तीने धीरजकडे न पाहताच मान हलवली. क्षणभर त्याच्याकडे पाहून न पहिल्यासारखे करत ती मेघना आणि प्रीतीच्या मागे जाऊ लागली.
धीरज मात्र ' बोलायचे राहूनच गेले' अशा नजरेने कीर्तीकडे पाहत राहिला.

"मग..धीरजराव पसंत आहेत का आमच्या नणंद बाईंना?" जाता जाता प्रीती आपल्या खास ठेवणीतल्या आवाजात म्हणाली. तशी कीर्ती छान लाजली.
"होकार काय प्रत्यक्ष आमच्या तोंडूनच ऐकावा लागतो का? लाजूनही व्यक्त होतो तो!" मेघना पंतांची नक्कल करत म्हणाली. तसे कीर्तीने तिच्याकडे पाहात डोळे मोठे केले. त्याक्षणी मेघनाने आपले कान पकडले आणि तिघीही हसू लागल्या. कितीतरी दिवसांनी तिघी अशा मनमोकळ्या वातावरणात हसत -खिदळत होत्या आणि धीरज गालातल्या गालात हसत त्यांच्या मागोमाग येत होता.
दोन्ही बाजूंचा बसल्या बैठकीत होकार आला आणि देशमुख आणि निंबाळकरांची सोयरीक पक्की झाली.
वसुधाबाईंनी ही आनंदाची बातमी आपल्या जाऊबाईंना पत्राद्वारे कळवली आणि त्यांना साखरपुडा आणि लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण दिले.

आता मेघना आणि प्रितीच्या उत्साहाला उधाण आले. साखरपुडा तर निंबाळकरांच्या घरी होणार होता. मग लग्नाची जबाबदारी महेश आणि सुहासने घेतली आणि जोरदार तयारी सुरू झाली.
पंतही आपला सारा राग विसरून घरात वावरू लागले. अधून -मधून त्यांचे नियम, शिस्त डोकावू पाहत होती. पण आनंदात सारेच त्याकडे दुर्लक्ष करत होते.

वसुधाबाईं खुश होत्या. पण लेक आता सासरी जाणार या विचाराने त्यांचे मन कासावीस होत होते. मधूनच त्यांचे दुखणे डोके वर काढे. मग मेघना आणि प्रितीच्या सक्तीच्या आरामात त्यांना राहावं लागे. पण कीर्तीच्या लग्नामुळे दोनच दिवसात त्यांचे सारे दुखणे पळून जाई.

साखरपुड्याची तारीख जवळ आली, तशी लगबग सुरू झाली. साड्या,मानपानाच्या भेटवस्तू परस्परांच्या अंगठयांची खरेदी झाली. पंतांनी स्वतः आपल्या जावयासाठी कपड्यांची खरेदी केली. हळूहळू पंतांचा बदलणारा स्वभाव साऱ्यांच्या लक्षात येत होता. पण यावर विश्वास ठेवणे साऱ्यांनाच थोडे कठीण जात होते.

शहरात, निंबाळकरांच्या घरी धीरज आणि कीर्तीचा साखरपुडा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पण दणक्यात पार पडला.

शहरातील गुळगुळीत रस्ते, धावणाऱ्या गाड्या, उंच इमारती, कामानिमित्त पळणारी माणसे, त्यांचे राहणीमान आणि निंबाळकरांचे भले मोठे घर पाहून वसुधाबाईंना आनंद झाला. त्यांचे स्वप्न कितीतरी वर्षांनी पूर्ण होत होते. त्यांच्या चेहऱ्या वरचा आनंद पंत नकळत टिपत होते. 'आपली लेक सुयोग्य घरी पडली' याचा दोघांनाही जास्त आनंद झाला होता.
लेकीची आणि जावयाची 'सुरूप जोडी 'पाहून वसुधाबाईंना उगीचच वाटून गेले की, त्यांचा लग्न सोहळा पाहणे आपल्या नशिबी आहे की नाही, काय माहीत? आता' मुहूर्ताची ' थोडी गडबड करावीच!

क्रमशः

🎭 Series Post

View all