आपणच आहोत आपल्यासाठी : भाग १

प्रेमाच्या नात्याची एक सुंदर कथा!
"काव्या काहीतरी बोलं अगं, गेले पंधरा मिनिटे फक्त मी एकटाच बडबडतं आहे, मला कमीतकमी हे तर कळायला हवं ना की समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला आहे की बंद केला आहे ते."

"फोन ठेवला नाहीये मी ऐकत आहे. मला इतकंही रूडली बिहेव नाही करता येत तुझ्यासारखं." अखेर पंधरा मिनिटांनी काव्या बोलली तेव्हा कुठे मानसला जरा हायस वाटले.

" हुश्श! मला वाटलं बहुतेक आज फोनवर मी एकटाच बोलणार आहे. समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती आहे आणि ती फक्त ऐकतेयं असं वाटतं होतं इतकावेळ पण आत्ता माझी कम्प्लेंट ऐकू आली तसे लक्षात आले समोर माझीच होणारी बायको आहे. " मानस पुन्हा मिश्किलपणे बोलला आणि हसायला लागला.

"ह्म्म तेच तर खूप कम्प्लेंट करते ना मी अलिकडे मगं नको बोलत जाऊ माझ्याशी तू. मी ठेवते फोन. "

"अरे मला तसं नव्हतं म्हणायचं मी फक्त विषय आणि तुझा मुड बदलायचा प्रयत्न करत होतो डिअर " मानसने काव्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

"मानस ऐकं ना मला आत्ता खरंच नाही बोलायचं तुझ्याशी, आपण नंतर बोलूयात मी ठेवते फोन..बाय.. गुड नाईट! " असे म्हणतं काव्याने नाराजीनेच फोन ठेवला तसा मानस ही नाराज झाला थोडा.

'हे कायं झालं आहे काव्याला अलिकडे? गेल्या काही दिवसांपासून आमचा जेव्हाही फोन होतोय सतत मतभेद नाहीतर वाद सुरू आहेत. नक्की कायं चुकतयं?' मानस विचार करायला लागला इकडे काव्याच्या डोळ्यातून मात्र अश्रूंनी केव्हाच बरसायला सुरूवात केली होती.

*******

काव्या आणि मानस, एकमेकांसाठी अनुरूप आणि सर्वांना लाजवेल अशीच गोड जोडी. एका विवाह संस्थेमार्फत त्या दोघांची ओळख झाली होती आणि एकमेकांना समजून घेऊन त्यांनी होकार दिला होता.
आठ महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता आणि सुरूवातीला एकमेकांसाठी असलेले अनोळखीपण दूर होऊन त्यांच्या नात्याचा प्रेमाचा सुंदर प्रवास सुरू झाला होता. एकाच शहरांत नसल्यामुळे त्यांची भेट तशी कधीतरी महिन्यांनी तर कधी तीन - चार महिन्यांनी व्हायची पण फोनवर मात्र बोलणे चालूच असायचे.

सुरूवातीला गोड गोड होणार्‍या गप्पा हल्ली मात्र वादात रूपांतरित झाल्या होत्या. प्रत्येक फोन नंतर दोघांमध्ये फक्त गैरसमज वाढायला लागले होते. अगदी काही वेळापूर्वीही काव्याने नाराजीनेच फोन ठेवला होता.

********

रात्री जेवणं झाल्यावर मानसने साडेदहा वाजता पुन्हा एकदा फोन करून पाहिला काव्याला पण काव्याने फोन उचलला नाही तेव्हा मानसने तिला मेसेज केला.

'काव्या हे बघं तुला माझ्या कुठल्याही बोलण्याचा राग आला असेल खरंच सॉरी! प्लीज जे काही आहे तुझ्या मनांत ते बोलून मोकळी हो गप्प बसण्यामुळे नात्यात अढी निर्माण होऊ शकते फक्त बाकी काही नाही.
तुला जेव्हा कम्फर्ट वाटेल तेव्हा बोलं पण हे असं नको वागू
आपल्याला आपलं नातं असं नको आहे ना यार! '

काव्याने मानसचा मेसेज पुन्हा पुन्हा वाचला पण काहीच उत्तर दिले नाही त्यावर आणि फोन बाजूला ठेवून ती विचार करायला लागली.
' मी बोलतेयं ते कुठे पोहचते तुझ्यापर्यंत असेही. माहीत आहे मी झोपत नाही लवकर पण एखादा फोन नाही करता आला. ' काव्या स्वतःशीच बडबडत होती आणि इतक्यात तिचा फोन वाजला.

"हॅलो काव्या मला माहीत आहे तु झोपली नाहीये अजून ते." समोरून मानसचे बोलणे ऐकून क्षणापूर्वीचं आलेला विचार काव्याला आठवला आणि तिला कायं बोलायचे ते कळलेच नाही.

"काव्या हे असं कायं गं बोलं नाऽऽऽ" मानस कळवळून म्हणाला.

"ह्म्म्म ऐकतेय मी"

"नुसते ऐकू नकोस बोल गं काहीतरी प्लीज मला तुझी ही शांतता आता सहन होत नाहीये." मानस जरासा मोठ्याने बोलला.

"तुला माझे बोलणे तरी कुठे आवडते ना हल्ली?
खरंतर तेवढा वेळ ही नसतो ना तुझ्याकडे की बोलणे ऐकून घ्यावे, समजून घ्यावे. सारखं फक्त काम आहे, मिटींग आहे. मला कुठे काही काम असते मी रिकामीच असते चौवीस तास हो ना? " काव्याचा संयम संपला.

"बास! काहीही कायं अर्थ घेत आहेस. काव्या तु रिकामी आहेस असे म्हणणे नाही माझे तु उगाचचं गैरसमज करून घेतेय. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आत्तापर्यंत आपण आपलं नातं इतकं छान जपलं आहे मगं आत्ता कायं होतं आहे?
सतत इतक्या कम्प्लेंट म्हणजे एक - दोन वेळा ठीक आहे. मी तुला तरीही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय.

आत्ता गेल्या काही दिवसांत जे बोलणे झाले तेव्हा देखील तुझं नाराज राहणं, नीट न बोलणं सगळं असचं चालू आहे. तु बघं एकदा विचार करून मी हल्ली कितीतरी वेळा रात्री आपल्यात वाद झाल्यावर तुला दुपारीही फोन केला आहे पण तरीही तुला काही ऐकूनच घ्यायचे नाही.

अरे बास ना यार! मी थकलो आहे तुला समजून घेताना म्हणजे अजून किती प्रयत्न करायचा मी? सतत आपलं तुला कायं वाटतयं, तु नाराज झाली आहेस का? तुला राग आला आहे का? हेच वाटतं राहतं.

मला पूर्वी बोलताना खूप आनंद असायचा किंवा छान वाटायचं तुझ्याशी बोलताना हल्ली असं वाटतं राहतं की कोणीतरी मला खूप प्रेशर देत आहे, हल्ली मला ओझं वाटायला लागलं आहे.

काव्या आपला साखरपुडा झाला मान्य आहे कदाचित मी जे काही बोलतोय ते तुला विचित्र वाटेल पण मला वाटतयं आपण थोडं थांबूयात का? नाही म्हणजे आत्ताच इतके वाद होत आहेत आणि याचा दोघांनाही त्रास होतोय पुढे जाऊन उगाचचं त्रास करून घेण्यात कायं अर्थ आहे नाही का? " मानस मनातले सगळे बोलून झाला. त्याच्या मनात जे काही साठले होते ते बाहेर आले होते पण त्याचे बोलणे ऐकून काव्या अगदीचं सुन्न झाली होती.

क्रमशः

मानसच्या बोलण्याचा काव्यावर कायं परिणाम होईल? लग्न होण्यापूर्वीच त्यांच्या नात्याचा शेवट होईल का हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all