आपणच आहोत आपल्यासाठी : भाग २

प्रेमाच्या नात्याची एक सुंदर कथा!
मानसचे बोलणे ऐकून काव्या अगदीचं सुन्न झाली होती.
"काव्याऽऽ" समोरून फोनवर काव्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे पाहून मानसने काव्याला आवाज दिला तेव्हा एक अस्पष्ट असा हुंदक्यांचा आवाज त्याला ऐकू आला.

"तु रडतेयं?"

"कायं करायचंय तुला त्याच्याशी? मी रडेल नाहीतर काहीही करेल तुला खूप ओझं वाटतं आहे ना, खूप त्रास होत आहे घे तू ब्रेक घे." काव्या हुंदका देत देत बोलू लागली.

"अरे यार काव्या ऐक नाऽऽऽ ते मी चुकून रागाच्या भरात म्हणजे मला तसे नव्हते म्हणायचे " मानस काव्याला स्पष्टीकरण द्यायला लागतो.

"खूप बोललास तू, आता फक्त मी म्हणतेय तेच ऐकून घ्यायचं शांतपणे.
मानस इतक्या लवकर विश्वास तुटला का रे तुझा आपल्या नात्यावरचा? रागात का होईना पण तू बोललास म्हणजे ते कधीतरी मनात आलेले ना तुझ्या. आज आपण दोघे नाही तर आपलं नातं मला कुठेतरी हरल्यासारखं वाटतं आहे.

मानस सगळ्यात पहिले आपण एकमेकांचे मित्र आहोत ना? आपल्या दोघांमध्ये एवढा तर कम्फर्ट झोन आहे की आपण एकमेकांशी सगळे काही बोलू शकतो बरोबर बोलतेय ना मी? "

" हो काव्या " मानसने काव्याच्या प्रश्नावर उत्तर दिले.

" मगं सध्या तो कम्फर्ट झोन ती मैत्री कुठे हरवली आहे मानस? तुझी प्रमोशन परिक्षा होईपर्यंत तुला लग्न करायचे नव्हते थांबायचे होते आणि तुझ्या या निर्णयात तुला साथ मी अगदी मनापासून दिली. तुझी स्वप्न, तुझी जिद्द सगळे अगदी मनापासून समजून घेतले एक मैत्रीण म्हणून हे तर तू ही मान्य करतोय ना? "

"हो काव्या मी कितीवेळा तरी बोललोय की तुझ्यासारखं मला कोणीही समजून आणि सांभाळून नाही घेऊ शकतं." मानस काव्याचे कौतुक करतो.

"मगं मानस जर हीच वेळ माझ्या बाबतीत येतेय आता तर तू का नाही समजून घेऊ शकतं एखाद्या मैत्रीणीसारखं मला?

मानस मला मान्य आहे हल्ली मी खूप कम्प्लेंट करतेय वेळ देत नाहीये तू म्हणून पण सुरुवातीला तुला एखाद्या दिवशी फोन करायला नाही जमले तर राहू दे आपण उद्या बोलूयात', असे म्हणून समजून घेणारी तीच मुलगी आता तुला वेळेवरून तक्रार करतेय म्हणजे काहीतरी चुकत असेल ना तुझे?

सुरूवातीला आपल्या दोघांमध्ये मैत्री होती फक्त पण आता प्रेमाचा प्रवास सुरू झाला आहे तुझ्यासोबत फार काही मोठ्या अपेक्षा नाहीत माझ्या फक्त छोट्या छोट्या इच्छा आहेत. एकतर आपल्यात हा इतका दुरावा आहे.

तू काम संपले की अभ्यासात गुंतलेला असतोस तुला माझी आठवण येतच नाही असे म्हणणे नाही आहे माझे पण माझं काम संपल्यानंतर रात्री एकदातरी तुझ्याशी बोलणं व्हावं वाटतं फोन किंवा मेसेजवर तेवढाच तर आधार आहे आपल्याला.

हे बघं आपले लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप आहे त्यामुळे भेट खूप कमी होते पण कधीकधी खूप ओढ लागून राहिलेली असते. एखाद्या वेळी मला फक्त तुझ्याशी बोलायचं असतं, तू माझा होणारा नवरा आहेसच पण त्या अगोदर माझा मित्र, माझा प्रियकर तुच आहेस ना सगळे काही मगं मी 'मला वेळ दे', असा हट्ट तुझ्या जवळच करणार ना?" काव्या तिच्या मनात साचलेले बोलत होती.

"हो काव्या मला कळतंय तुला कायं म्हणायचे आहे ते. तुझ्या भावना अगदीचं समजू शकतो मी. कामात असतो गं पण मलाही आठवण येते कधीकधी पण मला हे खूप छान वाटतं की तू कायम माझ्या सोबत असतेस, माझ्या कुठल्याही निर्णयात तू मला साथ देतेस अगदी पूर्णपणे.

काव्या मला माहीत आहे आत्तापर्यंत तू मला खूप समजून घेतलं आहेस. मला जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केलास आणि स्वतःमध्ये वेळोवेळी तसे बदल देखील करत आली आहेस तू. आजपर्यंत मला खरोखर हेवा वाटतो तुझा याबाबतीत पण खरं सांगू काव्या मला वाटतयं आता कुठे एकमेकांशी आपल्याला खरी ओळख होतं आहे सोबती म्हणून म्हणजे बघं ना सुरूवातीला तितकासा न बोलणारा मी, हल्ली साधे नवे सॉक्स घेतले तरी तुला सांगतो आणि तू सुद्धा अगदी हक्काने हट्ट करतेस.

पूर्वी आपल्या नात्यात एक अवघडलेपणा होता आता त्या अवघडलेपणाची जागा अधिकाराने आणि प्रेमाने घेतली आहे पण कायं होतं आहे मला ना
'तू सतत हे असंच कर वैगेरे बोलतेस किंवा कधीतरी मला काही कळत नाही' असे जेव्हा वारंवार तुझ्याकडून ऐकायला मिळते तेव्हा प्रेशर आल्यासारखे होत आहे. तू केलेस स्वतःमध्ये बदल मला थोडा वेळ लागतोय मला नाही जमतयं असे पटकन बदल करायला. तू खूप बळजबरी करतेय असं वाटतं मगं वाद होतात आपल्यात हल्ली आणि कदाचित म्हणून वाटलं मला की आपण... "


" कायं आपण थांबूयात इथे? " काव्याने मानसचे बोलणे मधेच तोडले आणि येणारा हुंदका आवरला.

" काव्याऽऽऽ " मानसने तिचा हुंदका ऐकून प्रेमाने तिला साद दिली.


क्रमशः

मानस आणि काव्याच्या या लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीप मुळे त्यांचे नाते इथेच संपुष्टात येतेय की त्या नात्याचा एक नवा प्रवास सुरू होतोय हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all