आपणच आहोत आपल्यासाठी : भाग ३ (अंतिम भाग)

प्रेमाच्या नात्याची एक सुंदर कथा!
"काव्याऽऽ" मानसने पुन्हा एकदा काव्याला प्रेमाने हाक मारली.

"मानस थांबूयात इथे? किती सहजपणे बोललास तू. आज तुझं हे बोलणं मला अजिबात आवडलं नाही. खूप दुखावलं आहेस तू मला आज.

'अगं अरेंज मॅरेज असलं तरी कायं झालं आपण आपलं नातं छान जपायचं, बघ तू आपण सगळ्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना दाखवून देऊया की भलेही लॉन्ग डिस्टन्स आहे पण आमचे नाते सगळ्यांपेक्षा खूप खास आहे असे तुच म्हणायचा मानस'

आत्तापर्यंत आपण एकमेकांना छान समजून घेतले आहे पण आता कुठेतरी चुकतयं सगळचं. मानस मला मान्य आहे मी तक्रार करतेय म्हणून पण अरे हा जो आत्ताचा काळ आहे तो आपल्या दोघांसाठीही अगदीच खास आहेच पण तितकाच नाजूक देखील आहे.

मानस अरे साखरपुडा ते लग्न खूप सुंदर प्रवास असतो, मी तुझ्या विश्वासावर माझं संपूर्ण आयुष्य काढणार आहे पण मगं हल्ली कायं होतं आहे माहीत आहे का, मला ना तू पूर्वी वेळ द्यायचा तसा देत नाहीयेस, मगं मनात भीती वाढत जाते रे की लग्नानंतर तू असाच मला वेळ नाही दिला तर.

मला फार काही नकोय मानस फक्त थोडसं प्रेम आणि वेळ हवा आहे आणि हल्ली तुझ्या बद्दल ओढ देखील जास्त वाटतं आहे ना. मला कायम वाटतं की तू ती ओढ समजून घ्यावी, माझ्या भावनांना समजून घ्यावं पण हल्ली मी जेव्हाही तुला म्हणत जाते की मला आठवण येतेय त्या त्या वेळी तू विषय बदलत जातो किंवा पूर्वी तू ऐकून घ्यायचा हल्ली मात्र तुला माझे काही बोलणे ऐकून घ्यायला वेळ नसतो मगं तुच सांग का नाही होणार माझी चिडचिड?

हे बघं मानस हे नातं तुला जितकं नवीन आहे तितकंच मला देखील आहे. आपण दोघेही या नात्यासाठी अजून नवखे आहोत पण आपल्या या प्रवासाची वाट कितीही खडतर असली तरीही कायम सोबत रहायचं आहे आपल्याला.

आता कुठे मला तू कळायला लागला आहे मानस. तुझी आवड निवड, तुझा स्वभाव हळू हळू लक्षात येऊ लागला आहे आणि याबरोबरच तुझ्या काही गोष्टी देखील नव्याने कळाल्या आहेत ज्या तू मला सांगितल्या नव्हत्या. तुझं पटकन राग धरणं, कधी कधी न विचार करता बोलणं आणि अती विचार करणं. छे छे या गोष्टी वाईट आहेत किंवा तू बदलायला हवं असा माझा अट्टाहास नाही आहे अगदीचं कारण या इतके दिवसांच्या सहवासात मला एक गोष्ट निश्चित कळली आहे ती म्हणजे या गोष्टी तुझ्या स्वभावात आहेत असे मी म्हटले म्हणून त्यात बदल होणार नाही.
मी तुला आता तुझ्या रागासहित स्वीकारले आहे मानस मगं तसेच तू मला माझ्या हट्टीपणासोबत स्वीकार नाही का करू शकणार रे?

आपल्याला आपलं नातं एकमेकांच्या सोबतीने पुढे न्यायचं आहे आणि मागे बोलताना तूच म्हणाला होता ना एकदा की, 'आपल्या दोघांत जे काही वाद होतील ते आपले आणि एकमेकांचे काही चुकत असेल तर आपणचं एकमेकांचे मार्गदर्शक होऊन एकमेकांना योग्य वाट दाखवायची आणि समजून घ्यायचं कारण कोणीही कितीही असलं तरी नवरा बायकोच हे नातं फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित असावं.

कधी नवर्‍याने बायकोचा वडील, मित्र होऊन तिला समजून घ्यावे तर कधी बायकोने देखील प्रेयसी होऊन नवर्‍याला प्रेम द्यावं.

मानस व्यक्ती म्हणून आपण दोघेही परिपूर्ण नाही आहोत पण एकमेकांच्या चुका काढून नातं संपवण हा काही उपाय नाही. व्यक्ती म्हणून आपण दोघेही परिपूर्ण नाही आहोत पण एकमेकांची अपूर्णता स्वीकारून आपण आपल्या प्रेमाला पूर्णत्व देऊ शकतो. शेवटी आपणचं आहोत ना आपल्यासाठी! " काव्याने एवढे बोलून एक उसासा घेतला आणि ती मानसच्या उत्तराची वाट पाहू लागली.

"आज माझी ती हट्टी आणि कधी कधी लहान मुलीसारखी वागणारी बायको फारच समजूतदारपणे बोलायला लागली आहे मला वाटतयं असं रोजच भांडायला हवं"

"मानसऽऽ " मानसने नेहमीप्रमाणे थट्टा केली तशी काव्या जोरात ओरडली.

"अगं हळू ना माझे कान आज अनंतात विलीन झाले असते. बरं सॉरी अगदी मनापासून खूप थट्टा केली पण तुझं बोलणं पटलं आहे गं मला. मी ही कुठेतरी कमी पडतोय तुला समजून घेताना. माझे काम तू समजून घेतेय तर मी ही तुझ्या भावना समजून घ्यायला हव्या शेवटी. असेही आपल्या आयुष्यात ही वेळ पुन्हा येणार नाही.

काव्या आपलं नातं खूप खास आहे म्हणून तर अंतर कितीही असले तरी फरक पडत नाहीये कारण कितीही वाद, मतभेद झाले तरी मी रागावलो की तू समजून घेतेस आणि मला समजावून सांगतेस आणि तू नाराज असली की मी तुला मनवतो, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो कारण दोघांसाठी बाकी सगळ्यांपेक्षा आपले नाते महत्त्वाचे आहे.

आजपासून मी तुला पूर्ण वेळ देईन आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न करेन काव्या. "

"मी सुध्दा थोडा हट्टीपणा कमी करेन."

"ह्म्म गुड बॉय! बरं मला माहीत आहे मगाशी नाराज झाली म्हणून जेवली नसशील तू फार, आता गरमागरम कॉफी कर बघू आणि मला व्हिडिओ कॉल करं. आज कॉफी डेट आहे माझी माझ्या बायकोसोबत. आता जास्त हसू नकोस तिकडे मला फोनवरून समजतंय गालांवर आलेली खळी.." मानस बोलला तशी काव्या इकडे अजूनच लाजली.

"मानस तू पण नाऽऽ आज फारच प्रेम ओतू येत आहे?"

"अरे का नाही येणार. वाद झाले की प्रेम अजून वाढतं आणि तुझ्यावर नाहीतर कोणावर प्रेम येणार वेडाबाई शेवटी आपणचं आहोत ना आपल्यासाठी! " मानसच्या या बोलण्यावर काव्या खुदकन हसली.

आज त्यांचे नाते नव्याने बहरले होते. एकमेकांच्या साथीचा आणि प्रेमाचा एक नवा अर्थ ही त्यांना उमगला होता.

*समाप्त*

प्रेम म्हणजे एकमेकांची अपूर्णता स्वीकारणं! खरंतर प्रेमाची यापेक्षा सुंदर आणि सहज व्याख्या कुठलीही नाही.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all