अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग ९

“अरे फुकट जिवानिशी जाशील.” साळवे खवळुन बोलले. “डिपार्टमेंटचा माणूस सोडला नाही तिने. तु काय चिज आहेस. चक्रम मुलगी आहे ती.” साळवे भावनेच्या भरात खूपच रागात बोलले.
मागील भागात.

साटम निवांत बसलेले असताना त्यांचा पोलीस स्टेशनमधला फोन वाजला होता. तो त्यांनी उचलला आणि त्यांच्या चेहर्‍यावर लगेच घाम सुटायला सुरवात झाली होती. ते पटकन तिथुन उठले आणि तडच डिएसपी साहेबांच्या ऑफिसला पोहोचले होते.

“असं कसं झाल?” साटम

“आता तिकडे गेल्यावरच कळेल.” डिएसपी साहेब “चला पटकन जाव लागेल. साळवे पण आहत ना या केसकर, त्यांनाही बोलावुन घ्या.”

तस साटमने साळवेला फोन करुन डायरेक्ट हायकोर्टात यायला सांगीतलं होत.

सकाळी जिल्हा न्यायालयात फाईल झालेली चार्जशीट दुपारपर्यंत उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आली होती. त्यानंतर लगेच संबंधीत केससंदर्भात असलेल्या सगळ्यांना बोलावण्यासाठी उच्च न्यायालयातून डिएसपी साहेबांना फोन गेला होता. मग डिएसपी साहेबांनी लगेच या केस संदर्भात असलेल्या सगळ्यांना फोन करुन यायला सांगीतलं होत. ही केस नक्की कोणी घेतली? हाच प्रश्न ह्या सगळ्यांनाच पडला होता.

आता पुढे.

दोन तासात ते सगळेच उच्च न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयात त्यांची चार्जशीट फाईल केलेल्या न्यायालयाच्या कक्षेत ते जाऊन थांबले. तिथल्या सरकारी वकीलांना ते आल्याची माहीती पुरवली. त्या सरकारी वकिलांनी लगेच न्यायालयाच्या क्लर्कला सांगीतले. तस थोड्याचवेळात ती केस परत बोर्डावर घेण्यात आली. नाव पुकारल्यावर ते सगळेच न्यायाधीशासमोर उभे राहीले.

“कसली काम करता साहेब.” न्यायाधीशसाहेब डिएसपी साहेबांना चिडुन बोलले होते. “अशा गंभीर केस मध्ये फक्त स्टेटमेंटच्या आधारावर चार्जशीट फाईल करता? पुरावे कोण गोळा करणार?”

“माय लॉर्ड आरोपी अजुनही हॉस्पीटलमध्ये आहे.” सरकारी वकील “त्यामुळे तो बरा झाल्यावर त्याच्याकडुन माहीती घेणारच आहे.”

“त्याच्या स्टेटमेंटवर सही आहे.” न्यायाधीशसाहेब ती सगळीच कागद बघत बोलले. “त्याला बोलता आणि लिहीता येत असं डॉक्टरच सर्टीफिकेट दिल आहे. मग त्याच्याकडुन माहीती घ्यायची सोडुन चार्जशीट फाईल करायची काय घाई होती? कोण आहे आय ओ?”

तसे इन्स्पेक्टर साटम पुढे आले. “साहेब ते खुपच प्रेशर होत.” साटम जरा चाचरत बोलले.

“तुम्ही एक पी एस आय आहात. कोणी लहान मुलगा नाही जे प्रेशरमध्ये याल.” न्यायाधीशसाहेब आता चिडुन बोलले. “डिएसपी साहेब?”

तसे डिएसपी साहेब पुढे आले.

“तुम्ही पण पाहीलं नव्हं काय?” न्यायाधीश साहेब

“बघीतली होती.” डिएसपी साहेब एवढचं बोलु शकले होते.

“शहरात एवढी मोठी घटन घडली तरी त्याच गांभीर्य काय? ते बघायच सोडून स्वतःचा हात मोकळे करायला मोकळे.” न्यायाधीश साहेब नकारार्थी मान हलवत बोलले. “ह्यावर आम्हालाच काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल.”

तस डिएसपी, साटम आणि साळवे तिघांनाही घाम फुटला होता. तेवढ्यातच एक करारी आवाज न्यायालयात घुमला.

“माय लॉर्ड.” ….

सगळ्यांच लक्ष त्या आवाजाकडे गेल. तसा डिएसपी साहेब, साटम आणि साळवे या तिघांना जरा धक्काच बसला होता. कारण तो कोणी छोटा मोठा माणुस नव्हता. तो राज्यातला प्रसिध्द क्रिमिनल वकिल साईराज म्हात्रे होता.

न्यायाधीशांच लक्ष साईराजवर गेल. “अजुन काय बाकी आहे वकीलसाहेब?”

“यांच्यावर जर प्रेशर होत तस दुसर्‍या पोलीस ऑफीसरवर पण येणारचं.” साईराज

“तुम्हाला जर पोलिसांच्या तपासावर शंका असेल.” न्यायाधीश साहेब “तर दुसऱ्या कोणा अधीका-याकडून तपासणी करण्यासाठीचा अर्ज तुम्ही करू शकता.”

तेवढ्यातच साईराज हातातल स्मार्ट वॉच वर वेळ बघण्याच्या निमित्ताने त्याला आलेला त्याने मेसेज वाचला. तो वाचून त्याच्या चेहर्‍यावरचं स्मित अजूनच गडद झालं.

“आम्हाला पोलिसांवर पुर्ण विश्वास आहे माय लॉर्ड.” साईराज गूढ हसत बोलला. “फक्त त्यांनी ते काम प्रामाणिकपणे करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे.”

“तुमच्या अशिलावर तुमचा खुपच विश्वास आहे?” न्यायाधीश साहेबांना आश्चर्य वाटलं होत.

“पोटासाठी कराव लागतं साहेब.” साईराज हसतच बोलला.

“जेवढं तुम्हाला ओळखतो त्यावरून तर अस वाटतं नाही.” न्यायाधीश साहेबही गुढ हसत बोलले. तसा साईराज ही हलकाच हसला होता.

बाकी जण तर फक्त न्यायाधीश साहेब आणि साईराज मधला चाललेला संवाद ऐकत राहीले होते.

उच्च नायालयातली ती केस आज बंद झाली होती. न्यायाधीशांनी संध्याकाळपर्यंत आदेश ही दिले होते. दुसर्‍या दिवशी टिव्हीवर परत तो जिल्हा बातम्यांमधून झळकायला सुरवात झाली.

“पोलिसांतर्फे न्यायालयात दाखल केलेली चार्जशीट उच्चन्यायालयाकडून रद्द. पोलीसांच्या हलक्या कामगिरीवर नाराज होऊन उच्च न्यायालयाचे त्यावर जोरदार ताशेरे.”

“आरोपी प्रसाद यांच वकीलपत्र प्रख्यात क्रिमीनल वकील साईराज म्हात्रे यांच्याकडे.”

“**** जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी दोन वर्ष काम केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून या जिल्ह्य़ात भैरवी इनामदार यांची नियुक्ती.”

“अचानक झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या बदलीने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात बराच गोंधळ.”

अशा बातम्या बघत साटम आणि साळवे डिएसपी साहेबांच्या ऑफीसमध्ये बसले होते. ते तिघेही डोक्याला हात लावून बसले होते. चार्जशीट रद्द म्हणजे त्यांना आता परत सुरवातीपासून काम कराव लागणार होत.

आता डिएसपी साहेब स्वतः जातीने लक्ष घालणार होते. त्यांनी मुख्य तक्रारदार मिस्टर मित्तल यांना त्यांच्या ऑफिसवर बोलावून घेतलं होत. तोपर्यंत ते साटम आणि साळवे सोबत चर्चा करत बसले होते.

थोड्याचवेळात मिस्टर मित्तल आणि परमार तिथे जाऊन पोहोचले होते. चार्जशीट रद्द झाल्याच त्यांनाही समजलं होत. त्याच टेन्शन ही त्यांना खूप आलं होत. मग ते जरा रागारागतच तिथे आले होते.

“असं कसं काम करता ओ?” मित्तल चिडून बोलले.

“आता तुम्ही आम्हाला काम शिकवणार.” साटम ही चिडून बोलले.

“मग चार्जशीट कशी रद्द झाली?” परमार

“रद्द झाली ते कळलं ना?” डिएसपी साहेब “मग ती केस कोणत्या वकिलाने घेतली ते ही समजलं असेलचं.”

“तुम्हीच काही तरी चूक केली असेल, ती वकिलाने दाखवली असेल.” परमार कुत्सीत हसत बोलला.

“तुमचीच घाई नडली आहे.” डिएसपी साहेब “वरून प्रेशर आणायची काय गरज होती तुम्हाला?”

“त्याशिवाय तुमची काम फास्ट होत नाहीत.” मित्तल चिडून हसत बोलले.

“नक्की तुमचा यात हात नाही ना?” साटम आता सांशक नजरेनेच त्यांना विचारत होते.

“एकदा सांगीतल ना नाही म्हणून.” मित्तल रागात बोलले. “आमच्याकडे तो कामाला आला होता. तेव्हाच त्याने त्या उपकरणाचा प्लॅन चोरला असेल.”

“तो प्लॅन तुमचाच होता. याचा पुरावा काय?” डिएसपी साहेब

“आता काय कॉम्प्युटर पण खिशात घालून फिरू का?” मित्तल भावनेच्या भरात बोलून गेले. “आधीच सांगायचं ना. मला काय एवढचं काम आहे का?”

“पोलिस स्टेशनला आहात याच भान ठेवा.” साळवे रागात बोलले. “नाहीतर…”

“नाहीतर काय?” मित्तल अजुनच रागाला आले. “तुम्हाला काम होत नसतील तर मला मग जिल्हा प्रमुखासोबत बोलाव लागेल.”

तसे ते तिघेही मित्तलच्या बोलण्यावर हसायला लागले होते.

“काय जोक मारला का मी?” मित्तल

“तुम्ही न्युज बघत नाही का?” डिएसपी साहेब हलकेच हसत बोलले. “जिल्हा प्रमुख बदलले साहेब.”

तसे मित्तल जरा गोंधळले. पण लगेच स्वतःला सावरत बोलले. “असु दे. मग मी मंत्री साहेबांपर्यंत जाईल.”

तसे साळवे अजून मोठ्याने हसायला लागले. त्यांना हसताना बघून डिएसपी साहेब आणि साटम एकमेकांकडे गोंधळून बघू लागले. तर मित्तल आणि परमार जरा घाबरायला लागले होते.

“सॉरी.” साळवे स्वतःला सावरत बोलले. “सॉरी ते मी विसरूनच गेलो होतो की जिल्हा प्रमुख कोण आहे ते.”

“कोण का असेना?” मित्तल “माझ्याकडून पुरावे आहेत.”

“तुम्हाला आता ही संधी आहे.” साळवे “काही चुकीच करत असाल तर आत्ताच कबूल करा.” आता साळवे चांगलेच गंभीर होऊन बोलले.

“तुमच्या हवालदाराला काही कळतं की नाही. वय झालं आहे त्यांच.” मित्तल डिएसपी साहेबाकडे चिडून बघत बोलले. “एकदा सांगीतल ना नाही म्हणून.”

“माझ वय झालं आहे.” साळवे आता चिडूनच बोलायला लागले. “ही केस उगाच पांढरी नाही झाली. समोरच्या माणसाकडे बघून लगेच कळतं की कोण खोट आणि कोण खरं.”

“आता हा माणुस जास्त बोलत आहे.” मित्तल परत डिएसपी साहेबांकडे बघत बोलले.

“साळवे स्वतःला आवरा.” डिएसपी साहेब साळवेंना शांत करत बोलले.

“अहो साहेब त्या मॅडमच्या हाता खाली काम केल आहे एका केस मध्ये.” साळवे आता विनंतीवजा कडक आवाजात बोलले. “तुम्ही अजून तिला निट ओळखत नाही.”

“तिचा काय संबंध?” मित्तल तुसड्यात बोलले. “तपास तर तुम्ही करणार ना?”

“अरे फुकट जिवानिशी जाशील.” साळवे आता खवळुनच बोलले. “डिपार्टमेंटचा माणूस सोडला नाही तिने. तु काय चिज आहेस. चक्रम मुलगी आहे ती.” साळवे भावनेच्या भरात खूपच रागात बोलले.

तसे ते डिएसपी साहेब आणि साटम त्यांना बघतचं राहीले होते. आजवर एवढं भडकून बोलताना त्यांना कधीच कोणी पाहीलं नव्हतं.

“साळवे.” डिएसपी साहेब आता कडक आवाजात बोलले.

“दोन वर्षापुर्वी फरार असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलो होतो. आठवतं का?” साळवे बोलले तसे डिएसपी साहेब आणि साटम दोघांनी होकारात मान हलवली होती. “त्या पीएसआय साहेबानां गुन्हेगारांनी गोळी मारली आणि ते जखमी झाले होते.”

“हो.” साटम “त्या गुन्हेगाराने गोळी मारल्यामुळचे तो कायमचा अपंग झाला ना.”

“गुन्हेगार जिवंत हवा ना गोळी मारण्यासाठी.” साळवेंनी बॉम्ब टाकला. तसा सगळ्यांनाच धक्का बसला. “आम्ही येण्याची खबरं आधीच त्याने त्या गुन्हेगाराला दिली होती. जस ह्या मॅडमला समजलं तिने डायरेक्ट त्यांच्या पायावर गोळ्या झाडल्या होत्या.”

हे सगळंच ऐकुन मित्तलला जरा घाम फुटला होता. परमारही खूपच टेन्शनमध्ये आले होते. डिएसपी साहेब आणि साटम ही टेन्शनमध्ये आले होते.

“तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते लवकरात लवकर आम्हाला आणुन द्या.” डिएसपी साहेब गंभीर आवाजात बोलले.

तसे मित्तल आणि परमार चरफडतच तिथून उठले आणि जाऊ लागले. जाता जाता मोकळ्या पॅसेजमध्ये थांबले.

“समजा आरोपीच नाही राहीला तर?” मित्तल गुढ हसत परमारकडे बघून बोलले. तस परमारांना हि हसायला आलं. “हॉस्पिटलमध्ये आपली माणसं आहेत ना?” मित्तल आसुरी स्मित करत बोलला.

तस परमारांनीही त्यांची मान होकारात हलवली. मित्तलचा इशारा समजून परमारांनी फोन लावायला सुरवात केली. तोपर्यंत मित्तल पटकन त्यांच्या कंपनीच्या ऑफीसकडे निघून गेले होते.

थोड्याचवेळात त्या डिएसपी ऑफीसमध्ये एकच धावपळ सुरू झाली. नवनियुक्त जिल्हा प्रमुख तिथे येत असल्याची बातमी तिथे मिळाली होती. ती तिथे येणार हे डिएसपी साहेबांना माहीतीच होत. पण एवढ्या लवकर येईल हे माहीती नव्हतं. तर दुसरीकडे साळवेंना ती येणार याची खात्रीच होती. कारण तिला हॉस्पीटलमध्ये मोबाईलवर कडाडताना बघूनच ती फक्त याचं केस साठी आली आहे याची जाणीव त्यांना झाली होती.

काही वेळातच भैरवी तिथून येऊन पोहोचली होती. ती डायरेक्ट डिएसपी साहेबांच्या ऑफीसकडे गेली. त्या दिवशी तर पंजाबी ड्रेसमध्ये होती. पण आज कडक युनिफॉर्म मध्ये होती. ती ऑफीसमध्ये जाऊन मुख्य खुर्चीवर विसावली. आजुबाजुला डिएसपी साहेब, साटम, साळवे आणि इतर पोलीस अधीकारी होतेच.

तिने डिएसपी साहेब, साटम आणि साळवे या तिघांवर नजर टाकली आणि बाकीच्यांकडे बघून बोलली. “तुम्ही जाऊ शकता.” तसा बाकीचा स्टाफ त्या ऑफीसमधून बाहेर पडला.

“आता इथे आपलीच माणसं आहेत.” भैरवी “असं समजू ना मी?” ती तिघांवर नजर टाकत बोलली.

“काय साळवे?” भैरवी तिची भेदक नजर त्यांच्यावर टाकत बोलली. जणु काही तिची ओळख आधीच करून दिली आहे ना? असं ती त्यांना विचारत होती.

“हो मॅडम.” साळवे अदबीने बोलला.

“मॅडम?” भैरवीने हसतच ओठ ताणले. “आज चक्रम नाही बोलणार का?”

तसे साळवे जरा चमकलेच. तिकडे डिएसपी साहेब आणि साटमला ही ठसका लागता लागता राहीला होता.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all