Login

आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे.

मुलांच्या चुकांवर पांघरूण घालू नये.
जगातील काही पालकांना आपली मुलं नेहमीच बाब्याच वाटतात पण दुसऱ्याची मुलं कार्टी वाटतात. त्यामुळे खरं तर असे पालक आपल्या मुलाला बिघडवायला कारणीभूत असतात, कारण मुलं ही मुलच असतात. कधीतरी  मस्ती, दंगा व मारामारी  करणारच पण आपल्या मुलाला बाब्या समजणारे पालक हे कधीच मान्य करत नाही की त्यांची मुलं दंगा व मारामारी करणारी आहेत.


               मुलं लहान असल्यापासून काही पालक त्यांना प्रत्येक गोष्टीशी पाठीशी घालतात. ह्याला खरतर प्रथम घरातुनच सुरवात होते. घरात एकुलत एक मूल असेल किंवा ते मूल घराचा वंशज म्हणजे मुलगा असेल‌तर त्याची प्रत्येक गोष्ट ऐकली जाते. त्याच्या प्रत्येक गोष्ट मान्य केली जाते. ती गोष्ट चुकीची असलीतरी.


                 ह्याचे एक उदाहरण म्हणजे माझ्या मुलाच्या शाळेत मला बघायला मिळाले. माझ्या मुलाच्या शाळेत एक मुलगा होता. तो अभ्यासात खूप हुशार होता तसेच  खूप मस्तीखोरपण होता. शाळेतल्या मुलांना मारायचा, दादागिरी करायचा. शाळेतल्या शिक्षकांनी त्याच्या पालकांना शाळेत बोलावले व त्याची तक्रार केली की त्याचे पालक काही केल्या आपल्या मुलाची चूक मान्य करत नसत. आपला मुलगा मस्तीखोर आहे. इतर मुलांना मारतो, दादागिरी करतो. हे त्याच्या पालकांना मान्य नसायचे.  मुलाची आई आपल्या मुलाची चूक मान्य करण्याऐवजी  शिक्षकांवर ओरडायची. तुम्ही माझ्या मुला विरोधात तक्रार कशी करता?  माझा मुलगा किती शांत व हुशार आहे. तो वर्गात नेहमी पहिला किंवा दुसरा येतो.  म्हणून ही इतर मस्तीखोर व अभ्यासात मागे असलेली  मुलच  त्याला त्रास देतात. मी माझ्या मुलाला चांगली ओळखते तो कोणाला मारण सोडा कोणावर ओरडतही नसेल. त्या पालकांच्या अशा वागण्यामुळे तो मुलगा शाळेत अजुनच मस्ती करायचा. त्याला माहीत झाले होते की शिक्षक त्याला ओरडले तरी त्याची आई त्याला पाठीशी घालणारच. अशा पालकांच्या पुढे शिक्षकांनाही गप्प बसावे लागते कारण मस्तीखोर व अभ्यासात मागे असणारे मुलांच्या  पालकांनी हे मान्यच करुन टाकलेलं असत.  आपली मुलं मस्तीखोर आहेत. आपली मुलं इतर मुलांना मारतात. आपल्या मुलाची चूक असू शकते. तसेच शिक्षक पण मस्तीखोर व अभ्यासात हुशार नसलेल्या मुलांची चूक असेल हे मान्य करतात. त्यामुळे मस्तीखोर मुलांनी कधीतरी चूक केली नसली तरी त्यांना शिक्षा होते.


                 आपल्या मुलाची कधीतरी  चूक असू शकते हे  मान्य न करता त्याला पाठीशी घालून पालक काय साध्य करतात? शहेच मला समजत नाही. कुठलेही पालक आपल्या मुलाला आयुष्यभर पुरु शकत नाही. कधीतरी आपल्या मुलाला आपल्या शिवाय बाहेरच्या जगात वावरायला प्रत्येक पालकांना पाठवावे लागणारच आहे. बाहेरच्या जगात तुमच्या चुकीला माफी नसते. तुमची चूक असेलतर ती तुम्हांला मान्यच करावी लागते.


                    प्रत्येक पालकांना आपलं मूल प्रिय असते. त्याच्या प्रत्येक  चुकीवर पांघरूण घालायचा ते प्रयत्न करतात व इतर मूल कशी चुकीची आहेत तू नेहमीच बरोबर असतो. हे दाखवत राहतात. पण त्यांच्या ह्या आपल्या मुलांच्या चुकीच्या गोष्टींवर पांघरुण घालण्यामुळे त्यांच्याच मुलांचे नुकसान होते. हे त्यांना कसं कळत नाही. त्यांच्या मुलांना आपण करु ते बरोबरच आहे असे नेहमी वाटते. बाहेरच्या जगात अशा मुलांना वावरताना खूप त्रास होतो. तिथे त्यांच्या चुकांना पाठीशी घालायला कोणीच नसते. त्यामुळे ते चिडचिडे होतात. एकटे पडतात. बाहेरच्या जगात त्यांची चूक कोणी त्यांना दाखवली तर ती ते चूक मान्य करत नाही. चूक मान्य करणे त्यांना त्यांचा अपमान वाटतो. काहीजण त्यामुळे  स्वतःला अपयशी समजतात. काही जण नैराश्य अवस्थेत जातात. काहीजण त्यामुळे आत्महत्या पण करतात.


                त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या  चुकांवर पांघरूण घालू नये. मुलांनी चुका केल्यातर त्यांना त्यांची चूक दाखवून द्यावी. वेळप्रसंगी त्या चुकीसाठी त्यांना शिक्षा पण करावी.


©️®️ ज्योती सिनफळ
0