Login

आपला तो बाब्या...

Family Drama

आपला तो बाब्या...

लघुकथा

©® सौ.हेमा पाटील.

"आली, महिना झाला नाही तरच आली पुन्हा. यावेळी तर मोठी बॅग घेऊन आली आहे. कायमचीच बहिणीकडे राहायला आली आहे
वाटतं."
सरलाताई आपल्या मुलीशी, सानिकाशी फोनवर बोलत होत्या.

"हो का? असेल कदाचित तसेच. सासरी काहीतरी झाले असेल." सानिका तिकडून म्हणाली.

" मग आपलेच घर दिसते का? भावाकडे माहेरी जावे ना!" सरलाताई आपला राग व्यक्त करत म्हणाल्या.

दोघी पुढे काही बोलणार तोच विधी बाहेर आली, म्हणून संभाषण तेवढ्यावरच थांबले.

विधीची बहिण श्रेया आज दुपारीच आपली भलीमोठी बॅग घेऊन विधीकडे आली होती. ते पाहून विधीच्या सासुबाईंना, सरलाताईंना समजून चुकले होते की, हिचा मुक्काम इथे बराच दिवस असणार आहे.

विधीने आपल्या बहिणीला अतिशय लाडावून ठेवले आहे असे सरलाताईंचे प्रामाणिक मत होते.' सासरी थोडेतरी सहन करावेच लागते, सगळेच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नाही. कुठेतरी आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. संसार असा तुझे- माझे करुन होतो का? माझेच खरे असे न म्हणता थोडे तुझे थोडे माझे असे म्हणत चालायचे असते. पण या आजकालच्या मुली...' असे विचार त्यांच्या मनात सुरू होते.

विधीने त्यांचे लेकीशी चाललेले फोनवरचे बोलणे ऐकले होते. तिला खूप राग आला होता. आत्ता दुपारी श्रेया तिच्या घरी आली होती. येताना ती आपले सगळे महत्वाचे सामान घेऊन आली होती. आईकडे जायचे तर वहिनी कुरकुर करते, म्हणून ती बहिणीकडे आली होती. इकडे सरलाताईंना ती आल्याचे आवडले नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होते.

"आपले घर म्हणजे धर्मशाळा आहे का? कुणीही यावे अन् राहावे यासाठी आहे का?" त्यांनी विधीला थेटच विचारले.

" कुणीही? ती माझी सख्खी बहीण आहे. प्राॅब्लेम आहे म्हणून ती आली आहे. उगाचच कशाला येऊन राहील ती?" विधी म्हणाली.

" या आजकालच्या मुलींकडे जरा म्हणून सोशिकपणा नसतो. आपले घर आहे म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच. एखादा शब्द कुणी बोलले तर सहन करावे, पण नाही. यांची अस्मिता जागृत होते. निघाल्या लगेच बॅग भरुन घराबाहेर." सरलाताई म्हणाल्या.

"आई, तुमचा काळ वेगळा होता, आता परिस्थिती बदलली आहे."
विधी म्हणाली .

" तरीही आजही बहुतांश मुलीच सासरी नांदायला जातात ना? की मुलगा येतो मुलीच्या घरी नांदायला?" सरलाताई म्हणाल्या.

यांच्या तोंडाला लागण्यात काही अर्थ नाही हे विधीला माहीत होते. त्यामुळे ती तेथून आत निघून गेली. ती काहीच उत्तर न देता आत निघून गेली, याचा सरलाताईंना खूप राग आला. तो राग त्यांनी विवेक घरी आल्यावर बाहेर काढला. त्याच्यासमोर त्या नको ते बोलल्या. त्याने शांतपणे सगळे ऐकून घेतले.

खरं तर विधीने त्याला ऑफीसमध्ये फोन करुन श्रेयाबाबत सगळे सांगून तिला काही दिवसांसाठी आपल्या घरी येऊ देत का? असे विचारले होते. त्याने होकार दिल्यावर तिने श्रेयाला आमच्या घरी ये असे सांगितले होते. आपली बडबड ऐकून तो काहीच उत्तर देत नाही हे पाहून त्यांच्या रागाचा पारा अजूनच चढला होता.

संध्याकाळी माधवराव घरी आल्यावर सरलाताईंनी त्यांच्यापुढे हाच पाढा वाचला. माधवराव दमून घरी आले होते. आल्या आल्या सरलाताईंची बडबड ऐकून ते वैतागले. ते म्हणाले,

"येऊदेत ना चार दिवस. काय बिघडते? तुला काही त्रास होतो का? की तुला तिची उठबस करावी लागते? विधी बघून घेईल ना! आणि अगदीच गरज पडल्याशिवाय कुणी असे कुणाच्या दारात जात नाही. श्रेया इंजिनिअर आहे. चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. हाॅटेलमध्ये रुम घेऊन राहायचे म्हटले तर तिच्यासाठी अवघड आहे का? अजिबात नाही. विधीनेच तिच्या काळजीमुळे तिला आपल्या घरी बोलावले असेल. किती त्रागा करतेस?"

"तुम्हाला ना, मीच नेहमी चुकीची वाटते. मी गेले होते का कधी, असे कुणाच्या घरी?" सरलाताईंनी आपले तुणतुणे वाजवले.

"तुझ्यावर कधी तशी वेळ आली नाही, म्हणून त्या भगवंताचे आभार मान. इतकी पण कोणी वृत्ती नसावी. " माधवराव म्हणाले.

"माझ्या सासुबाईंनी मला कमी का त्रास दिला होता? पण पाय घट्ट रोवून मी इथेच थांबले. नाही तर माझ्या नांदण्याचे चांदणे झाले असते तेव्हाच. या आजकालच्या मुलींकडे अजिबात सहनशीलता नाही." सरलाताई आता आपल्या आईवर घसरल्या आहेत हे पाहून माधवरावांनी तेथून काढता पाय घेतला.

विधी, श्रेया आणि विवेक त्यांच्या रुममध्ये बसून चर्चा करत होते. बाहेरुन सरलाताईंनी आवाज दिला,

"आज घरात जेवण बनणार आहे की नाही?" ते ऐकून विधी म्हणाली,

"आले आई." ती बाहेर आली व स्वयंपाकघरात शिरली. गडबडीत तिने फक्त पिठलं भाकरी बनवली. सोबत शेंगदाण्याची चटणी वाढली. जेवताना सरलाताई म्हणाल्या,

"आज फक्त पिठलं बनवलंय?"

"हो, आज उशीर झाला म्हणून पटकन पिठलं बनवलं."

"बाकीच्या गोष्टींमुळे स्वयंपाकाकडे दुर्लक्ष करू नका." असे सरलाताई म्हणाल्या आणि विधीने चेहरा पाडला. श्रेयासमोर सासुबाई असे म्हणाल्या, याचे श्रेयाला काय वाटेल असा विचार तिच्या मनात आला. माधवराव म्हणाले,

"छान झाले आहे गं पिठले. आज खूप दिवसांनी खाल्ले, बरे वाटले. शेगावची आठवण झाली."

माधवरावांचे बोलणे ऐकून सरलाताईंना वाटले,' हे आपल्या बोलण्याची धार का बोथट करत आहेत?' विवेकच्या ही लक्षात आईची नाराजी आली, परंतु श्रेयावर वेळच अशी आली होती की, तिला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे असे त्याला वाटत होते.

पुढे काय झाले, श्रेयाला घरातून पिटाळून देण्यात सरलाताई यशस्वी होतात का? हे वाचा पुढील भागात...

0

🎭 Series Post

View all