Login

आपलेच दात अन् आपलेच ओठ अंतिम भाग

कौटुंबिक कथा
“मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्यात सारखी मागे लागली आहेत कुठे तरी जाऊया म्हणून.” रात्री जेवताना सुधाताईंनी विषय काढला.

“वॉटर पार्कला जाऊया ना! ओम आणि गौरी हट्ट करत होते” विनयकडे बघत रोहिणी म्हणाली.

“काही नको ते वॉटरपार्क वैगरे. नुसता पाण्यात पैसा घालवायचा. आम्ही म्हातारा, म्हातारी काय करणार तिकडे येऊन. त्यापेक्षा अक्कलकोटला जाऊया. बरेच वर्षात गेलो नाही. सुजयचं लग्न झाल्यापासून जायचं मनात आहे.”

“मुलं नाराज होतील” फॅमिली ट्रीपला गेलो तर वॉटरपार्कला जाणं जमणार नाही रोहिणीच्या मनात आलं, तिने आशेने विनयकडे पाहिले.

“रिझर्व्हेशन मिळायला हवं आहे आई, सुट्ट्या आहेत त्यामुळे जरा मुश्किल आहे.” विनयने रिझर्व्हेशनचे कारण पुढे करत असमर्थता दर्शवली.

“ट्रेनने जायचेच नाही.”

“मग….”

“स्वतःच वाहन करून जायचं साठेवहिनी आहेत ना, त्या गेल्या होत्या दोन महिन्यांपूर्वी, त्या म्हणत होत्या गाडी करून गेलं की बरं पडत, आजूबाजूची ठिकाणे बघणं होतं. अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर सगळंच होईल. तू आठ, नऊ सीटरची मोठी गाडी बघ. पुढच्याच आठवड्यात जाऊ जमलं तर.”

“बघतो, करतो चौकशी करतो” म्हणत विनयने विषय संपवला.

“केलीस का रे चौकशी की मी बाबांना पाठवू कोपऱ्यावरच्या ट्रॅव्हल्सवाल्याकडे.” दोन तीन दिवसांनी सुधाताईंनी ऑफिसवरून आल्यावर विनयला विचारले.

एवढा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने विनय टाळाटाळ करत होता. सुधाताई रोज त्याच्या मागे लागत होत्या.

“एवढा खर्च मला जमणार नाही. नंतर जाऊ आपण” हिंमत करून विनय आई बाबांकडे बघत म्हंटला.

“आई वडिलांच्या देव दर्शनाचा हिशोब करतोय तुमचा लेक. तुमच्या दोघांची शिक्षण, लग्न, कर्ज काढून बांधलेले हे घर त्यावेळी आम्ही पण असा विचार केला असता तर आज मुलांकडे हात पसरायची वेळ आली नसती आमच्यावर. उद्या कोणी बघितला आहे. हात पाय धड आहेत तोवर जाऊन येऊ म्हणत होते.” सुधाताई डोळ्याला पदर लावत विनयच्या बाबांकडे पहात म्हंटल्या.

“आई, तू गैरसमज करून घेत आहेस, तुझा आणि बाबांचा खर्च करायला मी तयार आहे पण…” आईच्या डोळ्यातील पाणी पाहून विनय हेलावला.

“स्पष्ट बोल विनय” कधी नव्हे तो बाबांचा आवाज वाढला होता.

“पूर्ण फॅमिलीचा खर्च माझ्या अवाक्याबाहेर आहे. सुजयने निम्मा खर्च करावा.”

“त्याला कसं जमेल, होम लोन आहे डोक्यावर.” सुधाताईंनी नेहमी प्रमाणे धाकट्या लेकाची बाजू घेतली.

“आठ पंधरा दिवसांनी हॉटेलिंग, उठसूठ शॉपिंग करताना कर्ज नसत डोक्यावर. घरात पैसे दयायाची वेळ आली की आठवतं” रोहिणीचा धुमसत असलेला राग बाहेर पडला.

“निम्मा खर्च जमणार नसेल तर कमीत कमी त्या दोघांचा जायचा, यायचा, रहायचा खर्च तरी त्याने करावा. आपल्या सगळ्यांचा मी करेन. वेदिकाच्या लग्नाच्या वेळी मी त्याच्याकडे पैसे मागितले नाहीत, त्याला देखील दयावेसे वाटले नाही. मला वाटले नंतर देईल पण त्याने नाव काढले नाही.”

“तू मोठा आहेस, दादा घेणार नाही असं वाटले असेल त्याला.” …इति सुधाताई.

“थोडे फार तरी पुढे केले असते तर माझे बरेच प्रश्न सुटले असते. लहान होता, नोकरीला नव्हता तोपर्यंत ठीक होतं. दरवेळी असं कसं चालेल. सततच्या वाढत्या खर्चामुळे मला मुलांच्या, बायकोच्या छोट्या छोट्या मागण्या देखील पूर्ण करता येत नाहीत.” समोरचा समजून घेत नाही म्हंटल्यावर विनयला स्पष्ट बोलावं लागलं.

“सुजय आणि रेवती दोघं कमवते आहेत, अर्धा खर्च त्यांनी करावा. लहानलहान म्हणून पाठीशी घालत राहिलीस तर त्याला व्यवहार कधी कळणार. बोलून घे सुजयशी. घरी या म्हणावं संध्याकाळी, सगळ्यांच्या सोयीने कधी जायचं ते ठरवू” प्रभाकरपंतांनी विनयला सपोर्ट केल्याने सुधाताई नाईलाजाने गप्प झाल्या.

आपल्या खिशाला कात्री लागते म्हंटल्यावर रेवती सुट्ट्यांच कारण पुढे केलं.

“सध्या आम्हांला जमणार नाही आई, तुम्ही जाऊन या. आम्ही दोघं जेव्हा जमेल तेव्हा जाऊ” सुजयने क्षणार्धात आईच म्हणणं फेटाळून लावलं.

धाकट्या लेकाच्या, सुनेच्या वागणुकीमुळे सुधाताई दुखावल्या गेल्या. सुजय नाही म्हणणार नाही ह्या विश्वासाला तडा गेला. भ्रमाचा भोपळा खळकन फुटला. जो करतो त्याच्याच माथी सगळं लागतं, सुधाताईंना आपली चूक उमगली. पहिल्यांदाच त्यांच्यालेखी विनय आणि रोहिणीची किंमत वधारली.

“सुट्ट्या मिळणार नाहीत त्या दोघांना. आपण जाऊया का? ट्रेन तर ट्रेनने.” काही दिवसांनी सुधाताई समजूतदार सुरात म्हणाल्या.

“दरवेळी सगळेजण मिळून जातो. त्या दोघांशिवाय कसं जायचं. त्यांना सुट्टी मिळेल तेव्हा जाऊ. थांबू थोडे दिवस. दोन महिन्यांनी परत विचारू. तेव्हाही नाही म्हंटले तर आपण जाऊन येऊ.”

“बरोबर बोलते रोहिणी. तूर्तास हा प्लॅन कॅन्सल करू आई. आम्ही शनिवारी मुलांना घेऊन इम्याजिका वॉटर पार्कला जाऊन येतो.” विनय ठामपणे म्हंटला.

सुधाताईंनी मानेनेच होकार दर्शवला. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

आपली बाजू मांडणं, कधीतरी स्वतःसाठी स्टँड घेणं आवश्यक असतं. आपलेच दात अन् आपलेच ओठ म्हणत गप्प बसलं तर समोरच्याच फावतं हे विनयला कळल्यामुळे रोहिणीला हायसे वाटले. तिचे पुढील आयुष्य सुसहय झाले. वॉटरपार्कला जायला मिळणार मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणाऱ्या आनंदात ती हसत सामील झाली.