“तुला पण घे लग्नासाठी नवीन साडी. तुझी आणि मुलांची खरेदी उरकून घेऊ या रविवारी.” हिरमुसलेल्या रोहिणीला विनय म्हणाला.
“आणि तुमची.”
“मी गणपतीत घेतलेला सदरा घालीन. आम्ही एक सदरा चार वेळा घातला तरी चालतो कोणाच्या लक्षात येत नाही. तुम्हा बायकांचं तसं नसतं. तुला घेऊ छानशी साडी.”
“चिक्कार साड्या आहेत माझ्याकडे. नेसल्या जात नाहीत, पडून असतात त्यातलीच नेसेन मी एखादी. ड्रायक्लीन करून आणल्या की झालं. ओम आणि गौरीला मात्र नवीन कपडे घेऊ लग्नासाठी.”
आईबाबा आधी एकटेच जायचे आहेत त्यामुळे जाताना त्यांना पैसे दयावे लागतील शिवाय महिन्याभराच्या बीपी, डायबेटिसच्या गोळ्या आणाव्या लागतील, इतर औषध सोबत दयावी लागतील ऐनवेळी परक्या गावात, लग्नघरी त्यांची धावपळ व्हायला नको. नुसत रिझर्व्हेशन झालं आहे प्रवास म्हटलं की इतर खर्च असतातच. विनयच्या मनात घोळत असलेले विचार रोहिणीला कळत होते. नवरा स्वतःला काही घेत नाही म्हंटल्यावर तिला स्वतःसाठी काही घेणं रूचेना. तिने समजूतदारपणे खरेदीला नकार दिला.
‘दुसऱ्यांचे पैसे ठेवून कसं जमतं छानछौकि करायला. मला नसत असं जमलं जनाची नाही तर मनाची तरी. विनयचा भिडस्त स्वभाव आड येतो तो स्वतः काही बोलत नाही, मला बोलू देत नाही. समोरच्याला समजत नाही म्हंटल्यावर आपण कानउघाडणी करायला नको. जरा स्पष्ट बोलला असता विनय तर आमची देखील खरेदी झाली असती, रेवती सारखी पार्लरवारी करता आली असती, फेशियलच्या जागी क्लीनअपवर समाधान मानावं लागलं नसतं’ रोहिणीच्या मनात आलं.
“लग्न झालं की बोलतो आईशी, सुजयशी. तोपर्यंत तू शांत रहा. चार दिवसांनी आईबाबा जाणार आहेत मावशीकडे निघताना घरात कलह नको. आईचा मूड जायला नको” रोहिणीला समजावत विनय म्हंटला. तिने देखील नवऱ्याच ऐकत विषय तिथेच संपवला.
ठरल्याप्रमाणे सगळे कुटुंबीय वेदिकाच्या लग्नासाठी नागपूरला पोहोचले. लग्न थाटमाटात पार पडलं. मावशीबाईंनी एकुलत्या एक लेकीच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याने कठे नावं ठेवायला जागाच नव्हती, कशाची काही कमी नव्हती. भाचीला सोन्याचा हार केला म्हणून सुधाताई तोऱ्यात होत्या. “हौशी आहे रेवती, स्वतःबरोबर मला देखील साडी घेतली” नेसलेली साडी सगळ्यांना दाखवत धाकट्या सुनेचे कौतुक करताना थकत नव्हत्या.
एखादा चित्रपट, नाटकं असो वा कुठलाही सोहळा जे प्रमुख भूमिकेत असतात तेच नावाजले जातात. समोर दिसतं, दाखवलं जातं तेच प्रेक्षकांच्या लक्षात राहातं, छोट्या, दुय्यम भूमिका करणारे, पडद्यामागचे कलाकार बॅकस्टेज आर्टिस्ट नेहमीच दुर्लक्षिले जातात. सगळ्याचं सगळं करून, मन राखून रोहिणी आणि विनयच्या वाट्याला तेच आलं होतं. घोर निराशा, उपेक्षा पदरी घेऊन रोहिणी घरी परतली.
स्वबळावर सुजयने घेतलेल्या टूबीएचकेच सुधाताईंना भारी अप्रूप होतं. मुलं लहान असताना आम्ही देखील हिंमत करून हे घर बांधलं असं वारंवार त्या बोलून दाखवत. खर्चाचे किंवा कशाचे काही बोलायला जावे तर सतत सुजयच्या डोक्यावर कर्ज आहे, न चुकता दर महिन्याच्या ठराविक तारखेला हप्ता भरावा लागतो म्हणत.
“ती दोघं नाही आहेत, ऑफिसला गेलीत. आपण घर बघून येऊ, जवळच आहे” घरी आलेल्या पाहुण्या राहुण्यांना सुधाताई सुजयच्या घराची चावी घेत चार बिल्डिंग सोडून असलेला त्याचा फ्लॅट दिमाखात दाखवून आणण्यात धन्यता मानत.
“कलासक्त आहे धाकटी सून, छान ठेवलं आहे घर” रोहिणीने केलेल्या पदार्थांवर ताव मारत नातेवाईक रेवतीची प्रशंसा करत.
घरातल्यांनाच आपली किंमत नाही तर बाहेरचे कुठून करणार. घरात लहान मुल नाही, राजाराणीचा संसार पसारा होईल कशाला, तिकडे कमावणारे दोघे, इकडे कमावणारा एकटा, खाणारी तोंड सहा. मला देखील वाटतं घर सजवावं, सुख सुविधांयुक्त असावं पण पैश्याचे सोंग कुठून आणणार आणि आणलं तरी काही बदल करावेसे वाटले तर सासूबाईंना ते पटत नाही. ही वस्तू लग्नाच्या वाढदिवसाला घेतली तर ती बोनसमध्ये दिवाळीत, सगळ्यात त्यांचा जीव अडकलेला, भावना गुंतलेल्या. या रहात्या घराला पस्तीस चाळीस वर्ष होऊन गेली त्यामुळे त्याची डागडुजी, लिकेजसाठी वॉटरप्रूफिंग, सूजयच्या लग्नाआधी काढलेला रंग, एकहाती नाही पण जमेल तसं थोडफार फर्निचर बदलणं, जुना टिव्ही, फ्रिज देऊन नवीन घेणं इतकं सगळं करूनही कोणाला किंमत नाही. घर आमच्या नावावर नाही. पुढेमागे वाटण्या होणारच. लग्नानंतर आम्ही वेगळं झालो असतो तर आमचा देखील स्वतःचा फ्लॅट झाला असता. विनय आणि रोहिणी पवार नेमप्लेट दारावर झळकली असती पण मोठ्या सुनेची, मुलाची कर्तव्य आड आली, वेगळं रहाता आलं नाही. सासूबाईंना धाकट्या लेकाचा ब्लॉक दिसतो, मोठ्या लेकाने घरात केलेला खर्च दिसत नाही.
किती दिवस सहन करायचं, आपलेच दात अन् आपलेच ओठ म्हणत गप्प बसायचं. मातृभक्त असलेल्या विनयच्या कधी लक्षात येईल हे सगळं. तो स्वतःसाठी, आमच्यासाठी स्टँड घेईल का? रोहिणीच्या मनातील विचारांचं वादळ शमत नव्हतं.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा