“वेदिकाच्या लग्नाची तारीख ठरली, तेवीस तारखेला आहे लग्न, रविवार आहे. मावशीचा फोन आला होता दुपारी” सुधाताईंनी ऑफिसमधून आल्या आल्या लेकाला विनयला सांगितले.
“अरे वा छान. चट मंगनी पट ब्याह. बहिणाबाईंना अभिनंदनाचा फोन करायला पाहिजे” बातमी ऐकून विनय खुश झाला.
“जरा घाईच होणार आहे. पण हॉल मिळतोय म्हंटल्यावर कशाला थांबा. मी आणि बाबा पंधरा दिवस आधी जाऊ मदतीला, लग्नानंतरही काही दिवस राहू. तुम्ही सगळे दोन तीन दिवस तरी आधी या. आम्ही निवडक सिनिअर सिटिझन मंडळी घरी राहू बाकी तुम्हा सगळ्यांची सोय घराजवळील हॉटेलात करणार म्हणत होती मावशी. सगळ्यांना स्वतंत्र रूम देणार आहे. एकुलत्या एक लेकीच्या लग्नात कोणाची गैरसोय होऊ नये मावशीचं म्हणणं आहे. तू सुजयशी बोलून पटकन रिझर्व्हेशन कर. नाही मिळालं तर प्रॉब्लेम होईल.” सुधाताईंनी लेकाला बहिणचं आणि त्यांचं झालेलं सगळं बोलणं सांगितलं.
“एक दोन दिवसात करतो.”
सुधाताईंना विनय आणि सुजय दोघं मुलंच, मुलगी नाही त्यामुळे त्यांचा आपल्या भाचीवर वेदिकावर फार जीव होता. तिचं लग्न ठरल्यापासून त्यांच्या अंगात उत्साह संचारला होता. बहिण नागपूरला रहात होती, लग्न नागपुरात होतं, लांब पल्ल्याच्या गाड्या पटकन फूल होतात म्हणून त्या रिझर्व्हेशन करण्यासाठी घाई करत होत्या.
“आहेराच काय?” सुधाताईंच्या सूनेने रोहिणीने विचारले.
“घसघशीतच करावा लागेल. अलकाला पैठणी घेऊ, भावजींना सफारीचे कापड, वेदिकाला दागिना करावा असं मनात आहे. विनय आणि सुजय दोघांच्या लग्नात अलकाने त्यांना चेन घातली होती. तुझ्या मुलांच्या बारशालाही वळी दिली होती. आपल्यालाही त्याप्रमाणेच करावं लागेल. वेदिकाच्या लग्नासाठी मी आधीपासूनच थोडंफार सोनं घेऊन ठेवलं आहे, त्यातूनच करू. वर काही भर घालावी लागली तर तुम्ही घाला आणि कपड्याचा आहेर करा” सुधाताई विनय आणि रोहिणीकडे बघत म्हंटल्या.
लाडक्या बहिणीच्या लग्नात काय पैश्याचा विचार करायचा म्हणत विनयने मान हलवून आईच्या म्हणण्याला दुजोरा दिला. रोहिणी सुद्धा कसलीही आडकाठी न घेता उत्साहात रुखवताच्या तयारीला लागली.
“सगळ्यांचे यायचे जायचे रिझर्व्हेशन तुम्हीच केलेत, एक वेळेचे तरी भावजींना करायला सांगायचे.” काही दिवसांनी रोहिणीने विनयला म्हणाली.
“तो स्वतःहून देईल पैसे, पळून थोडीच जाणार आहे माझा भाऊ. लगेचच पैसे मागणे बरं दिसत नाही. त्याला वाटेल दादाला जरा धीर नाही.”
“आहेराच तरी बोलून घ्या.”
“आई बोलली असेल, तू नको टेन्शन घेऊस. चहा कर मला” विनयने रोहिणीकडे चहा मागत विषय बदलला.
सुजय स्वतःहून पैसे देईल याची विनयला खात्री असली तरी रोहिणीला बिलकूल नव्हती. एकही रुपया कधी सुजयने घरात दिलेला तिला आठवत नव्हता. विनय नंतर आठ नऊ वर्षाने झालेला लहान लहान म्हणून घरातल्या सगळ्यांनीच सुजयला डोक्यावर बसवून ठेवलं होतं. सुजय पैसे देत नव्हता, विनय मागत नव्हता. सुजयला जवाबदारी कळत नव्हती, कोणी त्याला जाणीव करून देत नव्हतं. दोन वर्षापूर्वी सुजयच लग्न झालं होतं, तो आणि रेवती दोघंही कमवते असूनही चित्र बदललं नव्हतं. सुजयच लग्न होईपर्यंत पवार कुटुंबीय एकत्र राहत होते. लग्नापूर्वीच सुजयने ब्लॉक घेतला होता, लग्न झाल्यावर चार पाच महिन्यात छोट्या जागेच कारण पुढे करत सुजय आणि रेवती आपल्या नवीन जागेत रहायला गेले. महिन्याला ठराविक रक्कम दयावी किंवा, सासूसासऱ्यांचा गोळ्यांऔषधांचा खर्च करावा अशी रोहिणीची अपेक्षा नव्हती पण देणंघेणं, प्रवास अश्यावेळी तरी सुजयने समजून सुमजून हातभार लावला असं नेहमी वाटायचं. लग्नाला अवघा महिना राहिला तरी सुजय, रेवती पैश्याच नाव घेत नव्हते. उलटपक्षी रेवतीची जोरदार खरेदी चालू होती.
“आई ही साडी कशी आहे?” खरेदी दाखवायला आलेल्या रेवतीने सुधाताईंना विचारले.
“छान आहे.”
“आवडली तुम्हाला. तुमच्यासाठीच घेतली आहे. हिचं नेसायची लग्नात. तुमच्या गोऱ्या रंगाला हे कॉम्बिनेशन उठून दिसेल.” रेवती सुधाताईंच्या हातात साडी देत म्हंटली.
त्या साडीच्या नादात सुधाताई आहेराचं बोलायला साफ विसरल्या. “घरी जाऊन कुठे करत बसतेस, जेवूनच जा दोघं” सुजय, रेवतीला जेवायला थांबवून त्यांनी रोहिणीला जास्तीचा स्वयंपाक करायला लावला.
साडी छानच होती यात वाद नव्हता फक्त त्या साडीच्या कौतुकात विनयने केलेला तीस पस्तीस हजाराचा खर्च डावलंला गेला याचे रोहिणीला वाईट वाटले. कौतुक नाही कमीत कमी विनय आपल्या कर्तव्यात कधीच कसूर करत नाही एवढा उल्लेख तरी व्हावा ही अपेक्षा फोल ठरली, रोहिणी दुखावली गेली.
सासूबाई बरोबर मला साडी घेतली असती, मुलांना कपडे केले असते तरी चालले असते, आम्ही समजून घेतले असते उचलून पैसे न देता ह्या ना त्या रुपाने माणूस करतो तसं…पण ह्यापैकी काहीच न झाल्याने रोहिणीची घोर निराशा झाली.
क्रमशः
©®मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा