Login

आपुलकी

"आपुलकी ही जावा जावामधील गैरसमज दूर करून, खरी माया आणि साथ दाखवणारी कथा आहे."
आपुलकी

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

स्मिता आणि निशिकांतचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले होते.स्मिता ही शहरात राहिलेली मुलगी होती. शिकलेली होती आणि नोकरी करणारी होती.

निशिकांतच्या बाबांचा मित्राची मुलगी होती. निशिकांतला ती आवडली. त्यांनी लग्न केले.निशिकांतची वहिनी मोहिनी तिला स्मिता आवडत नव्हती.
"शहरातली मुलगी आहे. घरातलं काम येत नसणार, मला मदतही करणार नाही, सगळी कामं मलाच करावी लागतील," असे ती विचार करायची.

दोन-तीन दिवस असेच निघून गेले.स्मिताला निशिकांतच्या आईनं जास्त काम काही करू दिलं नव्हते. कारण ती नवीन नवरी होती.असेच अजून दोन-तीन दिवस झाले.

निशिकांत आपल्या आई-बाबांकडे गेला.
"अरे निशिकांत, कायं काम होतं का?" निशिकांतचे बाबा म्हणाले.

"बाबा, आता सुट्ट्या संपल्या आहेत. आम्हाला पुण्याला जावं लागेल," निशिकांत हळू आवाजात म्हणाला.

"कधी निघणार आहेस? तुझी आई तुला सामान भरून देईल. स्मिताला पण तिथे घर लावावं लागेल ना? " निशिकांतचे बाबा म्हणाले.

"उद्या सकाळीच निघू. लवकर पोहचलो तर घर साफ करू. दुसऱ्या दिवशीपासून कामावर जाऊ," निशिकांत म्हणाला.

"हो, चालेल. आता बॅगा भरून ठेवा," निशिकांतचे बाबा म्हणाले.निशिकांत तिथून निघून गेला.

"स्मिता, बॅग भरून झाली का? आपल्याला उद्याच निघायचं आहे. आई-बाबांशी माझं बोलणं झालं आहे," निशिकांत म्हणाला.

"मोहिनी ताई माझ्याशी नीट बोलत नाहीत. कितीदा त्यांच्याशी बोलायला गेले. " स्मिता म्हणाली.

"वहिनी गावाकडच्या आहेत, सध्या तशाच आहेत. तू बोलत जा. तसेही आपण उद्या निघणारच आहोत. नंतर आपण रोज नोकरीवर जाणार, सुट्टी किंवा काही सणाला आपण येत-जाऊ," निशिकांत म्हणाला.

स्मिता पण तिच्या कामाला लागली. तिनं बॅग भरली आणि बाजूला ठेवून दिली. दोघंही झोपून गेले.

सकाळी स्मिता लवकर उठली. अजून मोहिनी रूमच्या बाहेर आली नव्हती, तोपर्यंत स्मितानं सगळी कामं करून ठेवली होती. नाश्ता पण बनवला होता.

आई-बाबा पण उठले. निशिकांत तयार होऊन आला.
मोहिनी आणि निशिकांतचा भाऊ पण आला. मुलंही तयार झाली. स्मिताने नाश्ता आणला. सगळ्यांनी करून घेतला.

स्मिता आणि निशिकांत तयार होण्यासाठी रूममध्ये गेले.
निशिकांतने बॅगा रूमच्या बाहेर आणल्या.
स्मिता पण तयार होऊन आली.त्यांनी आई, बाबा, दादा, वाहिनी यांच्या पाया पडले. मुलांशी बोलले.

"काका, काकू, तुम्ही लवकर या. मला चॉकलेट आणा" चिंगी म्हणाली.

"आम्ही येताना घेऊन येऊ " स्मिता चिंगीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली.

तिला आनंद झाला.स्मिता आणि निशिकांत निघून गेले.
मोहिनीला राग आला.
"मी फक्त सगळ्यांची कामं करायची, आणि ती मस्त तिथं आरामात राहणार, मजा करणार. मला कुठेच जाता येत नाही" मोहिनी चिडचिड करत होती.

आई-बाबा ऐकत होते पण मोहिनीला समजवू शकत नव्हते.मोहिनीला सगळं आयत मिळालं होतं.
स्मिता नवीन संसार उभारत होती, नोकरीवर जाऊन घरही सांभाळत होती. निशिकांत पैसे पण पाठवत होता.
मोहिनीला कायं समजवणार, आणि कोण समजवणार? आई-बाबा विचार करत होते.

असेच दिवस जात होते. स्मिता आणि निशिकांत त्यांच्या कामामध्ये होते. त्यांचं धावपळीचं जीवन चालू होतं.
दोघंही एकमेकांना समजून घेत होते. स्मिताला उशीर झाला तर निशिकांत घरातली कामं करून टाकत होता. स्मिताला निशिकांत खूप मदत करत होता.

आज सुट्टी होती.स्मिता आणि निशिकांत घरीच होते.

"अहो, खूप दिवस झाले. आपण घरी कॉल करून बघू," स्मिता म्हणाली.

"आता लावतो," निशिकांत म्हणाला. बाबांना कॉल केला.

बाबांनी लगेच कॉल घेतला.
"हॅलो निशिकांत," बाबा म्हणाले.

"हॅलो बाबा," निशिकांत म्हणाला.

"तुम्ही दोघं कसे आहात?" बाबा म्हणाले.

"आम्ही मस्त आहोत. तुम्ही कसे आहात? मुलं पण चांगली आहेत ना? आई कुठे आहे?" निशिकांत म्हणाला.

"आम्ही पण मस्त आहोत. मुलंही छान आहेत. खेळत आहेत. ती जेवण बनवत आहे," बाबा म्हणाले.

"आई का जेवण बनवत आहे? वहिनी त्यांच्या माहेरी गेल्या आहेत का?" निशिकांत म्हणाला.

"तिला बरं नाही आहे. डॉक्टरकडे पण जाऊन आली. तरी काही फरक पडत नाही आहे," बाबा म्हणाले.

"तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही" निशिकांत म्हणाला.

"तुम्ही पण कामात असता. तुम्हाला कायं सांगायचं?" बाबा म्हणाले.

निशिकांत थोडावेळ बोलून कॉल कट करतो.

"काय झालं?" स्मिता म्हणाली.

"वहिनीला बरं नाही आहे. तिला कोणत्याही डॉक्टरचा फरक पडत नाही आहे. आई जेवण बनवत होती" निशिकांत म्हणाला.

स्मिता विचार करायला लागली.

"अहो, मी घरी जाऊ का? आईकडून आता जास्त काम होत नाही," स्मिता म्हणाली.

"तू खरंच सगळं करशील ना?" निशिकांत म्हणाला.

"मी करेन. त्यांना तरी पण फरक नाही पडला तर इथल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ " स्मिता म्हणाली.

निशिकांत स्मिताकडे खूप प्रेमाने बघत होता. त्याला स्मिताचं कौतुक वाटलं.

"उद्याच मी सकाळी गावाला जाते. तुम्ही माझा सुट्टीचा अर्ज ऑफिसमध्ये देऊन द्या" स्मिता म्हणाली. आणि बॅग भरायला निघून गेली.

स्मितानं बॅग भरली.तिनं निशिकांतसाठी खायला बनवून ठेवलं.निशिकांतचे कपडे, त्याला लागणारं सामान सगळं समोर काढून ठेवलं होतं.

सकाळी स्मिता गावाला निघून गेली. निशिकांत ऑफिसला निघून गेला.

स्मिता घरी आली. ती येणार आहे, कोणालाच माहिती नव्हतं.चिंगी तर लगेच स्मिताला बिलगली.
स्मितानं चॉकलेट आणलं होतं, ते चिंगीला दिलं.

आई-बाबांच्या पाया पडली.स्मिता आली तर त्यांनाही आनंद झाला.स्मितानं सगळ्या घराची जबाबदारी स्वतःवर घेतली.ती सगळं काम करत होती.
मुलांना तयार करून शाळेत पाठवत होती.

मोहिनी सगळं बघत होती. तिला रडू येत होतं.
पण गोळ्यांचा काहीच फरक पडत नव्हता.
स्मिता अजून दोन-तीन हॉस्पिटलमध्ये मोहिनीला घेऊन गेली. तरी काही गुण आला नाही.
स्मिता जास्त दिवस सुट्टी घेऊ शकत नव्हती.

ती आई-बाबांच्या रूममध्ये गेली.
"आई-बाबा, मी मोहिनी ताईला पुण्याला घेऊन जाऊ का? मी आता जास्त सुट्ट्या घेऊ शकत नाही. माझी नोकरी जाईल" स्मिता म्हणाली.

"मोहिनीला सांगून बघ," आई म्हणाली.

"मी ताईला विचारते. तिथं चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ," स्मिता म्हणाली.

"चालेल" बाबा म्हणाले.

स्मिता मोहिनीला विचारायला गेली. मोहिनी पण लगेच तयार झाली.स्मितानं निशिकांतला कॉल करून सांगितलं "मी ताईला घेऊन येते आहे."मोहिनी आणि तिची बॅग भरली.

दुसऱ्या दिवशी दोघीही पुण्याला आल्या.
निशिकांत हॉस्पिटलमध्ये नंबर लावून होता.
स्मिताने मोहिनीला तिथं नेलं. डॉक्टरांनी चेक केलं. काही गोळ्या लिहून दिल्या.निशिकांत लगेच मेडिकलमधून घेऊन आला. डॉक्टरची फी पण दिली.
ते घरी आले.

उद्यापासून स्मिताला पण कामावर जायचं होतं.
ती त्यांची तयारी करत होती.स्मितानं रात्री सगळं आवरलं आणि झोपायला निघाली.

सकाळी लवकर उठून मोहिनीचं जेवण, त्यांचे डबे स्मितानं बनवले, घरही झाडून गेली.

"मोहिनी ताई, काळजी घ्या. आम्ही संध्याकाळी येतो" असं सांगून स्मिता आणि निशिकांत निघून गेले.

पाच-सहा दिवसांत मोहिनी बरी झाली.
त्या पाच-सहा दिवसांत स्मितानं मोहिनीची खूप काळजी घेतली. कामावरून थकून आली, तरी सगळं करत होती.

मोहिनीनं चिंगीचे बाबा बोलावले.
आता त्यांना घरी जायचं होतं. ते पण लगेच पुण्याला आले. उद्याच ते गावाला जाणार होते.

मोहिनीनं स्मिता येण्याआधीच सगळा स्वयंपाक करून ठेवला.स्मिता आणि निशिकांत घरी आले.

"दादा, तू कधी आलास?" निशिकांत म्हणाला.

"दुपारी आलो. मोहिनीला आता घरी घेऊन जातो. मुलांना त्यांच्या आईची आठवण येते आहे," निशिकांतचा दादा म्हणाला.

"ताई, तुम्ही सगळा स्वयंपाक का केला? मी केला असता ना," स्मिता म्हणाली.

मोहिनी स्मिताकडे गेली.
"स्मिता, माझं चुकलं. मला वाटत होतं, तुम्ही पुण्यात राहता, मस्त मजा करता पण मी पाहिलं, तुझी किती धावपळ असते.तू शिकलेली असून, नोकरी करणारी असून, माझ्यासाठी किती केलंस, माझी किती काळजी घेतलीस.खरंच, मला माफ कर," मोहिनी म्हणाली.

आणि तिनं स्मिताला घट्ट मिठी मारली.
स्मिताही भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू चमकले.