भाग १: लेखनाची रात्र
ती अमावस्येची रात्र होती, एक अशा संध्याकाळांपैकी जिच्यात काळोख केवळ डोळ्यांना दिसत नव्हता, तर मनाच्या आतही उतरत होता. आकाश काळसर दिसत होते, जणू चंद्र आणि तारे देखील त्या रात्रीला स्पर्श करायचे टाळत होते.
लेखक म्हणून मला एक गोष्ट ठाऊक होती, एखादी गोष्ट, लेख कधीच गोंधळात जन्म घेत नाही, तिला नेहमी एकांताच्या कुशीत अंकुर फुटतात.
मी शहराच्या बाहेर असलेला एक पडका, जुना वाडा गाठला. तो माझ्या काकांचा होता. वर्षभरापूर्वीच त्यांचे निधन झाले होते , आणि तेव्हापासून ती जागा कोणीही वापरली नव्हती. गावात कुजबुज होती की ती जागा शापित आहे. पण मला माझ्या लेखनासाठी ती आदर्श वाटली, दूरदूरपर्यंत कोणी नाही, आणि सगळीकडे हृदयात धडकी भरवणारी शांतता पसरलेली होती.
पाठीवर एक जुनी बॅग, त्यात वही, पेन आणि टॉर्च घेऊन मी निघालो. बाहेर वारा जोरात वाहत होता, जणू त्या घरात जाण्याच्या माझ्या निर्णयावरच तो रागावत होता.
घरात शिरताच एक विचित्र वास अंगावर आला. ओलसरपणा, बुरशी, आणि काहीतरी मरणासन्न वाटत होते. आत सर्वत्र धूळ, कोळ्यांची जाळी, आणि काळसर पडलेल्या भिंतींवर गडद डाग पडलेले होते. मी मधल्या खोलीत आलो, बॅगेत पाहतो तर काय? माझी वही त्यात नव्हती. पण कोपऱ्यात असलेल्या टेबलवर एक दुसरीच वही ठेवलेली होती, जिची पाने पिवळी पडलेली होती. मी टॉर्च मधला कंदील चालू केला.
तीच वही घेऊन लिहायला सुरुवात करताच, माझ्या मनात कल्पनेच्या लाटा तरंगू लागल्या, जणू तो वाडाच स्वतः माझ्या कानात कथा सांगत होता. मी लिहीत राहिलो, पेनाचा कागदावरील ओरखड्याचा आवाज खोलीभर घुमत होता.
तेव्हाच वरच्या मजल्यावरून एक आवाज आला.
एक ओल्या लाकडासारखा चिरका आवाज.
मी थोडा हादरलो. "वारा असेल," मी मनात म्हणालो. पण त्या आवाजात नियमितता होती, जणू कोणीतरी मुद्दाम करून माझे लक्ष वेधत होते.
मोबाईलचा टॉर्च लावला आणि मी पायऱ्यांकडे वळालो. अंधारात लाकडी पायऱ्या चिमणीसारख्या चिवचिवत होत्या.
"कोण आहे तिथे?" मी विचारले. माझा आवाज माझ्याच कानात घुमला.
समोरून काहीही उत्तर आले नाही.
मी परत खाली आलो, मनात उठलेली थरथर बाजूला सारून पुन्हा लिहायला बसलो. पण लक्ष लागेना, काही वेळात पुन्हा एकदा एक वेगळा आवाज ऐकायला आला.
यावेळी तो अगदी माझ्या डोक्यावर असलेल्या खोलीतुनच काहीतरी जड वस्तू पडल्यासारखा वाटत होता..
मी टॉर्च हातात घेतला. माझ्या मनाने मला समजावले "एखादे मांजर असेल, किंवा उंदरांसारखा प्राणी."
पण अंतर्मन गप्प बसायला तयार नव्हते.
मी वरच्या मजल्यावर गेलो. भिंतीला लागून असलेली खोली उघडली. आत काहीच नव्हते, जुनी खुर्ची, एक फाटकी चादर, आणि एक जीर्ण कपाट जणू ते सगळे जण माझ्याकडेच बघत होते.
मी मागे वळलो, पण तेवढ्यात ... कपाटाचा दरवाजा आपोआप उघडला गेला.
मी गप्पगार झालो. श्वास घशात अडकला.मागे वळलो, हळूहळू कपाटाच्या जवळ गेलो आणि दरवाजा पूर्ण पणे उघडला. तो आतून रिकामा होता.
मनात हसू आले ते पण स्वतःच्या भीतीवर, पण ते हसू क्षणभराचे ठरले.
कपाटात एक फुटलेला आरसा होता, एक जुन्या प्रकारचा आरसा, ज्यात आपले प्रतिबिंब काहीसे गूढपद्धतीत दिसत होते.
मी मोबाईलचा टॉर्च फिरवत होतो, आणि तेव्हाच आरशात पाहताना माझ्या प्रतिबिंबात माझ्यामागे काहीतरी हलताना दिसले.
मी पटकन मागे वळलो. मागे काहीच नव्हते, खोली पूर्ण रिकामी होती.
पुन्हा आरशात पाहिले, एक आकृती, एक स्त्रीसदृश छायाप्रतिमा स्थिर आणि काळसर अगदी माझ्या मागेच उभी होती.
"भास आहे," मी मनात पुटपुटलो. पण हृदयात काही तरी गोठत चालले होते.
हातातला आरसा तसाच सोडला आणि धूम ठोकत, घाबरतच मी हॉलवे गाठला, आणि अचानक पावलांचा आवाज येऊ लागला.
पायऱ्यांवरून मऊसर, हलकी पावले खाली येतानाचे आवाज कानात फिरू लागले.
मी दिवाणखान्यात पोहोचलो. माझी वही... टेबलावर नव्हती. ती आता जमिनीवर पडली होती, एका बाजूने उघडली होती आणि त्यात जे लिहिले होते, ते माझे हस्ताक्षर नव्हते.
"इथून निघून जा. ती पहात आहेत."
ते शब्द... ते मी लिहिले नव्हते. मी दाराकडे धावलो, पण दाराला कुलूप लावलेले होते.
तेव्हाच एक थंड हात खांद्यावर येऊन पडला.
तेव्हाच एक थंड हात खांद्यावर येऊन पडला.
मी किंचाळलो आणि भीतीने मागे पहिले पण पुन्हा एकदा तेथे कोणीच नव्हते.
अचानक दार उघडले, मी जीव मुठीत घेऊन त्या रात्रीत बाहेर पळालो.
कारजवळ पोहोचलो. दरवाजा उघडून आत बसलो, आणि जोरदार श्वास घेतला.
गाडी सुरू करताना आरशातून मागे पाहिले, घर अजून तसेच होते, काळे, काळजीवाहू. पण वरच्या मजल्यावर, खिडकीत... ती अजून उभी होती.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
जलद कथा जुलै २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा