Login

आरशाचे सत्य २

आदित्य आणि वसुधा काय काय संबंध आहे दोघांमध्ये.
भाग २: कथा सुरु झाली 

त्या रात्रीनंतर अनेक दिवस गेले, पण ती रात्र आणि त्या घरातील प्रत्येक क्षण माझ्या अंगात साठून राहिले होते. जणू त्या क्षणांनी माझ्या मेंदूमध्ये आपले घर केले होते. मी पुन्हा त्या घराकडे कधीच गेलो नाही. पण मी त्या वहीला मात्र माझ्या खणामध्ये ठेवून दिली होती.

ती वही आता माझ्या घरातील गोल टेबलाच्या एका खणात बंद होती. ज्या दिवशी मी ती तिथून बाहेर काढली, त्या दिवसापासून घरात काहीसे बदल घडू लागले होते, घरातील वातावरण जड आणि थरकाप निर्माण करणारी शांतता घरात अनुभवायला मिळत होती.

मी वाड्यात झालेल्या त्या घटनेबद्दल कोणीशीच बोललो नव्हतो. पण स्वतःला शांत करण्यासाठी, मी ती वही पुन्हा वाचायची असे ठरवले.

वही उघडताच त्या वहीतील शब्द बदलले होते.

हो खरंच, मी त्या रात्री पाहिलेल्या वाक्यावरून वही बंद केली होती त्यावेळी त्यात वाक्य होते

"इथून निघून जा. ती पहात आहे." पण आता, त्याखाली एक नवीन वाक्य उमटलेले होते.

“तू परत का आला नाहीस? लवकर ये ती वाट पाहतेय.”

माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी तो भाग झाकून ठेवला आणि दुसऱ्या पानावर पाहिले, परत ओळखीचे हस्ताक्षर दिसत नव्हते, पण शब्द स्पष्ट होते. कोणीतरी कथा लिहीत होते, पण ते मी लिहीत नव्हतो, आणि ती कथा माझ्याच अनुभवावर आधारलेली होती.

त्या रात्रीची सगळी दृश्ये, आवाज, आरशातील ती आकृती प्रत्येक गोष्ट वहीत उतरलेली होती. पण या केवळ आठवणी नव्हत्या... त्या नवे तपशील देखील सांगत होत्या, ज्या त्या वेळी मला तिथे जाणवल्या नव्हत्या.

उदाहरणार्थ, एका पानावर लिहिले होते :

"तू पावलांचे आवाज ऐकलेस, पण ते एकूण किती पायांचे होते कोणाला माहित आहे का?"

माझ्या पाठीत गार वारा फिरला. मी आधी विचार केला, ही कोणीतरी माझी मस्करी करत असेल? किंवा मनाचे खेळ असतील पण माझ्या घरातही आता विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या.

त्या रात्री, मी खिडकीजवळ उभा होतो, आणि समोरच्या इमारतीच्या काचांमध्ये मला माझे प्रतिबिंब दिसत होते, अचानक  माझ्याबरोबर कोणी तरी दुसरे देखील उभे असल्याचे जाणवले.


मी मागे वळून पाहिले, कोणीच तेथे नव्हते. पण समोरच्या काचेत अजून ते प्रतिबिंब टिकून होते, माझ्याकडे टक लावून पाहत होत आणि तो चेहरा माझ्यासाठी ओळखीचा होता,  तीच छाया, तीच स्त्री जी मला काकांच्या वाड्यात दिसली होती! मी ते दृश्य पाहून बेशुद्ध पडलो. 

सकाळी माझी बहिण श्रेया, मला भेटायला आली होती. ती नेहमीच माझ्या एकटेपणामुळे काळजी करत असे. मी काहीच न सांगता तिच्यासमोर तीच वही ठेवली आणि तिला विचारले,

“हे माझे लिहिलेले आहे असे तुला वाटते का?”

तिने काही पाने उलगडली आणि थोडा वेळ शांत राहिली, नंतर म्हणाली, “दादा , यातली अक्षरे … थोडीशी तुझ्यासारखी आहेत असे वाटतात, पण... त्यात एका स्त्रीत्वाची झलक आहे, त्याला एखाद्या मुलीसारखी वळणे आहेत, आणि या ओळी... वाचताना जीवाचा एकदम थरकाप उडवत आहेत.”

ती वही हातात घेत होती तेव्हा मी पाहिले,  तिच्या बोटांवर ओलसर शाई लागली होती,  हिरवट निळसर छटा असलेली शाई  जणू आताच त्याने वहीवर ती अक्षरे गिरवली होती.

पण मी तर ती वही किती तरी दिवस बंद करून खणामध्ये ठेवली होती! मनामध्ये पुन्हा एकदा भीती दाटून राहिली.

त्या रात्री, जेव्हा मी एकटा होतो, तेव्हा मी ती वही पुन्हा उघडली, आणि तिथे... एका नव्या पानावर माझ्या नावाने हाक मारलेली होती.

 "अदित्य, का पळतोस? तू या कथेचा शेवट पूर्ण का करत नाहीस?"

"कथेचा शेवट..."

माझ्या मनात विचारांचा कल्लोळ उठला. कोण आहे जिला माझ्याकडून कथेचा शेवट करून घ्यायचा आहे.

त्या क्षणी, माझ्या टेबलावरील दिवा अचानक पेटला, काही सेकंदांसाठी सगळीकडे प्रकाश झाला आणि मग पुन्हा एकदा काळोख आला. भिंतीवर, आरशातील तशीच आकृती उमटली.

ही तीच होती. तिचे केस हवेत लटकत होते, डोळे गडद आणि खोल गेले होते. तिच्या चेहऱ्यावर एक दु:खाची जाणीव होती... पण रागही झळकत होता.

मी वही बंद केली. पण त्या रात्री, झोप काही केल्या लागली नाही.

एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, ती परत आली होती अगदी माझ्या घरात.

कदाचित... ती त्या दिवशी माझ्याच बरोबर एकत्र आली होती, कधीही न जाण्यासाठी.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

जलदकथा लेखन स्पर्धा जुलै २०२५ 
0

🎭 Series Post

View all