Login

आरशाचे सत्य ३

आदित्य आणि वसुधा काय आहे दोघांत संबंध
भाग ३: आरशाच्या पलीकडे

त्या रात्रीपासून माझ्या घरात जे घडू लागले, त्याला 'योगायोग' म्हणणे आता मूर्खपणाचे वाटत होते.

मी उठलो तेव्हा भिंतीवर एक लांबसा ओरखडा आला होता. जणू एखाद्या बोटाच्या लांब नखाने तीव्रतेने रेघ ओढलेली होती. त्यातून वाचण्यासाठी, स्वतःला समजावण्यासाठी मी शोधायला लागलो. काही उत्तरे मिळवणे आवश्यक होते. त्या घराबद्दल, त्या वहीबद्दल… आणि मुख्य करून तिच्याबद्दल, जी मला मधेच माझ्या आजूबाजूला दिसत होती.

माझ्या काकांची एक जुनी डायरी घरात होती, जी मला त्यांचे सामान चाळताना मिळाली होती. त्यात एक उल्लेख होता, एका "कांचदर्पण शास्त्रज्ञाचा", ज्यांच्याशी त्यांनी त्या जुन्या घरासाठी संपर्क केला होता. नाव होते,  प्रोफेसर वामन काळे.

मी लगेच शोध घेतला. आश्चर्य म्हणजे ते अजूनही जिवंत होते, आता वयस्कर झाले होते आणि एकटे निवृत्त जीवन जगत होते. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न केला. 

त्यांनी मला पाहून विचित्रपणे हसत विचारले , “तू त्या घरात गेला होतास ना?”

मी न बोलता होकारार्थी मान हलवली.

"तू तिचा आवाज ऐकला आहेस का?" त्यांनी विचारले.

"कोण आहे ती?" मी थेट विचारले.

त्यांनी खिडकीकडे पाहिले, आणि शांतपणे सांगायला सुरुवात केली.

"त्या घरात खूप पूर्वी एक चित्रकार राहत होता, अमेय नावाचा. त्याच्या पत्नीचे नाव वसुधा होते. ती देखील एक लेखिका होती. त्यांनी एकमेकांच्या प्रेमात आपले कलात्मक विश्व निर्माण केले होते. पण हळूहळू वसुधाच्या लेखनात काहीतरी अघोरी, अंधारी गोष्टी उतरू लागल्या. तिच्या म्हणण्यानुसार आरशाच्या पलीकडे एक कथा होती, तिला त्याचे भास होऊ लागले, ते सगळे भास तिने लिहायला घेतले पण ते पूर्ण व्हायच्या आधीच अमेयला त्या अघोरी भासांबद्दल कळले. तिला वेड लागले आहे असे त्याला वाटले

त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती त्या आरश्याच्या भासातून बाहेर येत नव्हती. अमेयने शेवटी तिचा तो जुना आरसा फोडला, पण त्याच वेळी वसुधा अचानक गायब झाली. कुणालाच समजले नाही कि ती कुठे गेली. पण लोक अजूनही एक गोष्ट मात्र ठाम सांगतात,  त्या आरशात तिचे अस्तित्व अडकून पडले होते."

काळेंच्या गोष्टी ऐकून मी सुन्न झालो. "म्हणजे ती अजूनही… तिथेच आहे?"

प्रोफेसर उठले आणि एका जुन्या पेटीतून एक वस्तू काढून माझ्यासमोर ठेवली एक लहानसा, चौरस आरसा. त्यावर काळी पट्टी लावलेली होती.

"हा आरसा कोणीही उघडून पाहू नये असे मला वाटत होते, पण तुझ्याकडे आता निवड उरलेली नाही.”

मी तो आरसा उचलला आणि घरी आलो. उत्सुकतेने त्यावरची काळी पट्टी थोडीशी बाजूला केली.

आणि त्या वेळी … मी त्यात स्वतःला पाहू शकलो नाही.

आरशात मी नव्हतो. तिथे तीच बाई होती, जी मला नेहमी माझ्या आजूबाजूला दिसायची, कदाचित तिचेच नाव वसुधा होते.

हळूहळू तिचे प्रतिबिंब स्पष्ट होत गेले. ती थांबली नव्हती. ती माझ्याकडे पाहत होती आरश्यातून सरळ माझ्या डोळ्यात डोळा घालून पाहत होती. तिच्या ओठांवर शब्द उमटले, पण आवाज आला नाही. मी तिचे ओठ वाचू शकत होतो.

"आता माझी अपूर्ण कथा तूच लिहिणार आहेस."

हे ऐकताच माझ्या हातून आरसा खाली पडला. पण फुटला नाही. तिचे प्रतिबिंब मात्र त्यात अजूनही हलत होते.


मी घाईघाईने काळेंना फोन लावला आणि त्यांना जे चालू होते ते सांगितले.

"तीने तुला निवडले आहे," ते म्हणाले.

"कारण तू देखील लिहितोस, लेखकाला शब्दांच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाच्या आत जाता येते, आणि ती… तीच्या शब्दांमध्येच अडकली आहे."

“मग मी काय करू?” मी जवळजवळ किंचाळलो.

ते म्हणाले, “तुला तिची कथा पूर्ण करावी लागेल… पण एक अट आहे. जर तू तिची कथा अर्धवट सोडलीस, तर तु देखील तिच्याबरोबर अडकून पडशील, आणि पूर्ण केलीस तरी...... .”

त्यांच्या शेवटच्या तीन शब्दांकडे माझे जास्त लक्ष गेले नाही आणि तेथेच माझी मोठी चूक झाली. मी माझ्या टेबलवर बसलो, आणि पहिल्यांदाच ती वही हातात घेतली. मी काही पाने पलटली आणि रिकाम्या पानावर आलो.


मी पेन हातात घेतले आणि विचार केला, जर ती खरेच अडकली असेल, तर कदाचित मीच तिला मुक्त करू शकतो.

पण एक भयंकर शक्यता देखील मनात दरवळू लागली, जर मी लिहायला सुरुवात केली, आणि तिची कथा माझ्या आयुष्यात मिसळू लागली, मग मला त्यातून कोण सोडवणार?

कदाचित हीच भीती प्रत्येकाला असेल आणि त्यामुळे ... ही कथा कोणीच पूर्ण होऊ दिली नसेल.

मी वही उघडली.

पेन सरसावले.

आणि वसुधाच्या कथेचा पहिला परिच्छेद लिहायला सुरुवात केली.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

जलदकथा लेखन स्पर्धा जुलै २०२५ 

0

🎭 Series Post

View all