Login

आरशाचे सत्य

वसुधा आणि आदित्य काय आहे दोघांत साम्य?
भाग ४: हिरव्या शाईची कहाणी

ती रात्र...

मी पेन उचलले, वही उघडली, आणि जेव्हा मी पहिला शब्द लिहिला, तेव्हा मला माझ्या हातात एक वेगळीच थंडी जाणवली जणू माझ्या नसांमध्ये कोणीतरी फिरत होते.

माझे पेन जणू स्वतःहून लिहीत पटापट चालत होते. पहिला परिच्छेद माझ्या मनात तयार होता, पण जसे मी लिहायला लागलो, जे शब्द वहीत उमटले होते, ते मी निवडले नव्हते, आणि तरीही ते माझ्या हातून लिहिले जात होते.

 “पाने भरत होती, शब्द लिहिले जात होते. ती देखील तिथेच होती, आरशाच्या आत, मूकपणे पाहत होती.”

मी गारठलो. कारण अशी वाक्ये मी कधीच लिहिली नव्हती, पण ती कदाचित वसुधाच्या शैलीत होती. तिच्या डायरीतल्या जुन्या नोंदी मला आठवल्या.

आणि मग एकच वास घुमू लागला, तो वास  शाईचा नव्हता, तर जुन्या ग्रंथालयात भिजलेल्या कागदांचा वाटत होता, काहीतरी अनपेक्षित.

माझ्या घराच्या खिडक्या आपोआप थोड्याशा उघडल्या गेल्या. वारा आत घुसून सगळीकडे फिरू लागला, आणि वहीतील पाने उलटू लागली जणू त्यांना कोणीतरी दिशा ठरवून दिलेली होती.

माझी लेखनगती वाढली. मला जाणवत होते की मी माझ्या मनाने लेखन करत नाही आहे, मी केवळ एक पोस्टमन आहे त्यातले सगळे शब्द आणि  वाक्ये वसुधाची होती, फक्त हात माझे होते.

रात्रीचे अडीच वाजले होते.

तेव्हाच घरात काहीतरी हलल्याचा आवाज आला. माझे लक्ष वहीवरून विचलित झाले. मी टॉर्च उचलला आणि आवाजाच्या दिशेने गेलो.

भिंतीवर काहीतरी लिहिले गेले होते,  अदृश्य हाताने अगदी हिरव्या  रंगाच्या शाईत. पण ही वहीतली साधी शाई नव्हती, कदाचित जास्त गडद, आणि जास्त जिवंत वाटणारी होती.

 "इथे पहा, मी इथे आहे, तू आता माझा आवाज झाला आहेस, आता तुला माझे डोळे देखील व्हावे लागेल."

मी मागे सरकलो. माझ्या डोळ्यांसमोर त्या अक्षरांनी आकार घ्यायला सुरुवात केली आणि त्यातून वसुधाचाच चेहरा उमटू लागला. क्षणभर तिचे डोळे खोल आरशासारखे वाटले, आणि मग ते दृश्य डोळ्यासमोरून अदृश्य झाले.

मी त्या रात्री झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी पुन्हा वही उघडली. पण आता ती केवळ वही राहिली नव्हती. तिचे  वजन वाढल्यासारखे वाटत होते, जणू शब्दांनी नव्हे, तर कुठल्यातरी गूढ गोष्टींनी ती भरलेली होती.

एक नवीन वाक्य माझ्या नावाने त्यात लिहिलेले होते.

"अदित्य आता त्या खोलीत बसला, जिथे अमेयने शेवटचा आरसा फोडला होता."

माझे डोळे? मी आरशात पाहिले. माझे डोळे सामान्य दिसत होते. पण माझ्या मागे, एक क्षणभर, दुसऱ्या डोळ्यांची जोडी चमकली.

मी जोरात पाठीमागे वळलो, पण पुन्हा तेथे काहीच नव्हते.

त्या दिवशी मी ठरवले, ही कथा पूर्ण करण्यासाठी जे करायचे असेल ते मी करणार. हीच एकमेव गोष्ट आहे जी मला या सगळ्या भासातून मुक्त करू शकते, मी वसुधाची गोष्ट नक्की लिहिणार, तिचे दु:ख आणि तिचा शेवट सुद्धा.

एक अट मी स्वतःसमोर ठेवली होती, कधीही कुठलीही कथा अर्धवट सोडायची नाही.

मी दिवस-दिवस लिहीत राहिलो. शब्द, परिच्छेद, प्रसंग. मला ती आता स्पष्ट दिसू लागली होती, तिचे जुने आयुष्य, तिचे घर, तिचा नवरा अमेय, आणि… शेवटी तिची मृत्यूसदृश उपस्थिती.

ती एका आरशातून सगळीकडे पाहत होती, आणि अमेय तिला विसरून गेला. ती या भौतिक जगातून गायब झाली, पण स्वतःच्या लेखनात कायमची अडकली.

मी जसे शेवटाकडे पोहोचू लागलो तस तसे काहीतरी विचित्र घडू लागले.

घरातले आरसे हलायला लागले. भिंतींवर निरनिराळी जुनी, काळजाला भिडणारी छायाचित्रे उमटायला लागली.

मला माझ्या लेखनातल्या वाक्यांतून आवाज यायला लागला

"ते अजून उघडले नाही, शेवट लिही."

एका रात्री, मी लिहून थांबलो. तेव्हा त्या वहीतील शाई आपोआप एका वाक्यावर गडद झाली.

"जेव्हा शेवट लिहिला जाईल, तेव्हाच आरसा उघडेल."

मी समजून गेलो,  माझ्याकडून अजून शेवट लिहून झाला नाही.

तो शेवट... मला या सगळ्या त्रासातून मुक्त करू शकेल नाहीतर मी यांच्यात कायमचा अडकून बसेन.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

जलदकथा लेखन स्पर्धा जुलै २०२५ 
0

🎭 Series Post

View all