भाग ५: शब्दांचा शेवट, पण भयाचा आरंभ…
ती अमावस्येची रात्र पुन्हा आली. जशी सुरूवातीच्या वेळी होती अगदी तशीच. माझ्या टेबलावर वही उघडी होती. माझ्या हातात पेन होते, आणि समोरचा आरसा सताड उघडा होता, आता त्यावर पुन्हा काळी पट्टी नव्हती.
वसुधाची कथा आता शेवटाकडे झुकत होती. तिचा राग, तिचे एकटेपण, आरशाच्या छायांमध्ये हरवलेली तिची कहाणी, सर्व काही मी लिहिल्यामुळे ओळखायला लागलो होतो. हे सगळे लिहून झाल्यावर एकच वाक्य शिल्लक राहिले होते.
"शेवटी वसुधा आरशातून बाहेर आली."
ते लिहायच्या आधी मी थांबलो. कारण मला कळत होते, हे फक्त वाक्य नव्हते हे एक दार होते.
ते लिहिले की आरसा उघडणार होता.
ते लिहिले की ती… इथे येणार होती.
पण न लिहिल्यास? मी तिच्याबरोबर अडकून राहणार होतो. मी आधीच तिची कथा लिहिताना तिच्यात मिसळलो होतो, माझे विचार, माझे आयुष्य, माझे अस्तित्व… आता तिच्याशी गुंफलेले होते.
मी डोळे बंद केले, आणि तेच वाक्य लिहिले:
"शेवटी वसुधा आरशातून बाहेर आली."
त्या क्षणाला घरातला प्रत्येक आरसा जणू थरथरायला लागला. वाऱ्याचा आवाज घरभर गडद आणि असह्य झाला. वहीतून शाई जणू सांडायला लागली, हिरव्या रंगाची जिवंत लाट, जी शब्दांमधून वाहू लागली.
आरसा हळूहळू धूसर होत गेला. आणि मग.......
ती दिसली.
वसुधा.
ती आरशाच्या आत नव्हती, आता ती माझ्या समोर उभी होती. एक स्त्री जिचा चेहरा भावनांनी भरलेला होता, पण तिच्या नजरेत मानवतेचा लवलेशही नव्हता.
"तू... तू शेवटी मला पूर्णपणे लिहिलेस," तिचा आवाज ओलसर, पण साखर पेरलेल्या शापासारखा वाटत होता.
मी मान हलवली.
"माझा शेवट देण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे... पण शेवट म्हणजे अर्धविराम असू शकतो, पूर्णविराम नव्हे?"
ती माझ्याजवळ आली, आणि माझ्या कपाळाला हात लावला.
त्या स्पर्शात जे काही होते, ते शब्दात सांगता येणार नाही, तिने माझ्या आठवणीतून तिच्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. एक गूढ शांतता सगळीकडे उतरली.
"माझी कथा तू पूर्ण केलीस, अदित्य. आता तुझी कथा सुरू होणार."
"म्हणजे?" मी विचारले.
ती हसली, आणि तिचा हात आरशावर टेकवला.
आरशामध्ये एक विस्तीर्ण अंधार दिसत होता आणि त्या अंधाराच्या आत एक दार उघडले होते.
"माझे शरीर तुझ्यातील शब्दांमध्ये अडकून होते. आता मी आरशामधून मोकळी आहे. पण त्या आरश्याला रिकामे ठेवता ठेवता येणार नाही… त्यात कोणाला तरी राहावे लागेल."
"म्हणजे मी ?" मी घाबरून विचारले.
"त्याशिवाय गत्यंतर नाही, तुला देखील तुझी कहाणी लिहिण्यासाठी कोणाची तरी सोय करावी लागेल."
मी किंचाळलो, मागे हटण्याचा प्रयत्न केला. पण शरीर हलेना. पाय जणू जमिनीला चिकटले होते.
ती हळूहळू पुढे आली. तिच्या डोळ्यात आता तृप्ती होती, एका अपूर्ण आत्म्याची पूर्णता.
शेवटचा शब्द वहीत कोरला गेला:
“लेखक आता आरशात राहतो. आणि त्याची कथा अजून सुरू करायची आहे…”
---------------------
एक महिन्यानंतर ...
ती जुनी वही, एका रद्दीच्या दुकानात विकायला आली होती. त्याची पाने पिवळसर दिसत होती , पण अक्षरे एकदम स्पष्ट होती.
शिवानी नावाच्या एक तरुण लेखिकेच्या डोळ्यात ती भरली आणि तिने ती घेतली.
पहिले वाक्य होते:
“या वहीत कथा स्वतःहून जन्म घेईल त्यासाठी कोणाच्या विचाराची गरज नाही.”
शिवानी हसली. तिला ठाऊक नव्हते, ती फक्त वही नव्हती. ते एक दार होते "आरशाचे दार" .
समाप्त
सूत्रधाराच्या शब्दांत:
तुम्हाला सापडली आहे का एखादी वही ज्यात एखादे अर्धवट वाक्य खरडले गेले आहे ? शब्द अपूर्ण ठेवले आहेत ?
...तर सावध रहा. कदाचित, कोणी तरी त्या वाक्याच्या पलीकडून तुमच्याकडे पाहत असेल.
भालचंद्र नरेंद्र देव
जलदकथा लेखन स्पर्धा जुलै २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा