चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
(जलद कथालेखन)
शीर्षक : आरती सहस्त्रबुद्धे (अंतिम भाग) (भाग-३)
"तर?" दोन्ही भुवया जुळवून संकेतने नजर शांभवीवर रोखली. संभ्रम मिश्रित हावभाव होते त्याच्या चेहऱ्यावर...
"तिचा प्रियकर तिच्या सोबत होता." शांभवी बोलली आणि त्याला परत एकदा आश्चर्याचा धक्का बसला.
"एखाद्या चित्रपटापेक्षा या केसमध्ये जास्त ट्विस्ट आहेत." तो काहीसा वैतागून पण हसत म्हणाला.
"खरंच!" तीसुद्धा हलकीशी हसली.
"तिचा प्रियकर लग्नानंतरचा की आधीचा?" त्याने पुढील प्रश्न विचारला.
"लग्नाआधीचा प्रियकर होता— मंगेश. ते दोघे लग्न करणार होते; पण त्याची आर्थिक स्थिती स्थिर नव्हती. अशातच तिला वरद सहस्त्रबुद्धेचे स्थळ आले. वरदच्या वडिलांनी आरतीच्या वडिलांना वचन दिले होते, आरतीला सहस्त्रबुद्धे घराण्याची सून करण्याचे. त्यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची इच्छा वरदच्या आईला पूर्ण करायची होती. त्यांनाही कॅन्सर असल्याने त्यांच्याकडे फक्त एक महिना शिल्लक होता आणि त्यांना डोळ्यांदेखत मुलाचा संसार पाहायचा होता म्हणून जरा घाई होती; पण क्षणात करोडो रूपये कमावण्याची हीच आयती संधी भासली आरती आणि मंगेशला व अशा प्रकारे सुरुवात झाली त्या कटकारस्थानाला..." एकेक घटना ती नीट समजावून सांगत होती, त्यामुळे संंकेतला सहज कल्पना येत होती.
"मग तिचा अपघात झाला होता की नाही? आणि बाळ?" त्याच्या मनात घोंघावत असणारा प्रश्न त्याने विचारून मोकळा केला कारण अजूनही त्या प्रश्नाचे उत्तर प्रकाशझोतात आले नव्हते.
"हो अपघात झाला होता आणि ती प्रेग्नंटसुद्धा होती; पण त्या अपघातामागेही त्यांचीच अवलक्षणी बुद्धी होती. श्रीमंत होण्याची त्यांची लालसा एवढी वाढली होती की त्यांनी त्यांच्या बाळाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहिले नाही." शांभवी उसासा घेत म्हणाली.
संकेतचे डोळे रागाने लाल झाले आणि तो राग व्यक्त करतच म्हणाला, "खूप घाण प्रकार आहे हा! म्हणजे किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात लोक पैशासाठी... आणि तुम्ही म्हणालात त्यांच्या बाळाचा जीव? याचा अर्थ ते बाळ..."
"हो ते बाळ आरती आणि मंगेशचे होते. वरद आणि आरती सहस्त्रबुद्धे यांच्यात त्या प्रकारचे नाते कधी फुललेच नव्हते, हे वरदने स्वतः सांगितले. शिवाय आरतीने तिच्या जुन्या सुटकेसमध्ये प्रेग्नन्सी रिपोर्ट्स लपवून ठेवले होते. ते रिपोर्ट्स शोधून त्यांची पडताळणी आम्ही केली तर त्यातूनही सिद्ध झाले की ते बाळ आरती आणि मंगेशचेच होते." शांभवीने सविस्तर माहिती दिली.
"मला यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच सुचेना. अशाही घटना घडतात समाजात म्हणून सर्वांगीण विचार करूनच कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवायला हवे, एवढेच म्हणावेसे वाटते. हल्ली कायदा, सोशल मिडियाचा किती गैरवापर होतोय. ठोस पुरावा नसलेल्या गोष्टी सर्रास व्हायरल होतात कालांतराने कळते की असे काहीच नाही; पण तोपर्यंत संबंधित व्यक्तीला बराच मनस्ताप झालेला असतो म्हणून प्रेक्षकांनी सोशल मिडीया वापरताना काळजी घ्यावी, हेच सांगणे आहे." संकेत ती घटना ऐकून निःशब्द झाला होता; पण भविष्यात असे परत घडू नये म्हणून त्याने कॅमेराकडे बघतच प्रेक्षकांना सूचना दिली.
"बरोबर. तुम्ही निदान शहानिशा करा. आपल्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे बातमी पोहोचली म्हणजे खरीच असणार, हा मनोग्रह बाळगू नका. यात आम्ही काय करू शकतो? जनजागृती व्हावी याच हेतूने आम्ही फॉरवर्ड करतो, असे बोलून जबाबदारी झटकू नका. कोणतीही कृती विचारपूर्वक करा कारण या समाजात आपणही राहतो. या बारीकसारीक गोष्टींची काळजी आपणही घ्यायला हवी, कारण आपली ती जबाबदारी आहे." शांभवीनेही संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकून तिचे मत मांडले.
"सहमत आहे शांभवी ताई. चला, खूप रंगत आली या कार्यक्रमात तुमच्या मुलाखतीने; शिवाय अतिशय उपयुक्त संदेशही मिळाला. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले खूप आभार. आणखी कधीतरी आपण अशीच मुक्त चर्चा नक्की करूया." संकेत मंद हसून कार्यक्रमाची सांगता करत म्हणाला.
"नक्कीच." ती हसत म्हणाली. त्यानंतर संकेतने त्यांच्या कार्यक्रमाविषयी शांभवीला अनुभव विचारला. तिने थोडक्यात उत्तर दिले आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
शांभवीचा नवरा कौस्तुभ शिलेदार त्या कार्यक्रमाला हजर होता; त्यामुळे ती त्याच्या सोबतच तिथून बाहेर पडली. मुलाखतीत बराच वेळ निघून गेला होता. पावसाळ्याचे दिवस होते, सायंकाळ झाली होती आणि काळे ढग दाटून आले होते; म्हणून घाईतच ते दोघे कारमध्ये बसले. त्याने कार सुरू केली. थोडे अंतर पार केले होतेच की विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
शांभवी खिडकीतून हात काढून पावसाचे थेंब हातावर झेलतच होती की तिचे कौस्तुभकडे लक्ष गेले, तो तिला गालात हसताना दिसला.
ती बारीक डोळे करून म्हणाली, "तुला हसायला काय झाले?"
"काही नाही, माझी बायको किती शिताफीने खोटे बोलू शकते, याचे नवल व्यक्त करतोय." तो तिला चिडवत म्हणाला आणि ओठ दाबून हसला.
"तू ना असाच आहेस... काय चुकीचे बोलले मी? मी बोललेला प्रत्येक शब्द खरा होता. आरतीला प्रियकर नव्हता का? की ती प्रेग्नंट नव्हती?" ती गाल फुगवून हाताची घडी घालून त्यालाच प्रश्न विचारत होती.
"हो ना, राजा हरिश्चंद्राची सावत्र लेकच ना तू!" तो एका हाताने गाडी चालवत हळूच तिचे नाक ओढत म्हणाला.
"तू बोलूच नको माझ्याशी..." ती लटक्या रागात म्हणाली.
"ओके, एवढे खरे बोलायला आवडते तुला तर आरतीच्या नवऱ्याचे नाव वरद सहस्त्रबुद्धेऐवजी कौस्तुभ शिलेदार आहे, हे का नाही सांगितले सगळ्यांना? आणि सरतेशेवटी आरतीला दोषी सिद्ध करून वरदला का व्हिक्टिम सादर केलेस? हं? सांग ना आता..." तो तिला डिवचत म्हणाला.
"ते सांगितले असते तर आपण एवढी प्लॅनिंग करून आरतीचा काटा काढला हे सांगावे लागले असते, नाही का? आणि मला एवढे बोलतोयस, जसा तू खूप मोठा सज्जनच आहेस. खरा मास्टरमाईंड तर तू होतास. आरतीला एवढे कन्फ्यूज केलेस की आधी ती बिचारी वेडी झाली आणि नंतर तिच्या बाळासह तिचा अपघात केला. त्यातच ती मरण पावली. एवढ्यात तू थांबला नाहीस. खोटे पुरावे सादर करून, तिला चारित्र्यहीन सिद्ध करून तिच्या अपघातासाठी तिच्याच प्रियकराला— त्या मंगेशला दोषी ठरवलेस. आता सांगा, यावर काय मत आहे आपले मग श्रीयुत कौस्तुभ शिलेदार?" तिने त्याच्या कृत्यांची बाराखडी त्याच्यापुढे वाचली आणि तीही खुनशी हसली.
"हो मग! मला नव्हते करायचे तिच्याशी लग्न. माझे तुझ्यावर प्रेम होते. आईला तुझ्याविषयी सांगितले होते तरीही तिला बाबांचे वचन पूर्ण करण्याची हौस होती. त्या आरतीचा बॉयफ्रेंड होता तर तिने लग्नाला नकार द्यायला हवा होता ना? पण नाही! तिला तर हौस होती माझ्याशी संसार थाटायची. मिरवायचे होते कौस्तुभ शिलेदारची बायको म्हणून... एवढ्यावरच थांबली नाही ती... लग्न झाल्यावर आमच्यात कधी फिजिकल इंटरॲक्शन झाले नव्हते, तरीही ती प्रेग्नंट होती. अर्थात ते बाळ तिच्या प्रियकराचे होते, तिला कल्पना होती; पण हेसुद्धा कळवले नाही तिने मला. उलटपक्षी माझ्या नकळत अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. तिला वाटले की भूतकाळाची सावली ती पुसू शकेल; पण मी तिची माहिती आधीच काढली होती, हे कळायला तिच्याकडे तेवढी अक्कल नव्हती. फक्त एक महिना होता आईकडे... ती असेपर्यंत मला काहीच करता येणार नव्हते, किंबहुना मला काही करायचेही नव्हते म्हणून वाट पाहिली आणि आई गेल्यावर सरळ प्लॅन एक्झिक्युट केला." कौस्तुभ आसुरी हसत गर्वाने म्हणाला.
"आता हे मलाच सांग. मीही त्यात तुझी पार्टनर होतेच ना!" ती ओठांच्या कडा उंचावत हसून म्हणाली.
"ऑफकोर्स माय क्राईम पार्टनर." असे बोलतच तो गडगडाटी हसला. त्याला प्रतिसाद देत तीसुद्धा खळखळून हसली.
दोघेही त्यांच्या तल्लख बुद्धीवर गर्व करून आरतीच्या हतबलतेवर हसून जल्लोष साजरा करत होते. तेवढ्यात अचानक एक वीज जवळच्याच एका झाडावर पडली आणि ते झाड त्यांच्या धावत्या कारवर कोसळले व ते दोघेही आसुरी हसतच मृत्यूमुखी पडले.
पृथ्वीवरील न्याय व्यवस्थेनुसार कदाचित ते दोघेही निर्दोष होते. कायद्याची दिशाभूल करण्यात त्यांना यश आले होते, कारण त्यांच्या कुकृत्याची ग्वाही देणारा एकही पुरावा वा साक्षीदार अस्तित्वात नव्हता. म्हणूनच त्यांना कोणतीही शिक्षा होणार नव्हती; पण नियती कदाचित त्यांच्या प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवत होती. दोन वर्षे झाली होती त्या घटनेला; पण उशिरा का होईना आज नियतीने तिच्या पद्धतीने न्याय केला होता.
समाप्त
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा