Login

आरती सहस्त्रबुद्धे (भाग-१)

कायद्याचा हल्ली सदुपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त होतोय, नाही का? हे मीच नाही तर डॉ. शांभवी गुप्तेही म्हणतात. का? ते जाणून घेण्यासाठी वाचा ही जलद कथा— आरती सहस्त्रबुद्धे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)

शीर्षक : आरती सहस्त्रबुद्धे (भाग-१)

"तुम्ही आजपर्यंत अनेक केसेस स्टडी केल्या आहेत. पोलीस, न्यायव्यवस्था यांचीही तुम्ही तुमच्या ज्ञानाने मदत केली आहे. तर अशी एखादी किचकट केस, जी सॉल्व्ह करायला, स्टडी करायला तुम्हाला बराच अवकाश लागला आणि ती केस अशा एखाद्या वळणाकडे घेऊन जाईल, यावर तुम्हाला विश्वासच बसला नाही. अशी एखादी केस तुमच्या स्मरणात आहे का शांभवी ताई?" एका नामांकित मराठी वाहिनीवर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शांभवी गुप्तेची मुलाखत सुरू होती आणि तिथेच हा प्रश्न मुलाखतकार संकेतने विचारला होता.

"अं... हो आहे. आरती सहस्त्रबुद्धे केस. हल्ली हल्लीचीच, म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वीची घटना आहे. ॲक्च्युली प्रायव्हसीमुळे नावे गुप्त ठेवावी लागतात; पण ही केस जरा वेगळी आहे म्हणून मी नाव उघडपणे सांगतेय." शांभवी म्हणाली.

"ओह, पण तुम्ही त्या केसविषयी विस्तृत सांगू शकाल का? म्हणजे नेमके काय घडले होते?" संकेतने परत विनंतीस्वरूप प्रश्न केला.

"आरती सहस्त्रबुद्धे, ती एकाएकी आली माझ्याकडे आणि म्हणाली की ती माझी पेशंट नाहिये पण तिला माझी मदत हवी." शांभवी केसबद्दल सांगू लागली.

"काय?" संकेतच्या भुवया उंचावल्या.

"हो, हेच म्हणाली ती. प्रथमदर्शनी मलाही तिचे शब्द काही कळलेच नाही. त्यावर ती म्हणाली की तिच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या बाळाला अपघाताद्वारे मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली आणि तिला फक्त गंभीर जखमा झाल्या; पण बाळ मरण पावले, म्हणून मदतीसाठी ती माझ्याकडे आली आहे." शांभवी हळूहळू पैलू उलगडत होती.

"बाप रे!" मुलाखतकार आता जिज्ञासेने ऐकू लागला.

"अशीच माझीही प्रतिक्रिया होती; पण मी म्हटले तिला की मी यात काहीच मदत करू शकत नाही. तिने पोलिसात तक्रार करावी, माझ्यापेक्षा ते तिची योग्य मदत करतील. त्यावर ती म्हणाली की तिचा नवरा खूप प्रसिद्ध वकील आहे. समाज, कायदा आणि न्यायव्यवस्थेत त्याला आदर आणि लौकिक प्राप्त आहे; त्यामुळे ती कितीही जीव तोडून तक्रारी करत असली तरी कोणीही तिचे ऐकून घेत नाही. एवढेच नव्हे तर ती आत्मविश्वासाने म्हणाली की तिला शंका आहे, तिच्या नवऱ्याने लाच देऊन संपूर्ण प्रकरण दाबले असावे." शांभवी म्हणाली. ते ऐकून संकेतचे डोळे विस्फारले.

"अरे देवा! खरंच? पण तरीही यात तुम्ही कशी मदत करू शकणार? इट्स नॉट युअर टेरिटरी..." संकेत म्हणाला.

"अगदी बरोबर. माझाही हाच मुद्दा होता. मी असे विचारल्यावर ती म्हणाली की तिला माहिती आहे मला हिप्नोटाईज करता येते. तिने रेडिओवर माझी मुलाखत ऐकली आणि मदतीसाठी माझ्याकडे ती आली, असे तिचे म्हणणे होते... तर ती म्हणाली मला की मी तिला हिप्नोटाईज करून तिला त्या घटनेबद्दल सविस्तर विचारावे व त्या आमच्यातल्या संभाषणाचा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करावा, जेणेकरून ती, ते रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरू शकेल किंवा सोशल मिडीयावर तरी व्हायरल करून तिच्या नवऱ्याचा खरा चेहरा जगासमोर आणेल; कारण तिचा दावा होता की त्या घटनेचे दोनच साक्षीदार होते, एक ती आणि दुसरे तिचे बाळ. बाळ तर जिवंत नव्हते म्हणून तिच्या बाळाचा सूड घेण्यासाठी तिने स्वतःला हिप्नोटाईज्ड करून सत्य उघडकीस करण्याचा मार्ग निवडला. एखाद्याला हिप्नोटाईज करून अशा गोष्टी जाणून घेणे, हे खूप जोखमीचे काम असते. याचे साईड इफेक्ट्स असतात, हेसुद्धा मी सांगितले; पण ती ठाम होती. तिचा निश्चय डगमगला नाही." बोलता बोलता शांभवीचे मन त्या केसच्या आठवणीत परत गुंतले. संकेत आता मध्येच प्रश्न न विचारता शांत ऐकत होता.

"मग माझा नाईलाज झाला आणि ती माझी पेशंट नसूनही तिच्या बाळासाठी मी तिला हिप्नोटाईज केले आणि हिप्नोटाईज केल्यावर जे काही कळले ते ऐकून मी सुन्न झाले. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किती निष्ठुर असावे ना! तिचा नवरा वरद सहस्त्रबुद्धे आता माझ्यासाठी एखाद्या जल्लादापेक्षा कमी नव्हताच. ती हिप्नोटाईज असतानाही त्याच्याविषयी, त्या अपघाताच्या प्रसंगाविषयी आठवून हादरून गेली होती. थरकाप सुटला होता तिला आणि तिला त्या अवस्थेतून बाहेर काढणे जवळजवळ अशक्य झाले होते; पण सुदैवाने ती सुखरूप होती. शुद्धीत आल्यावर तिला मी व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली. तिने रडतच पुन्हा एकदा खात्री केली. व्हिडिओ तपासण्याआधी थोडा वेळ तिला गिल्ट वाटत राहिले की जर केवळ अपघातच झाला असेल तर तिने नाहक तिच्या नवऱ्याला दूषण लावले; पण जेव्हा तिने रेकॉर्डिंग पाहिले, ऐकले तेव्हा खचली ती पूर्ण. मात्र धीर न गमावता माझे आभार मानून ती निघून गेली." शांभवी बोलून थांबली आणि प्याल्यातले पाणी पिऊ लागली.

संकेत तिला वेळ घेऊ देत होता. उत्सुकता असली तरी अति प्रश्न विचारून गोंधळ निर्माण करत नव्हता.

"मग साधारण दोन दिवसांनी मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी कॉल उचलला तर पलीकडून वरद सहस्त्रबुद्धे बोलत होते." शांभवी बोलली पण तिचे वाक्य ऐकून काही क्षण तिथे शुकशुकाट पसरला.

"व्हॉट? एक मिनिट, काय म्हणालात... वरद सहस्त्रबुद्धे यांनी तुम्हाला कॉल केला?" संकेतने भुवया आकसून विचारले.

"हो." शांभवी उत्तरली.

"आणि ते काय म्हणाले?" त्याने घाईतच विचारले.

"ते म्हणाले की त्यांच्या पत्नीला अर्थात आरतीला गैरसमज झाला आहे. तसे काहीच झालेले नाही. त्यांनी कोणताही अपघात केला नाही; पण आता आरती त्यांना ते व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया आणि मीडियामध्ये प्रसारित करण्याची धमकी देत आहे." शांभवीने माहिती दिली.

"ओह!" असे बोलून संकेतने भुवया उंचावल्या.

"ह्म्म. त्यावर मी काय बोलणार! कारण मला कोणाच्याही बाजूने बोलण्याचा अधिकार नव्हता. त्या संपूर्ण घटनेत माझी भूमिका फक्त एवढीच होती की मी आरतीला हिप्नोटाईज करून तिच्याकडून सत्य जाणून घेतले आणि ते त्या व्हिडिओमध्ये कैद झाले." शांभवीने खांदे उडवत तिचा दृष्टीकोन मांडला.

"बरोबर." संकेतने दुजोरा देत होकारार्थी मान हलवली.

"मी वरदलाही हेच बोलले त्यावर ते म्हणाले की— हिप्नोटाईज झाल्यावर व्यक्ती बरेचदा त्याच्या विचारशक्तीने, त्याची जी समजूत असते त्याच आधारावर त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असतो; त्यामुळे त्या अवस्थेत कबूल केलेल्या घटना प्रत्यक्षात घडल्या असतीलच, असे नाही. ते कबुलीजबाब खरे असतीलच, असे नाही; कारण त्या अवस्थेत व्यक्ती कल्पना आणि वास्तव यातला फरक ओळखू शकत नाही. लॉजिकली ही वॉज राईट. असेही बरेचदा घडते आणि घडलेले आहे की व्यक्ती त्याच्या कल्पनेत एवढा गुंतून जातो आणि मग खऱ्या-खोट्यातला फरकच त्याला समजून घेता येत नाही." शांभवीने संदर्भ दिला.

"अच्छा!" पायावर पाय ठेवून, खुर्चीवर मागे सरकून बसत संकेत म्हणाला.

"पण मी त्यात काहीच करू शकत नव्हते. मी हिप्नोटाईज्ड केले असले तरी शब्द आरतीचेच होते. मी कोणत्याही प्रकारची बळजबरी तिला केलेली नव्हती." शांभवी म्हणाली. संकेत शांतपणे ऐकत होता, जणू तोसुद्धा त्या घटनेचा अभ्यास करत असावा, असेच भासत होते.

"पण वरद सहस्त्रबुद्धेचे काय मत होते किंवा त्यांना तुमच्याकडून काय हवे होते? त्यांचा तुम्हाला कॉल करण्याचा हेतू काय होता मुळात?" संकेतने जिज्ञासेपोटी विचारले; पण त्याचे प्रश्न ऐकून ती थोडीशी गूढ हसली.

क्रमशः

©® सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
0

🎭 Series Post

View all