Login

आरती सहस्त्रबुद्धे (भाग- २)

कायद्याचा हल्ली सदुपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त होतोय, नाही का? हे मीच नाही तर डॉ. शांभवी गुप्तेही म्हणतात. का? ते जाणून घेण्यासाठी वाचा ही जलद कथा— आरती सहस्त्रबुद्धे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)

शीर्षक : आरती सहस्त्रबुद्धे (भाग-२)

मुलाखतकार असल्याने संकेतला हावभाव टिपण्याची सवय होती. त्या क्षणीही तो शांभवीचे हावभाव बारकाईने टिपत होता आणि तिचे गूढ हसणे त्याला बुचकळ्यात पाडून गेले; पण तो शांत राहिला.

"वरद सहस्त्रबुद्धेची इच्छा होती की मी ती व्हिडिओ रेकॉर्डिंग आरतीकडून परत घ्यावी आणि ती समूळ नष्ट करावी; पण मी ते करू शकणार नव्हते, किंबहुना मला ते करायचेच नव्हते म्हणून मी स्पष्ट नकार दिला. मी फोन ठेवणार तेवढ्यात ते म्हणाले की असे पुरावे न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येत नाही. एवढेच काय पोलीसही अशा पुराव्यांची गांभीर्याने दखल घेत नाहीत. आतापर्यंत मला वाटत होते की कदाचित वरद सहस्त्रबुद्धे निर्दोष असू शकतात; पण त्यांनी ते वाक्य उच्चारले आणि मला जाणीव झाली की आरतीचा दावा खरा असू शकतो." ते बोलताना शांभवीचा चेहरा आता गंभीर झाला होता.

"म्हणजे?" संकेतच्या कपाळावर लगेच आठ्या पडल्या.

"म्हणजे त्या परिस्थितीतही ते मला सांगत होते की तो पुरावा कायद्याच्या दृष्टीने निरर्थक आहे. त्याचा काहीच उपयोग नाही वगैरे... शिवाय त्यांचा पेशा पाहता कायद्याचे, पुराव्यांचे त्यांना पुरेपूर ज्ञान असणारच. अर्थात कोणते पुरावे उपयुक्त आणि कोणते नाहीत, हे अचूक माहिती होते त्यांना. त्यात डावपेच खेळण्यात तरबेज; त्यामुळे मला कळले की ते केसला मॅनिप्युलेट करत आहेत आणि अप्रत्यक्षपणे कबूल करत आहेत की कायद्याच्या दृष्टीने ते अजूनही निर्दोष आहेत." शांभवी म्हणाली.

"ओह! मग?" संकेत आता त्या घटनेमध्ये पूर्ण गुंतला होता.

"मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि कॉल ठेवला. त्यानंतरही बरेच कॉल आले त्यांचे, मी सरळ दूर्लक्ष केले; पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते माझ्या घरी पोहोचले." शांभवी म्हणाली; पण संकेत मात्र आ वासून पाहत राहिला.

"हं? सरळ घरी?" तो डोळे विस्फारून चढ्या आवाजात म्हणाला.

"हो." ती शांतपणे म्हणाली.

"त्यांना तुमचा पत्ता कसा मिळाला?" संकेतने विचारले.

"माझी आई, वरद शाळेत असताना त्यांची शिक्षिका होती." तिने धक्कादायक खुलासा केला.

"काय सांगता..." संकेतला आश्चर्य वाटले.

"ह्म्म... वरदला कदाचित मी त्यांच्या शाळेतील वर्गशिक्षिकेची मुलगी आहे, हे कळले होते म्हणून त्यांनी माझ्या आईशी संपर्क साधला आणि माझ्या मातोश्रीने त्यांना घरीच बोलवून घेतले. मी आईवर भयंकर चिडले आणि ती तिच्या विद्यार्थ्याप्रती बायस्ड होत आहे, असेही म्हणाले. त्यावर ती म्हणाली की जसे मी आरतीचे ऐकून घेतले, तिची बाजू जाणून घेतली, तशीच एक संधी वरदलाही द्यायला हवी. जर नाही दिली संधी, तर एकप्रकारे मीसुद्धा पक्षपात करतेय. आईचे म्हणणे कुठेतरी पटले मला म्हणून मी दिली संधी त्यांना बोलायला... मात्र जेव्हा त्यांनी त्यांची बाजू सांगितली तेव्हा मी अक्षरशः पेचात पडले. कोण खरे, कोण खोटे सुचायला मार्गच नव्हता." असे बोलून शांभवीने जरासा सुस्कारा घेतला.

"त्यांची बाजू काय होती? त्यांनी असे काय सांगितले तुम्हाला?" संकेतने न राहवून विचारले आणि शांभवी काही क्षण शांत झाली.

"ते म्हणाले की त्यांची पत्नी आरती सहस्त्रबुद्धे प्रेग्नंट आहे, हेच त्यांना माहीत नव्हते." शांभवी बोलली आणि आता संकेत सुन्न झाला.

जरा वेळ शांत बसून संकेत लगेच म्हणाला, "असे कसे? कोणतीही पत्नी ती प्रेग्नंट असल्याबद्दल बाळाच्या बाबाला सगळ्यात आधी कळवते, मग आरतीने का सांगितले नाही? आणि जर वरद सहस्त्रबुद्धे यांना काहीच माहिती नव्हते तर अपघात मुळात कोणी केला? आणि त्यासाठी आरतीने वरदला का दोषी ठरवले?"

"या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी ती व्हिडिओ रेकॉर्डिंग परत पाहिली. प्रत्येक मानसोपचार तज्ज्ञांकडे भविष्यात तीच केस स्टडी करता यावी म्हणून एक एक्स्ट्रा प्रत असते, माझ्याकडेही होती; म्हणून मी ती व्हिडिओ रेकॉर्डिंग परत पाहिली आणि बारकाईने प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण केल्यावर धक्कादायक खुलासा झाला. मी लगेच वरदला कॉल करून माझ्या घरी बोलवून घेतले आणि त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांना त्याबद्दल कळताच ते पुरते कोलमडले. त्यांची अवस्था पाहून त्यांना कसा आधार द्यावा, हेच कळले नाही मला; पण अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात होत्या आणि त्याचा सुगावा घेणे सहज शक्य नव्हते. मुळात आरतीला बोलते करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता." संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात शांभवी पूर्णपणे गुंतली होती.

"ताई, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी माफ करा; पण कोणता खुलासा झाला, ते सांगायला विसरलात तुम्ही..." संकेत दिलगिरी व्यक्त करून तिला आठवण करून देत म्हणाला.

"हो का! माफ करा. ओघाओघात झाले असे." शांभवी सौम्य स्वरात म्हणाली.

"हरकत नसावी; पण तुम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग पाहून जे कळले त्याविषयी सांगा. कोणता धक्कादायक खुलासा झाला?" संकेत मूळ प्रश्नाकडे वळला.

"आरती सहस्त्रबुद्धे त्या दिवशी हिप्नोटाईज्ड झालीच नव्हती." शांभवीने गौप्यस्फोट केला.

"काय?" ते ऐकून संकेतला त्यावर विश्वासच बसला नाही म्हणून स्वाभाविक प्रतिक्रिया दिली त्याने...

"हो पूर्ण प्रक्रियेदरम्यान ती हिप्नोटाईज्ड झालीच नव्हती, ती पूर्ण शुद्धीत होती. तिने सखोल अभ्यास केला होता की हिप्नोटाईज्ड कसे होतात आणि हिप्नोटाईज्ड होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी, हे सर्वकाही तिला ठाऊक होते. म्हणून मी ज्यावेळी तिला हिप्नोटाईज करत होते, त्यावेळी ती मला फक्त भासवत होती की ती माझा प्रत्येक शब्द ऐकून हिप्नोटाईज झालीये. मग मी तिच्या जवळ चुटकी वाजवताच ढोंग करतच तिने खोटी घटना, वास्तवदर्शी अभिनय करून खरी असल्यासारखी सांगितली आणि मला खात्री पटवून दिली की तिचा कबुलीजबाब शंभर टक्के खरा आहे." असे बोलून शांभवीने परत एकदा सुस्कारा घेतला.

"पण का? कशासाठी खोटा कबुलीजबाब आरतीने व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला? त्यामुळे तिला काय साध्य होणार होते?" संकेतला आता घटनेमागे दडलेले मुख्य कारण जाणून घ्यायचे होते.

"कारण तिला पैशांची हाव होती. तिचा मुख्य हेतू केवळ त्या व्हिडिओद्वारे वरदला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळणे होता. तिला हे ठाऊक होते की तो पुरावा कायद्याच्या दृष्टीने जराही उपयुक्त नाही; पण तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर वरद सहस्त्रबुद्धेची प्रतिष्ठा, ओळख नामशेष व्हायला फार काळ लागला नसता; कारण सोशल मीडियावर मिळालेली माहिती खरी की खोटी हे पडताळण्याचे कष्ट घेतले जात नाही. शंभरपैकी निदान तीस लोकांनाही तिचा कबुलीजबाब पटला तर हळूहळू वरद सहस्त्रबुद्धेच्या करिअरला वाळवी लागणार होती. साहाजिकच स्वतःचे करिअर वाचवण्यासाठी वरदकडे तिची मागणी पूर्ण करण्याशिवाय पर्याय राहणार नव्हता." शांभवीने आरतीचा हेतू सांगितला.

"ह्म्म. हल्ली कायद्याचा सर्रास चुकीचा वापर करतात काही स्त्रिया आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही केस आहे." आता संकेतला पूर्ण केसचा गाभा कळला होता म्हणून तो म्हणाला.

"बरोबर. फेमिनिझम ही संकल्पना समजून न घेता समाजात काहीही घडत आहे आणि वाईट तर या गोष्टीचे वाटते की जे कायदे संरक्षणार्थ रचले गेले होते तेच कायदे चुकीच्या विचारसरणीच्या लोकांसाठी त्यांचे शस्त्र झाले आहे." शांभवी खंत व्यक्त करत म्हणाली.

"अगदीच मान्य; पण मला नवल तर याचे वाटत आहे की एवढी काटेकोर योजना एकट्या आरतीने आखली! खरंच हे विचार करण्यापलीकडे आहे." संकेत परत केसकडे वळत म्हणाला.

"ती एकटी नव्हती..." सूचक हसत शांभवी म्हणाली; पण ते ऐकून संकेतच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

क्रमशः

©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
0

🎭 Series Post

View all