Login

आरसा आणि सावली भाग - २

त्याग आणि स्वप्नं यांच्या संघर्षातून दोन बहिणी एकमेकींना स्वतःचं खरं अस्तित्व ओळखायला शिकवतात. शेवटी समजतं, एकमेकींशिवाय दोघीही अपूर्ण आहेत.
आरसा आणि सावली भाग - २


मृण्मयी निघून गेल्यानंतर घर फार मोठं झाल्यासारखं वाटू लागलं. अनघाला सुरुवातीला हे जाणवलंच नाही. सकाळी उठून चहा, बाबांची औषधं, ऑफिस, परत घरी येणं, सगळं पूर्वीसारखंच सुरू होतं. फरक एवढाच होता की आता घरात मृण्मयीच्या पावलांचा आवाज नव्हता, तिचं हसणं नव्हतं आणि रात्री उशिरापर्यंत वाजणारा तबल्याचा हलका ठेका नव्हता.

पहिल्या काही दिवसांत अनघा स्वतःलाच सांगत होती,
“हे सगळं तात्पुरतं आहे. सवय होईल.” पण सवय काही लागत नव्हती.

बाबा शंकरराव मृण्मयी गेल्यापासून अधिकच गप्प झाले होते. पूर्वी ते अनघाशी थोडंफार बोलायचे, पण आता बहुतेक वेळ खिडकीजवळ बसून बाहेर पाहत राहायचे.

जणू मृण्मयी परत येईल, अशी वाट पाहत. एक दिवस अचानक त्यांनी विचारलं, “अनघा… मृण्मयी ठीक असेल ना?” अनघा थोडी थांबली. “हो बाबा. फोन करते ती रोज.” खरं तर रोज नाही, पण आठवड्यातून दोन-तीन वेळा.

मृण्मयी खूप व्यस्त होती, सराव, क्लासेस, नवे लोक, नवं शहर. तिच्या आवाजात उत्साह होता, पण कुठेतरी अपराधभावही लपलेला होता.

फोन ठेवताना ती नेहमी म्हणायची, “ताई, तू स्वतःची काळजी घे.” आणि अनघा हसायची. “मी ठीक आहे.”
पण “ठीक” म्हणजे काय, हे तिलाच माहीत नव्हतं.
अनघाचं दडलेलं स्वप्न

एका रविवारी ऑफिसला सुट्टी होती. बाबा झोपले होते. घरात शांतता होती, ती जड, बोचरी शांतता. अनघा कपाट आवरत होती, तेव्हा एका जुन्या फाइलकडे तिचं लक्ष गेलं. धूळ बसलेली, कोपऱ्यात ठेवलेली. तिने ती उघडली.

आत होती, तिची जुनी स्केचबुक्स. आई गेल्याआधीची.
चित्रकलेची वही. पेन्सिलने काढलेली चित्रं, गाव, माणसं, भावभावना. एक चित्र विशेष लक्ष वेधून घेत होतं, दोन बहिणी, एकीच्या हातात दिवा, दुसरी सावलीसारखी तिच्यामागे उभी.

अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिला आठवलं, ती लहानपणी चित्रकार व्हायचं स्वप्न पाहायची. कॉलेजमध्ये फाइन आर्ट्ससाठी अ‍ॅडमिशनही मिळालं होतं. पण आई आजारी पडली… आणि नंतर सगळंच बदललं.

“कुणालाच सांगितलं नाही,” ती स्वतःशीच पुटपुटली.
“माझं स्वप्न मी स्वतःच गाडलं.” त्या दिवशी पहिल्यांदाच तिला जाणवलं, ती इतकी वर्षं फक्त इतरांसाठी जगत राहिली होती. स्वतःसाठी कधीच नाही.

मृण्मयीचं जग दुसरीकडे, मृण्मयीचं आयुष्य वेगात धावत होतं. नृत्य अकॅडमीमध्ये ती चमकत होती. शिक्षक तिच्या मेहनतीचं कौतुक करत होते. स्टेजवर उभी राहिल्यावर ती पूर्ण वेगळीच व्यक्ती बनायची, आत्मविश्वासपूर्ण, मुक्त.
पण रात्री, एकटी असताना, अनघाचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा.