Login

आरसा भाग 1

About Mirror

'मी कशाला आरशात पाहू गं..मीचं माझ्या रूपाची राणी गं...
किती आवडायचे हे गाणे मला! मी कशाला आरशात पाहू गं असे जरी गाण्यात म्हणत होते..तरी पण मी आरशात अनेकदा पाहायची.आरसा मला लहानपणापासूनच आवडत होता.ही आवड आजीमुळेच मला लागली होती.असे मला वाटते. आजी रोज स्वतःला आरशात पाहून आनंदी व्हायची.आरशात पाहून आपले लांबसडक केस विंचरून त्याचा अंबाडा घालायची.कपाळावर छान लाल कुंकू लावून,आपले सुंदरसे रूप आरशात पाहून ..'छान' अशी स्वतःच स्वतःला दाद द्यायची.आजीचे पाहून मी पण स्वतःला आरशात पाहू लागली.आजी माझी छान तयारी करायची.केस विंचरून द्यायची, पावडर व टिकली लावून द्यायची.आणि मग माझ्यासमोर आरसा धरून म्हणायची, 'किती छान दिसते बघं तू.' मुळातच देवाने मला देखणे रूप दिले होते आणि आजीने करून दिलेल्या तयारीमुळे ते अजून छान दिसायचे.मग असे माझे छान रूप आरशात पाहायला मलाही आवडायचे.आजीचे व माझे रोजच असे सुरू असायचे.

पुढे काही वर्षांनी आजोबांच्या निधनानंतर, आजीला आरसा नकोसा वाटू लागला.मी पण आरशात बघणे टाळू लागले.पण आरशात काय जादू होती देव जाणे...माझे व आरशाचे नाते पुन्हा जमू लागले.
बालपणातून तरूणपणात पदार्पण केल्यानंतर आरसा माझ्या अजून जवळचा झाला.माझ्या देखण्या रूपाचे सर्वजण जेव्हा कौतुक करायचे,तेव्हा मला खूप आनंद व्हायचा.खरंच मी किती सुंदर आहे.हे मला आरशात माझे रूप पाहताना जाणवायचे.आरसाही जणू माझे कौतुक करत आहे.असे वाटायचे.आरशात पाहून माझा स्वतःशीच संवाद सुरू असायचा.या वेडापायी मी आईचे अनेकदा बोलणेही ऐकले आहे. एवढा प्रिय असलेला आरसा आज मला नकोसा वाटतो आहे.यात आरशाची काय चूक? तो तर जे खरे असते तेचं दाखवत असतो. जेव्हा माझे रूप देखणे होते ; तेव्हा तो तेचं दाखवत होता आणि ते पाहून मला आनंद होत होता;पण आता...माझा जो चेहरा आहे तसाच आरसा मला दाखवत आहे आणि तो पाहून मला खूप दुःख होते आहे,वाईट वाटत आहे. माझ्या सुंदर रूपाला कोणाची नजर लागू नये म्हणून आई मला नेहमी काळा टिका लावायची.आणि आता तर कोणाची नजर लागणे तर दूरच ..कोणी माझा चेहराही बघू शकणार नाही इतका विद्रूप माझा चेहरा दिसत आहे.त्यामुळेच अगोदर तासनतास आरशासमोर वेळ घालवणारी मी आता आरशापासून दूर पळत असते.