आरसा भाग 2

About Mirror

या गोष्टीला कारणीभूतही मीच आहे.खोटारडेपणा, अन्याय, अत्याचार या गोष्टी मला सहन होत नाही. लहानपणापासून मी अशीच होती.
आईची काहीही चूक नसताना,आजी आईबद्दल शेजारच्या आजींना काहीही सांगायची. आईला हे कुठूनतरी कळले की, आईला आजीचा राग यायचा आणि ती बाबांना आजीच्या चुकीबद्दल सांगायची.आईने सांगितलेले बाबा ऐकून घ्यायचे;पण आजीला कधी विचारायचे नाही की,'तू असे का करतेस?' उलट आईलाच सांगायचे,'तू इतरांवर का विश्वास ठेवते?'
मी स्वतः आजीला शेजारच्या आजीजवळ आईबद्दल चुकीचे सांगताना ऐकलेले होते आणि मी जेव्हा बाबांना सांगायची की,'हे सर्व मी स्वतःला ऐकले आहे.' तर बाबा मलाच म्हणायचे,'तू मोठ्यांच्या भांडणात पडू नको.'
आईला व मला असेच वाटायचे की, बाबांनी आजीला आजीची चूक लक्षात आणून द्यावी,म्हणजे आजी आईबद्दल इतरांना चुकीचे सांगणार नाही आणि आईबद्दल इतरांच्या मनात गैरसमज होणार नाही.

आरशात आपल्याला आपले बाह्यरूप दिसते; पण आपले वागणे,बोलणे,स्वभाव यातून आपले अंतर्मन कसे आहे ते दिसत असते.आपले चरित्र, आपले कर्म हा आपल्या अंतर्मनाचा आरसा ठरत असतो.कोणी चुकीचे वागत असेल,इतरांना त्याचा त्रास होत असेल तर..नातेवाईक, मित्रमंडळी आणि शुभचिंतक यांनी त्या व्यक्तीला त्याच्या वागणूकीचा आरसा दाखवला पाहिजे. त्याची चूक लक्षात आणून दिली पाहिजे.

मी व आई आजीच्या बाबतीत बाबांना खरे ते सांगत होतो,आजीची चूक लक्षात आणून देत होतो;पण बाबांच्या दृष्टीने आम्ही खरे असूनही चुकीचे ठरत होतो आणि आजीचे वागणे चुकीचे असूनही आजी खरी वाटत होती.घरातून मिळालेल्या या अनुभवाबरोबर मी जसजशी मोठी होत गेली,तसतसे मला असे अनेक अनुभव मिळत गेले;पण मीही कधी माझा खरेपणा सोडला नाही. वाईट गुणांना,वाईट प्रवृत्तींना कधी साथ दिली नाही. जो कोणी चुकीचे वागत आहे ..असे दिसले तर, त्यांची चूक समजावून सांगणे. हे माझे तत्व बनत गेले.या तत्वामुळे जसे माझे अनेक शुभचिंतक व मित्रमंडळी बनत गेले तसे काही हितशत्रूही बनत गेले आणि
माझ्या या स्वभावाची मला खूप मोठी किंमत मोजावी लागेल.असा विचारही कधी माझ्या मनात आला नाही.


एकदा कॉलेजमधून मी घरी येत असताना,रस्त्यात एक मुलगा एका मुलीची छेड काढताना मला दिसला.ती मुलगी त्याचा प्रतिकार करत होती;पण त्याच्या शारीरिक बळापुढे ती कमजोर पडत होती.हे सर्व पाहून मी तेथून पळ न काढता..माझ्या तत्वानुसार त्या मुलीला मदत करायला मी पुढे सरसावली.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all