Login

आरसा भाग 3

About Mirror

त्या मुलाला मी समजावून सांगितले;पण तो माझे ऐकून न घेता उलट माझ्याशी वाईट वागू लागला, तेव्हा मी त्याच्या कानशिलात जोराने मारले व त्या मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले.तो मुलगा रागाने तेथून निघून गेला. त्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहून मलाही माझ्या धाडसाचे कौतुक वाटले.

त्या मुलाप्रमाणे अशा विकृत
प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तींमुळे मुलींवर होणारे अत्याचार वाढत आहे.मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.मुलींवर होणारे अन्याय,अत्याचार पाहून समाजातील काही लोक मुलींच्या शिक्षणाला,राहणीमानाला व त्यांना दिलेल्या स्वातंत्र्याला दोष देतात.पण काही घटना अशाही आहेत की, मुली व स्त्रिया या स्वतःच्या घरात देखील सुरक्षित नाही.
या गोष्टीला कोण जबाबदार ठरते? स्त्री-पुरूष भेद, पुरूषप्रधान संस्कृती,घरातील संस्कार, शिक्षण, सोशल मीडिया की समाज?

मुलींची छेडछाड, रेप,अन्याय, अत्याचार, शारीरिक व मानसिक छळ या सर्व गोष्टी कायद्यानुसार गुन्हा ठरतात आणि माणुसकीच्या दृष्टीने अमानवीय कृत्य ठरते.
या गोष्टी जे लोक करतात अशा लोकांना कायद्याचे भय,बंधन व माणुसकीची जाणीव नसते का? आपल्या अशा कृत्यामुळे मुलींना किती त्रास होत असेल? त्यांच्या आयुष्याचे किती नुकसान होते? असा विचार मनात येऊन वाईटही वाटत नाही का?त्यांच्यातील अशा वाईट वागण्याचे,प्रवृत्तीचे त्यांचे खरे रूप दाखविण्यासाठी कोणता आरसा असावा?
ज्या आरशाने त्यांना आपले अंतर्रुप दिसेल आणि आपले वागणे योग्य की अयोग्य हेही त्यांना समजेल.

अशा लोकांना असा आरसा दाखवण्याचे काम त्यांच्या घरातील लोक,नातेवाईक, मित्रमंडळी, कायदेव्यवस्था हे करू शकतात आणि त्यामुळे स्त्री वर्गाला नक्कीच सुरक्षितता देवू शकतात.


त्या प्रसंगानंतर मी आपल्या रोजच्या रूटीनमध्ये व्यस्त झाली होती.आणि एके दिवशी अशीच कॉलेजमधून घरी येत असताना..घर थोड्याच अंतरावर असताना, माझ्या चेहऱ्यावर कोणी काहीतरी जोराने फेकले आणि माझ्या चेहऱ्याची तीव्रतेने आग होऊ लागली.मी होणाऱ्या वेदनेने ओरडू लागली,रडू लागली. माझ्या ओरड्याबरोबर मला लोकांच्याही ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता.पण काही वेळाने एकदम शांतता जाणवायला लागली.ना कोणता आवाज ना कोणती जाणीव...
आणि जेव्हा मी शुद्धीत आले, डोळे उघडण्याचा प्रयत्न केला ,तेव्हा मी एका हॉस्पिटलमध्ये होते.माझ्या चेहऱ्यावर पट्ट्या लावलेल्या होत्या. वेदनांचा दाह कमी झाला होता; पण त्या त्रास देतच होत्या.सुदैवाने डोळे वाचले होते म्हणून मी पाहू शकत होते आणि कानांना आईबाबांचे शब्द ऐकू येत होते.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all