Login

आरसा अंतिम भाग

About Mirror

हे असे कसे झाले? कोणी केले? का केले? ... असे अनेक प्रश्न मला पडले होते. मी आईबाबांना विचारत होते;पण ते काही सांगत नव्हते. 'तू अगोदर चांगली होऊन सुखरूप घरी ये.मग तुला सर्व सांगतो.' एवढेच ते सांगत होते.माझ्या काळजीपोटीच ते मला काही सांगत नसावे. असे मला वाटत होते.ही गोष्ट माझ्या इतकी त्यांच्यासाठीही धक्कादायक होती. या प्रसंगातून सावरण्यासाठी ते मला शारीरिक व मानसिक बळ देत होते.जखमा जास्त खोलवर नव्हत्या, त्यामुळे काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी मला घरी पाठवले.उपचारासाठी अधूनमधून बोलवणार होते.घरी आल्यानंतर,जेव्हा मी पहिल्यांदा आरशात माझा चेहरा पाहिला..तेव्हा तर मी अक्षरशः किंचाळलीच! माझा सुंदर चेहरा किती विद्रुप दिसत होता.कोणाचा माझ्यावर इतका राग होता की, त्यांनी माझ्या चेहऱ्यावर इतक्या साऱ्या जखमा आणि माझ्या मनाला वेदना दिल्या होत्या? मला बरे वाटू लागल्यावर, आईबाबांनी मला सर्व काही सांगितले...

त्या दिवशी मी कॉलेजमधून घरी येत असताना, एका मुलाने माझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले होते.माझ्या आवाजाने लोक मदतीसाठी माझ्याजवळ जमा झाले आणि मला हॉस्पिटलमध्ये नेऊन माझे प्राण वाचवले होते.तर काही लोकांनी तो मुलगा पळून जात असताना त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले होते.तो मुलगा त्याचा गुन्हा कबूल करत नव्हता;पण त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी, साक्षी ,पुरावे यामुळे त्या मुलाविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली होती.पोलीस त्याच्या कडून गुन्ह्याची कबुली घेत असताना, त्याने असे का केले ? असे विचारल्यावर त्याने त्याचे कारणही सांगितले.

पोलीसांकडून आईबाबांना आणि आईबाबांकडून मला ते कारण समजले तेव्हा तर मला शॉकच बसला. हा तोच मुलगा होता, ज्याला मी त्या दिवशी त्या मुलीसाठी पहिले समजावले होते आणि तो जेव्हा अजून मला आणि तिलाही त्रास द्यायला लागला तेव्हा मी त्याला मारले होते. आजूबाजूचे लोक बघतही होते आणि काय झाले म्हणून विचारत ही होते.लोक जमा झाले म्हणून त्या दिवशी तो तेथून निघून गेला;पण त्याने त्या दिवसाचा बदला अशा पद्धतीने घेतला होता.

त्या दिवशी माझे काय चुकले होते? एक मुलगी म्हणून मी दुसऱ्या मुलीला मदत करत होते. तिला मदत करून तिच्याबरोबर माझ्याही स्त्रीत्वाचे मी रक्षण करत होते.मी बरोबर होते. तो मुलगा चुकीचा होता तरीही माझ्या चांगल्या वागण्याची मला ही शिक्षा मिळाली होती.

आपले बाह्यरूप दाखवणारा आरसा सर्वांनाच आवडत असतो.मग आपल्यातील वाईट गुणांचा आरसा आपल्याला कोणी दाखवला तर तो का आवडत नाही?

त्या मुलाच्या वाईट कृत्याने त्याला शिक्षा झाली पण मलाही शारीरिक, मानसिक त्रास झाला त्याचे काय?


या अशा अनेक घटना घडत असतात. अशा घटना लोक बघत असतात, ऐकत असतात तरीही मुलींना,स्त्रियांना वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून धोका होतच असतो. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असतेच. हे असे का ? हे सर्व केव्हा बदलणार? कोण बदल घडवून आणणार?'


प्रेरणा अशा विचारांमध्ये आपल्या रूममध्ये बसलेली असताना, दार उघडल्याचा आवाज आला आणि ती विचारातून बाहेर पडली.

"अगं प्रेरणा, तुझा कॉलेजचा मित्र विनय आला आहे तुला भेटायला."

आईने दार उघडून प्रेरणाला सांगितले.

विनय प्रेरणाचा कॉलेजचा मित्र आणि ज्याने प्रेरणाला प्रपोज ही केलेले होते. तो आज तिला भेटायला आला होता.

"अरे विनय ,तू कसा आहेस?"

प्रेरणाने विनयला विचारले.

"मी तुला हॉस्पिटलमध्येही भेटायला आलो होतो.पण तेव्हा तु आराम करत होती.त्यामुळे तुझ्याशी बोलणे झाले नाही.म्हणून आता घरी आलो तुला भेटायला. कसे वाटते तुला ?"

विनय प्रेरणाला म्हणाला.

प्रेरणाला विनयच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या भावना माहित होत्या,त्याने तिला प्रपोजही केले होते.पण प्रेरणाने त्याला त्याचे उत्तर दिलेले नव्हते. आपल्या सुंदरतेमुळे इतर मुलांप्रमाणे विनयनेही आपल्याला प्रपोज केले असावे. असे प्रेरणाला वाटत होते.
पण विनय प्रेरणाला भेटायला हॉस्पिटलमध्येही गेला ,आता घरीही आला. प्रेरणाला त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर निःस्वार्थ मैत्रीचे आणि प्रेमाचे भाव जाणवत होते.

व्यक्तीचा चेहरा हा ही भावभावनांचा एक आरसाच असतो.
हे तिला माहित होते. विनयचे आपल्या वरील प्रेम खरे आहे. हे तिला त्याच्या डोळ्यातून,चेहऱ्यावरून जाणवले.

"विनय,मला तुझ्या भावना कळाल्या पण आता मी पूर्वी सारखी सुंदर नाही.तू बघतो आहेस ना माझा चेहरा.. तरीही तू माझ्यावर प्रेम करतोस?"

प्रेरणाने विनयला विचारले.

"मी प्रेरणावर प्रेम केले आहे...तिच्या सुंदर चेहऱ्यावर नाही.त्यामुळे तू जशी आहे तशी मला आवडते."

विनयच्या या उत्तराने प्रेरणाला आनंद झाला आणि व्यक्ती व्यक्तीत किती फरक असतो. याचाही विचार करू लागली.

एकीकडे त्या मुलासारखे विकृत विचारांचे व्यक्ती असतात जे इतरांना त्रास देतात. तर दुसरीकडे विनयसारखे चांगले विचार करणारे व्यक्तीही असतात जे इतरांचे दुःख वाटून घेतात.

काही महिन्यानंतर,वर्षांनंतर ..
प्लास्टिक सर्जरी करून
प्रेरणाचा चेहरा चांगला दिसू लागला होता आणि आईवडिलांच्या व विनयच्या प्रेमामुळे तिचे आयुष्यही सुंदर होऊ लागले होते. तिला पूर्वीसारखा आपला आरसाही आवडू लागला होता.

समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all