Login

आरसा..

आरसा..

आरसा..

ती शांतपणे पण निक्षून म्हणाली,

"टाळणं स्वीकारता आलं पाहिजे गं."

मनातल्या माझ्या भावनांचा उद्रेक झाला. मी हट्टाला पेटून त्वेषाने विचारलं,

"पण का? माझी काय चूक? इतकी वाईट आहे का मी की कोणी मला टाळावं आणि माझं अस्तित्वच नाकारावं?" कोणी कसं जाऊ शकतं इतक्या सहजपणे हात सोडून? मनाला न पटणारं कारण देऊन? माझी चूक नसतांना मी का सोसावं? ही घुसमट समजत नाही का तुला?”

मी तिच्यावर चिडत होते. डोळ्यातल्या आसवांची जागा आता रागाच्या अंगारांने घेतली होती.

तिच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव.. माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवत सौम्य स्वरात म्हणाली,

"ऐ पिल्लू, नाकारणं स्वीकारायला शिक गं. सायंकाळच्यावेळी तर आपल्या सावल्याही साथ सोडून जातात मग ही तर जीवंत माणसं तुझ्या माझ्या सारखीच ना! आणि तुझा हात सोडायला त्याने धरला होता कधी? वेडाबाई ती तर तुझीच समजूत होती न! आता त्याला तू आवडत नाहीस मग त्याच्या मनातलं तुझं स्थान तिच्यासाठी रिक्त करायला हवं नं? तो तर त्याच्या मनाचा मालक.. त्याचीच मर्जी चालेल नं? खरंतर त्याने कधीच तुला मनातून काढून टाकलंय. तुझं काय! इथे तर तुसुद्धा तुझी नव्हतीस कधी. त्याचीच होतीस, आहेस पण तो तुझा होता का? राहीलाय का? मग जे तुझं नाहीये, नव्हतंच कधी त्याचा का अट्टहास? आपण फक्त मोकळं व्हावं आणि त्याचीही सोडवणूक करून द्यावी. त्याने वसवलेल्या गावातून हद्दपार व्हावं कायमच काहीही कुरबुर न करता.."

मी अगदीच रडवेली झाले. डोळ्यातून अश्रूंचा पूर ओसांडू लागला. मी अगतिक होऊन म्हणाले,

"मग माझं काय? मी सजवलेल्या स्वप्नांचं काय? मला नाही सहन होत गं! मला मान्यच होत नाहीये त्याचं असं मला सोडून जाणं.. मला जगता नाही येणार गं त्याच्याशिवाय.. त्याची आठवण.. त्याची साठवण.. वेड लागेल ग मला. खूप एकटी होईन मी. अगदी मुळासकट उन्मळून पडेन! त्याच्यात गुंतलेल्या माझ्या मनाची सोडवणूक कशी करू? खोलवर रुजलेली प्रीतीची बीजांकुरं कशी उपटून टाकू? त्याच्याच भोवती माझं अस्तित्व फिरत राहतं. तो माझं विश्व आहे. तो माझा होता.. फक्त माझा.. कशी विसरू मी त्याला? त्याच्या आठवणीत कितीतरी रात्री मी जागून काढल्यात. रोज जाणवतात मला त्याच्याच अस्तित्वाच्या खुणा आणि मग गोंजारत राहते मी त्यानेच दिलेल्या वेदना..

पुन्हा समजावत ती म्हणाली,

"तो गेलाय आता हे मान्य कर. मनाची समजूत घालण्यापेक्षा हेच मनाला निक्षून सांग. तो तर कधीच निघून गेला. किती सहजपणे सोडवून घेतलं त्याने स्वतःला. तुझ्या वेदना, तुझ्या संवेदना त्याच्या गावीही नव्हत्या. त्याचं ते टाळणं, ते नाकारणं तू स्वीकारायला हवं ना. या नाकारण्यामागे त्याचीही काही कारण असतील. कदाचित तुझ्यातलं त्याचं स्वारस्य संपुष्टात आलं असेल. तुझा त्याला काहीच उपयोग नसेल. गरजा वेगळ्या अन माणूस वेगळा. काहीही कारण असू शकतं. हे मनाला निक्षून सांग. माहीत आहे इतकं सहज सोप्पं नाही ते; पण कठीणही नाही ना? एकदा का हे सत्य तू स्वीकारलंस ना सगळं सहज सोप्प होईल बघ. त्याचं अस्तित्व एका मृगजळासारखं.. फक्त आभास आणि आभासी जगाचं काय सांगावं?”

आरश्यात स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळताना माझ्यातल्या मी शी चाललेलं द्वंद्व. माझ्यातली मी मला समजावत होती. माझं सांत्वन करत होती, माझ्यातल्या मी ने मला आरसा दाखवला होता आणि माझ्यातली मी जिंकली होती. त्याचं जाण, त्याचं नाकारणं स्वीकारलं होतं बुद्धीने. निदान तसं ते मला भासवत होतं पण मन माझं साथ देत नव्हतं. आणि मग मीच मला कुशीत घेऊन आसवं गाळत होते. माझ्यातल्या मी ला सावरत होते.

©अनुप्रिया..