Login

आरसा भाग १

आरसा भाग १
पूर्वा एका अशा कुटुंबातील मुलगी होती, जिथं मुलींना एक जबाबदारी म्हणून बघितलं जायचं. मुलींना शिकवलं तर घरासाठी नाही. परक्याच घर भरण्यासाठी आहे. असं समजलं जायचं. पण पूर्वाच्या आई वडीलांना असं वाटतं नव्हत. त्यासाठी मुलगी म्हणजे धनाची पेटी होती. मुलगा आणि मुलगी त्यांच्या साठी एकसमान होते.

त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवण्याचे ठरवलं. त्यांनी तिला चांगल्या शाळेत शिकवल. तिच्या जन्मानंतर सात वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. तरी देखील त्यानी पूर्वाच शिक्षण थांबवलं नव्हत. गावात बारावी नंतर शिकण्याची सोय नव्हती. तेव्हा साधना आणि प्रकाश यांनी पूर्वाला शहरात शिकायला पाठवलं.

चांगल्या कॉलेज मध्ये तिची ऍडमिशन केली. तिला हॉस्टेलवर ठेवलं होतं. पूर्वा पण अभ्यासात हुशार होती. मोठं होऊन आपल्या पायावर उभी राहायचं हे तिने ठरवलं होतं.ती शहरात शिकायला आली आणि सगळंच बदललं.

शहरातील मोकळं वातावरण, वागण्या बोलण्या कोणताही बंधन नाही.. मौज मज्जा मस्ती एन्जॉय करणं यात तिचं मन रमु लागलं. तिच्या कॉलेज मध्ये एक मुलगा होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. दोघांची कॉलेजच्या फेस्टिवल मध्ये ओळख झाली. नंतर त्या भेटी वाढत गेल्या. त्याला शहराची पुर्ण माहिती, तर तिच्यासाठी हे शहर नविन, त्याला फिरण्याचा छंद आणि ती त्याची फिरण्यासाठीची मैत्रिण. चांगली गट्टी झाली. ते सोबत फिरणं, सिनेमा बघणं, यामध्ये त्यांचा वेळ जाऊ लागला. तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले.

परिणामी तिला परीक्षेत कमी गुण मिळाले. वैभव. तिचा मित्र. आता तिचा प्रियकर. त्याचं अस मुक्त वागण, दिसणं त्याचा रुबाब याच्यावर ती भाळली होती. वैभव एकुलता एक मुलगा आहे.त्याच्या वडिलांचं साड्यांचे मोठं दुकान आहे. त्याला दोन बहिणी आहेत. त्याने फक्त ग्रॅज्युएशन केलं तरी भरपूर आहे. त्याला शिक्षणाची आवड नाही. गरजे पुरत शिकलं, बास झालं. एकुलता एक मुलगा असल्याने त्याला भविष्यात त्याच्या वडीलांच्या दुकानात बसुन काम संभाळ्याच होत.
चांगले मार्क मिळवून, शिकून त्याला कुठं नोकरी करायची होती ? तो एकदम कूल होता.

त्याने पूर्वाला चांगल्या भविष्याची स्वप्न दाखवली होती.त्याच्या घरी कामाला नोकर चाकर आहेत. सगळं काही आहे. तुला कशाची चिंता करायची गरज नाही. कशाला अभ्यास करून तूझ्या डोळ्या खाली काळी वर्तुळे वाढवते ? पूर्वा वैभवच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. तिला त्याच्या शिवाय काहीच पसंत नव्हत.

तिच्या परीक्षेचा निकाल बघून तिचे वडील प्रकाशराव तिच्याशी बोलायला तिला भेटायला शहरात आले होते. त्या दिवशी त्यांनी पूर्वा आणि वैभवला फिरताना बघितलं. रात्री उशिरा पूर्वा हॉस्टेल वर आली. तेव्हा त्यांनी पूर्वाला त्या मुलाबद्दल विचारल.

" बाबा माझं यांच्या वर प्रेम आहे. आम्ही दोघं लग्न करणार आहोत."

आपल्या लेकीच असं बोलणं ऐकून त्यांनी पूर्वाच्या कानाखाली वाजवली. त्याचं रात्री ते तिला घेऊन गावी निघून गेले. पूर्वाला शहरची इतकी भुरळ पडली होती, तिला गावातल वातावरण रूचल नाही. तिला तिचं पहिलं प्रेम यशस्वी करायचं होत. आई वडीलांची स्वप्न पायाखाली तुडवून तिने एक मोठं पाऊल उचललं.

एक दिवस, पहाटे, सगळे झोपेत असताना, तिने तिच्या घरातील आईचे दागिने, वडीलांनी शेतीच सामानासाठी आणलेली कॅश घेऊन पोबारा केला. ती घरातून पळून गेली. तिने आणि वैभव ने पळून जाऊन लग्न केलं.

सुरुवातील सगळं चांगलं होत. पूर्वाच्याकडे असलेल्या पैशामुळे सगळं काही सुरळीत सुरू होत. तो पैसा किती दिवस पुरणार ? पैसे संपले तसं वास्तवाचे चटके बसले. अन्न धान्याचा भाव समजला.एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले लव्ह बर्ड्स आता ते दोघं एकमेकांना चोचीने मारू लागले. त्यांना त्यांनी किती मोठी चूक केली याचा पश्चाताप होऊ लागला होता.

वैभव एकुलता एक मुलगा असल्याने त्यांनी वैभव आणि पूर्वाला स्वीकारलं. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणीची काठी. ते वैभवला परत घरी घेऊन जायला आले होते. नाईलाजास्तव त्यांना पूर्वाला स्वीकाराव लागलं. वैभवचे घर म्हणजे एकदम आलिशान बंगला होता. पूर्वा पण हे सगळं बघून हरखून गेली होती.तिचा निर्णय किती योग्य आहे, वैभव सोबत लग्न करण्याचा याचा तिला अभिमान वाटतं होता.आज घटनेला घडुन दहा वर्ष उलटून गेली आहेत.

दरम्यानच्या काळात तिला एक गोंडस मुलगा पण झाला आहे. जो त्यांच्या आजी आजोबा यांच्या सोबत आनंदाने खेळतो.त्यांच्या सावलीत वाढतो.  पूर्वाच्या धाकट्या नणंद बाईंचं लग्न अगदीं पंधरा दिवसांवर येऊन ठेपल होत.

सासूबाईंच्या रूम मध्ये सगळे जण बसुन बोलतं होते. कालच या घरचे मोठे जावई बापू आले होते. मोठी नणंद तर तिच्या मुलांना घेउन पंधरा दिवसांच्या पूर्वीच राहायला आली होती.