"आजोबा"
"होय होय. मी तुझा आजोबाच आहे. किती वाट पहायला लावलीस तू मला. तुझी वाट पाहत मी किती वेळ झालं तिथे उभा आहे आणि तू इथे आहेस होय. लवकर का आला नाहीस? मला ना कसंतरीच होत होतं." आजोबा म्हणाले.
"आजोबा" म्हणून त्या मुलाने एक गोड स्माईल दिली.
"ओ रे बाळा, तुला माझी आठवण आली नाही का? मला तर तुझी खुप आठवण येत होती." आजोबा म्हणाले.
"आई, आजोबा" असे म्हणून तो तीन वर्षाचा मुलगा त्याच्या आईला सांगू लागला पण त्याची आई काहीतरी खरेदी करण्यात मग्न होती त्यामुळे तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
"बाळ, चल तुला चॉकलेट घेऊन देतो. मी म्हटलं होतं ना की तू भेटलास की मी तुला चॉकलेट घेईन म्हणून. आता इथे आणलं नाही ते बघ तिथे दुकान आहे तिथे घेऊया चल." असे म्हणून ते आजोबा त्या मुलाला घेऊन जाऊ लागले.
त्या मुलाची आई खरेदी करण्यात गुंग होती. थोड्यावेळाने तिने पाहिले तर तिथे तिला तिचा मुलगा दिसला नाही. ती थोडीशी घाबरली आणि मुलाला हाक मारू लागली, "आरव बाळा, कुठे आहेस?" घाबऱ्या आवाजात तिने इकडे तिकडे शोधाशोध सुरू केला. तिच्यासोबत काही लोक त्या मुलाचा शोध घेऊ लागले. तिला खूप भीती वाटू लागली. ती तिथे जवळच असलेल्या एका पोलिसांकडे गेली. तिने आपल्या मुलाबद्दल त्यांना सर्व माहिती सांगितली आणि तो कुठे गायब झाला, कसा झाला हे माहित नाही असेही तिने सांगितले. आता पोलीसही तिच्या मदतीला धावून आले. तिच्यासोबत तेसुद्धा आरवचा शोध घेऊ लागले.
सगळेजण आरवचा इकडे तिकडे शोध करू लागले. इतक्यात त्याच्या आईला तो एका दुकानात गेलेला दिसला. ती धावत पळत तिकडे गेली आणि तिने आरवला हाक मारली,
"अरे आरव, तू इथे कसा आलास? मी तिथे उभी होते आणि तुलाही तिथेच उभा रहा म्हणून सांगितले होते ना? मग तू इकडे एकटा कसा आलास? आणि या दुकानामध्ये काय करतोयस? चल आता." असे म्हणून तिने त्याचा हात धरला.
"अरे आरव, तू इथे कसा आलास? मी तिथे उभी होते आणि तुलाही तिथेच उभा रहा म्हणून सांगितले होते ना? मग तू इकडे एकटा कसा आलास? आणि या दुकानामध्ये काय करतोयस? चल आता." असे म्हणून तिने त्याचा हात धरला.
"आई, आजोबा." इतकेच तो आरव म्हटला आणि तिच्या आईला आरव मगाशी आजोबा आजोबा म्हणून सांगत होता ते आठवले. आता मात्र तिला सारं काही लक्षात आले. हा त्या आजोबांसोबतच या दुकानात आला होता हे तिने जाणले आणि ती त्या आजोबांवर खेकसली,
"काय हो, मुले पळवून नेण्यासाठी तुम्हाला माझाच मुलगा दिसला काय? आणि हे असले काम करायला लाज वाटत नाही. मुलांना लाडीगोडी लावून चॉकलेट द्यायचे निमित्त करायचे आणि पळवून न्यायचे, वरून पैसे मागायचे. या वयात शांत बसायचे सोडून हे असले काम करत आहात शोभते का तुम्हाला?" आरवच्या आईच्या अशा बोलण्याने ते आजोबा घाबरले. त्यांना कुठे जाऊ आणि काय करू काही समजेना. ते तशाच घाबरलेल्या अवस्थेत तेथेच उभा राहिले.
आरवच्या आईचा आवाज ऐकून पोलीस देखील तिथे येऊ लागले. पोलिसांना पाहून ते आजोबा आणखीनच घाबरले आणि ते इकडे तिकडे सैरभैर धावू लागले. लोकं त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे जाऊ लागले. अशा अवस्थेत ते एकटे खूप घाबरले होते. त्यांच्या डोळ्यावाटे अश्रू ओघळत होते. फायनली त्यांना जास्त पळता न आल्यामुळे आणि ते घाबरले असल्यामुळे लगेचच पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी त्यांना पकडले आणि "त्या मुलाला का पकडले?" असा जाब विचारू लागले.
"अरे, इतका म्हातारा झालास तरी तुला हेच काम करावे असे कसे वाटत आहे? आता या वयात भजन कीर्तन करायचे सोडून तू लहान मुले पळून नेत आहेस? तुला लाज वाटली पाहिजे. मुलांना नेऊन खंडणी मागायचे. सांग कोणासाठी हे काम करत आहेस? तुझ्या टोळीमध्ये कोण कोण आहेत? किती जण आहेत? सगळ्यांची नावे सांग." असे म्हणून पोलीस त्या आजोबांना धमकावू लागू लागले. अचानक आलेल्या अशा परिस्थितीमुळे ते आजोबा आणखीनच घाबरले आणि तिथे चक्कर येऊन पडले. आजोबा चक्कर येऊन पडल्यानंतर सगळेजण घाबरले.
ही व्यक्ती कोण कुठून आली? याच्यासोबत कोण कोण आहेत? हे आजोबा शुद्धीवर आल्यानंतरच समजणार असे सगळे आपापसात बडबडू लागले. पोलिसांनी तिथून पाणी घेऊन त्यांच्या तोंडावर शिंपडले तेव्हा आजोबांना शुद्ध आली मग त्यांनी त्यांना पाणी पिण्यास दिले.
"बोला, तुम्ही कोण आहात? आणि कुठून आला आहात? तुमच्या सोबत कोण कोण आहे?" पोलिसांनी आजोबांना विचारण्यास सुरुवात केली तेव्हा काहीही माहित नाही असा चेहरा करून ते तसेच उभा राहिले.
"मी काय बोलतोय? तुमचे नाव काय?" पोलीस पुन्हा त्यांच्यावर ओरडले.
"मी मी.." इतकेच बोलून ते आजोबा पुन्हा काहीच माहित नाही अशा अवस्थेत तिथे उभा राहिले. तेव्हा मात्र पोलिसांना त्यांचा राग येऊ लागला. ते त्या आजोबांना धमकावू लागले. तरीही ते आजोबा शून्य होऊन तिथेच उभे होते. आता मात्र कोणाला काहीच समजेना. हे मुद्दामहून करत आहेत की यांना काही होत आहे असे म्हणून पोलिसांनी त्यांची झडती घ्यायला सुरुवात केली.
झडती घेत असताना त्यांना त्यांच्या खिशात काहीच सापडले नाही. मग दुसऱ्या खिशात हात घालून पाहिले तर त्या खिशात त्यांना एक चिठ्ठी सापडली. ती कशाची असेल? किती मुलांना पकडले याची की किती मुलांना पकडायचे आहे याची? काही कामाचे असेल का? असे अनेक प्रश्न पोलिसांच्या मनात येत होते. जेव्हा त्यांनी कुतूहलाने ती चिठ्ठी उघडून पाहिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
ते आजोबा कोण होते? चोर होते की आणखी कोण होते? त्यांची काय कहाणी असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा