जेवढा आनंद माझ्या नातवाला झाला होता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला होता कारण आज तीन पिढ्या एकत्रित बाहेर जाणार होत्या. या क्षणाची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. माझ्या मुलाने माझ्यासोबत येऊन चार गोष्टी बोलाव्यात, माझी विचारपूस करावी यासाठी मी आसुसलो होतो पण त्याला कधी माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. सुनबाई कशीही वागली तरी तिच्याबद्दल माझी काहीच तक्रार नव्हती कारण या वयात अशा एकट्या पडलेल्या माणसाला दोन वेळचे पोटभर अन्न मिळाले की आत्मा शांत होऊन जातो व कशाची आशाच उरत नाही, तेव्हा माझ्या सुनबाईचे उपकारच आहेत. ती कितीही फटकळ असली, काहीही बोलत असली तरीही दोन वेळेचे पोटभर अन्न देते यातच मी समाधानी आहे.
जसजशी संध्याकाळ होऊ लागली तसतशी माझ्या मनाची चलबिचलता वाढू लागली. मी खूप आनंदून गेलो होतो. संध्याकाळचे पाच वाजले आणि माझा नातू पुन्हा मला आठवण करून देण्यासाठी आला. तसेही ही गोष्ट माझ्या लक्षात राहावी म्हणून मी माझ्या हातावर लिहून ठेवले होते. तरीही नातवाने आठवणीने मला येऊन सांगितले याचे खूप कौतुक वाटले.
"आजोबा, लवकर आवरा. आपल्याला बाहेर जायचे आहे ना? बाबा सुद्धा आले आहेत. माझे बघा आवरून झाले. माझा ड्रेस कसा आहे?" अशा बोबड्या गोड बोलाने नातवाने मला आवरण्यास सांगितले.
"अरे, तू तर खूप छान दिसत आहेस. तुझे आवरून झाले तर आता मी पण लगेच आवरून येतो बर का." असे मी सांगताच तो लुटूलुटु पळत पुन्हा बाहेर गेला आणि मी माझे आवरण्यात गुंग झालो. मी सारखे सारखे स्वतःला आरशात न्याहाळून पाहत होतो. यावेळी मला सुमतीची खूप आठवण येत होती. ती असायला हवी होती असे सारखे सारखे वाटत होते. इतक्यात नातवाची हाक ऐकू आली.
"आजोबा, पटकन आवरा ना. आम्ही सगळे आवरून बाहेर आलो आहोत, या ना लवकर." नातवाचा आवाज ऐकून मी बाहेर आलो. मी माझे सारे काही आवरले होते पण मी कुठे जाणार होतो हेच विसरून गेलो होतो. तेवढ्यात नातवाने हाक मारल्यानंतर मला आठवले की आम्ही बाहेर जाणार होतो म्हणून मी लगेच माझी डायरी पिशवीत घालून बाहेर आलो. आता मी कुठेही चाललो की माझी डायरी सोबतच असायची. अगदी पाहुण्यांच्याकडे देखील जाताना मी ती डायरी सोबत घेऊन जायचो, शिवाय ती कोणाच्या हाती लागू नये म्हणून मी माझ्या सोबतच ठेवायचो. सवयीप्रमाणे डायरी घेऊन मी बाहेर पडलो आणि त्या सर्वांसोबत गाडीत जाऊन बसलो. मला सोबत घेऊन मुलगा इतक्या वर्षांनी पहिल्यांदा बाहेर जात आहे म्हणून मला खूप आनंद झाला होता आणि मी सोबत जात आहे म्हणून नातवाला देखील खूप आनंद झाला होता. गाडी भरधाव वेगाने धावत होती. इतक्या वर्षांनी मी पहिल्यांदाच गाडीत बसून असे चाललो होतो. आजूबाजूचा परिसर मला खूप छान वाटत होता. इतक्या वर्षात मला पहिल्यांदा सुखी झाल्यासारखे वाटत होते. मी इकडे तिकडे न्याहाळत गाडीत गपचूप बसलो होतो. माझ्या नातवाची मात्र बडबड सुरू होती. प्रत्येक क्षण या डायरीत टिपून ठेवावेसे वाटत होते पण ते शक्य नव्हते म्हणून जे काही घडत होते तेवढेच मी यामध्ये टिपत होतो. म्हणतात ना सुख जास्त काळ टिकत नाही त्याप्रमाणे माझ्या आनंदावर विरजण पडावे तसे काहीसे घडत होते. मला एक अनामिक भीती वाटू लागली होती.
ते सगळे मधुकररावांना डायरेक्ट वृद्धाश्रमात नेऊन सोडतात की आणखी पुढे काही होते? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा