Login

आस 8

एका पुरूषाची व्यथा


मला त्या सगळ्या गोष्टीची खूप भीती वाटत होती. गाडी अचानक एका गेटजवळ आली आणि आम्ही सगळे गाडीतून उतरलो. माझ्या मुलाने तेथील एका कट्ट्यावर मला बसवले आणि तो मला म्हणाला, "बाबा तुम्ही इथे बसा, आम्ही लगेचच आलो."

"अरे, पण तुम्ही कुठे चालला आहात? आणि इथे किती वेळ थांबायचं?" मी म्हणालो.

"हे काय बाबा, आता पाच वाजले साडेपाच वाजेपर्यंत आम्ही येतो." मुलगा म्हणाला.

"अरे, पण मी एकटा इतका उशीर कसा काय बसू? मी पण येतो ना?" मी म्हणालो.

"त्यात काय बाबा? घरात बसता ना तसेच इथेही बसा. तुम्हाला काही अडचण होणार नाही." मुलगा म्हणाला.

"मी कुठेतरी हरवलो तर.." मी म्हणालो.

"तुम्ही हरवणार नाही, कारण मी इथेच तुम्हाला न्यायला येईन. तुम्ही इथून कुठेही जाऊ नका." मुलाच्या अशा बोलण्यावर विश्वास ठेवून मी तिथेच बसलो आणि डायरीत लिहू लागलो.

पाचचे साडेपाच वाजले, साडेपाचशे सहा वाजले नंतर थोडा थोडा अंधार पडू लागला आणि माझा जीव घाबरून गेला. ती संध्याकाळ मला जणू कातरवेळ वाटत होती. मी एकटाच तिथे आजूबाजूला पाहत बसलो होतो पण मन मात्र अस्वस्थ होते. आता रात्र होत होती तर माझा धीर सुटला, मी एकदम घाबरून गेलो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. असा इतक्या रात्री रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदाच मी एकटा बसलो होतो.

माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते. तो एकांतवास मला खाऊन उठत होता. मी निर्विकार होऊन बसलो होतो. तारूण्यातील दिवस माझ्या नजरेसमोरून सरत होते. आता पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे याची मला चिंता सतावत होती.

रात्रीचे नऊ वाजले होते. मला आता खूप भीती वाटत होती. एवढ्या रात्री साडेदहा अकरा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करणारा मी आज पहिल्यांदा मला खूप भीती वाटत होती. रात्री उशिरापर्यंत काम करून रात्र आपलीशी वाटणारी, मला आज ही रात्र वैऱ्याची वाटत होती. माझ्या जवळ ना घरचा पत्ता होता, ना कुणाचा फोन नंबर. त्यामुळे घरी जावे तरी कसे? असे मला वाटत होते. घरचा पत्ता सुद्धा माझ्या लक्षात नव्हता. आज खऱ्या अर्थी मी आयुष्यात खूप एकटा पडलो होतो. माझ्या सोबतीला कोणीच नव्हते, ना कुणाचा आधार होता. या जगात राहून आपला उपयोग तरी काय? असे मला वाटत होते. माझा शब्द न् शब्द मी डायरेक्ट उतरवत होतो. हे जग सोडून जावे आपला हा देह सोडून द्यावा, तसेही आपण सर्वांना ओझेच आहोत. शिवाय या पृथ्वीला भारही होत असे मला वाटत होते. माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येत होते पण आत्महत्या करणे हे खूप मोठे पाप आहे हे मला माहीत होते त्यामुळे तसा विचार जरी मनात आला तरी मी देह त्याग करणार नव्हतो.

यावेळी जगातील सर्वात दुबळा माझ्यासारखा दुसरा कोणी नव्हता. यावेळी तरी कोणाकडे जावे? कोणीच माझे नव्हते. अशावेळी माझे मन खूप दुःखी झाले होते. कोणाचातरी खांदा शोधत होते. मी अनोळखी भावनेने इतरांकडे पाहत होतो. कुणाला काही विचारावे तर माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. फक्त डोळ्यातून अश्रू ओघळत होते. अशावेळी एक व्यक्ती माझ्यासमोर आली आणि ती म्हणाली, "काका रस्ता चुकला आहात का?"

तेव्हा, "आयुष्याचं सगळं गणितच चुकलंय." असे बोलावेसे वाटले पण तोंडावाटे एकही शब्द फुटला नाही.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all