Login

आषाढीच्या स्वादातली भक्ती"

माझा विठोबा..."मंदिरातच नाही, तर माझ्या आईच्या हातात, तिच्या लाह्या, लोण्यात, आणि तिच्या उपासाच्या शांत हसण्यातच आहे."i
"आषाढीच्या स्वादातली भक्ती"



आषाढ मास आला की घरात काहीसं वेगळंच वातावरण यायचं. पंढरपूरचं दर्शन भले नसायचं, पण पंढरपूराचं पावित्र्य आमच्या घराच्या स्वयंपाकघरात दरवळायचं.

आषाढी एकादशी म्हणजे आमच्यासाठी उपवास नव्हता, तो "चंगल" होता.
आईच्या हातची चव, आजीच्या शब्दांतली भक्ती, आणि संपूर्ण घरात पसरलेला विठोबाचा अनुभव.



"उद्या कोण उपवास करणार?"
आईचा आवाज यायचा, आणि आम्ही भावंडं एकत्र म्हणायचो — "मी!"
कोणीही नाही म्हणायचं नाही, कारण उपवास म्हणजे फक्त काही न खाणं नव्हतं — ते म्हणजे काही तरी खास खाणं!


आई आणि आजीचं सुरेल युती सुरू व्हायची.
उपवासाच्या थालीपीठ भाजणी,साबुदाणा, शिंगाडा पीठ, राजगिरा, बटाटे, सैंधव मीठ, रताळी... यादी वाढायची, पण थकवा कधी यायचा नाही.

तेव्हा मिक्सर नव्हते, म्हणून भाजलेले शेंगदाणे आई हाताने फिरवून मशीनमध्ये बारीक करायची.
आमचं काय काम? मुठभर शेंगदाणे चोरून खाणं!

साजूक तूप आधीच कढवून काठोकाठ भरून ठेवलेलं असायचं.
साबुदाणा भिजत घालायचं ती एकदा विसरली नाही. आमच्यासाठी नाही, तिच्या "विठोबासाठी!"



एकादशी उजाडली की सकाळची तयारी हळुवार सुरू व्हायची.

स्वयंपाकघर आणि देवघर यांच्यात फक्त एक भिंत, पण मनात ती सीमारेषा केव्हाच मिटलेली.

फुलं, उदबत्ती, धूप, बेलपान, चंदन, आरतीचा घणघणाट —
एकीकडे आजी संथ स्वरात "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल" म्हणायची, तर दुसरीकडे आईच्या हातात खमंग जिरे-मिरचीची फोडणी!

ते फोडणीचं पहिलं तवंग तव्यावर पडायचं — आणि सगळ्या घरात त्याचा वास दरवळायचा.
तो वास म्हणजे भक्तीचा पहिला नैवेद्य वाटायचा.



सकाळचा बेत – साबुदाणा खिचडी, हिरवी चटणी, शिंगाड्याचा शिरा.
त्या शिरामध्ये गोड तूप आणि आईच्या प्रेमाचा सुवास असायचा.

दुपारी – भगर, चिंच-गूळ-शेंगदाण्याची आमटी, रताळ्याच्या गोड फोडी, लोणचं, पापड.
कोणतीही वस्तू विकत नाही — सगळं घरचं. आणि घरचं म्हणजे देवाचं.


दिवसभरात सगळं काही भक्तिभावात न्हालेलं.
आईचा चेहरा स्वयंपाकघरात थकल्यासारखा दिसायचा, पण जेवण झाल्यावर ती आमच्याकडे पाहून म्हणायची —
"विठोबा खूश झाला असेल ना गं?"

तिला सांगावं वाटायचं – "आई, तुझं काम पाहून विठोबा हात जोडून उभा आहे गं!"


संध्याकाळ झाली, दिवे लागले, आणि घरात एक वेगळं समाधान पसरलं.

तेव्हा टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हते, पण विठोबा आणि रुक्मिणीचं दर्शन घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात होतं.

आजी संध्याकाळी फक्त एकच वस्तू घ्यायची —
राजगिर्याच्या लाह्या, एक फळ आणि दूध.
ती म्हणायची, “आपल्या चपळ आयुष्यात थोडा संयम हवाच. विठोबाला हवंच.”


आई मात्र रात्री पुन्हा स्वयंपाकघरात.
थालीपीठ भाजताना तिचा घाम पुसून तूप लावणं थांबायचं नाही.
आम्हा सगळ्यांना ते गरमागरम थालीपीठ, त्यावर लोणी, आणि बाजूला लिंबाचं लोणचं...

त्या जेवणात एक प्रकारचं समाधान असायचं.
ते समाधान फक्त चवेमुळे नव्हतं — तर त्यामागच्या आईच्या श्रमामुळं.



दुसऱ्या दिवशी आमची एकादशी संपायची, पण आईची कधीच संपायची नाही.
तिचा विठोबा फक्त फोटोत नसायचा — तिच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कामात असायचा.

"आई म्हणजे माझ्या घराची रुक्माई,
तिच्या हातात असतो विठोबाचा नैवेद्य,
तिच्या काळजात असतो भक्तीचा गाभा,
आणि तिच्या पायाशी असतो माझा पंढरपूर!"


---जय जय रामकृष्णहरी, पंढरीनाथ मुरारी।
विठ्ठलाच्या दर्शनाने, हरली सर्व वारी।
भावभावनेच्या पंक्तीत, देवच उतरतो घरी॥

आता वर्षं उलटली.
घरात मिक्सर आले, रेशन हे ऑनलाईन दुकान मिळालं लागली , विकतचे पापड आले, थेट डबे मिळाले.
पण त्या एकादशीचा स्वाद नाही आला पुन्हा.

म्हणूनच आजही जेव्हा आषाढी येते, मी स्वयंपाकघरात आईसारखी उभी राहते.
मुलांना विचारते — “उद्या कोण उपवास करणार?”
ते मोबाईलवरून मान वर करत नाहीत, पण मी तरी तयारी करते.

आईची जागा घेतलेय कदाचित, पण तिच्यासारखं प्रेम कुठून आणायचं?


एकदाच मला वाटलं,
पंढरपूरला विठोबा उभा आहे, रांगेत वाट पाहतोय...
पण मी त्या पंक्तीच्या शेवटी बसलेली, आईच्या आठवणीत न्हालेली.


माझा विठोबा...
"मंदिरातच नाही, तर माझ्या आईच्या हातात, तिच्या लाह्या, लोण्यात, आणि तिच्या उपासाच्या शांत हसण्यातच आहे."


“जिथे भाव, तिथे देव.”
म्हणजे पंढरपूर गाठणं नव्हे —
तर आपल्या घरातल्या विठोबाला आणि रुक्मिणीला ओळखणं.
त्या म्हणजे "आई" आणि "आजी" — ज्यांनी पिढ्यानपिढ्या हे चैतन्य जपलं, आणि आपल्या मनात आषाढी रुजवली.


"सण येतात, जातात. पण विठोबा… तो कायम आपल्या चांगल्या कर्मांमध्ये उभा असतो.
आज तुम्ही जर कोणाचं मन जिंकलंत, तर समजा पंढरपूर गाठलंत!




सौ तृप्ती श्रीकांत देव
भिलाई छत्तीसगड