Login

आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - ४

अपुर्ण प्रेमाची हळवी प्रेमकहाणी
आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - ४

त्या स्वप्नानंतर मधुराच्या आयुष्यात थोडासा बदल दिसू लागला. ती रडायची, आठवणीत हरवायची, पण आता त्या आठवणींमध्ये तिला एक नवं सामर्थ्य सापडू लागलं होतं.

दुपारी तिने कपाट उघडलं. आतल्या वस्तूंमध्ये ती वही होती ज्यात काॅलेजला असताना अभिजीतने तिच्यासाठी कविता लिहिल्या होत्या. ती वही हातात घेतली आणि तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला.

"अभिजीत, तू म्हणाला होतास ना, एक दिवस पुस्तक लिहिशील? मग आज हेच माझं वचन आहे तुला. मी आता पुस्तक लिहीणार आहे." ती स्वतःशीच बोलली आणि निश्चय करून तिने लिहायला सुरुवात केली. आणि पहिल्या पानावरच शब्द उमटले गेले.

"ही कहाणी आहे एका अपूर्ण प्रेमाची. पण अपूर्णतेतही पूर्णत्वाचा श्वास आहे…" ते लिहीताना तिचे डोळे पाणावले पण तरीही ती लिहीत राहिली.

पुढे रात्रंदिवस ती लिहीत राहिली. तिचं दुःख, तिच्या आठवणी, त्याच्यासोबतचे लहानसहान प्रसंग, त्याचं हसू, त्याचे शब्द सगळं काही शब्दांत उतरत गेलं

मधुरा लिहीत असताना आई दररोज तिच्या खोलीत डोकावून पाहायची आणि तिला विचारायची.

"मधुरा, अगं एवढं लिहून काय करणार आहेस तू?" आईने विचारताच मधुरा हसली. कित्येक महिन्यांनी आज तिच्या चेहऱ्यावर खरं हसू झळकलं.

"आई, अभिजीतचं स्वप्न पूर्ण करतेय. पुस्तक लिहितेय." मधुरा म्हणाली. ते तिच्या बाबांनीही ऐकलं. बाबा शांतपणे तिच्याकडे बघत होते. त्यांना दिसत होतं त्यांच्या मुलीला शेवटी जगण्याचं कारण सापडलं आहे. आदित्यही ते बघून खूप खुश झाला.

"व्वा ताई, हेच हवं होतं मला! तुझं नाव पुस्तकावर झळकताना मी सगळ्यांना अभिमानाने सांगणार." अर्णव खूश होऊन म्हणाला. तसं मधुराचा लिहायला अजूनच उत्साह वाढत गेला.

काही महिने गेले. शेवटी पुस्तक पूर्ण झालं. मुख्यपृष्ठावर मधुराने एक फोटो ठेवला तो म्हणजे अभिजीतचा.

मधुराने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव होतं. "आठवणींचं कपाट."

पुस्तक प्रकाशनाच्या दिवशी मधुरा स्टेजवर उभी राहिली. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पण तिच्या मनात मात्र फक्त एकच नाव होतं ते म्हणजे अभिजीत.

"अभिजीत या टाळ्या तुझ्यासाठी आहेत." ती मनातल्या मनात म्हणाली.

पुस्तकाच्या शेवटच्या पानावर मधुराने लिहिलं होतं

"तो नाही, म्हणून माझं आयुष्य अपूर्ण आहे. पण त्याचं प्रेम आहे, म्हणून माझं लेखन पूर्ण आहे. काही दारं कधीच बंद होत नाहीत. ती उघडी राहतात, आठवणींच्या रूपाने. आणि त्या आठवणीच माझ्या आयुष्याचा श्वास आहेत."

त्याच्या वस्तूंचं ते कपाट अजूनही तिच्या खोलीत होतं. दररोज ती ते उघडायची. पण आता डोळ्यांत अश्रू नव्हते, तर चेहऱ्यावर शांतता होती.

अपूर्ण प्रेमकहाणीचं ओझं नाही, तर तिच्या आयुष्याचं प्रेरणास्थान झालं होतं ते कपाट.