Login

आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - २

अपुर्ण प्रेमाची हळवी प्रेमकहाणी
आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - २

काॅलेजमध्ये असताना मधुरा आणि अभिजीतच्या नात्याबद्दल सगळ्यांना माहीत झालं होतं. त्या दोघांचं प्रेम पवित्र आणि निर्मळ होतं हे ही सगळ्यांनाच माहीत होते. सगळेच त्यांना लव्ह बर्ड म्हणायचे.

अभिजीत थोडा खट्याळ आणि विनोदी स्वभावाचा होता... पण मधुरा मात्र थोडी शांत आणि संयमी. दोघांचे स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध असले तरी त्यांचं नातं अगदी योग्य रंगांनी रंगलेलं होतं.

एकदा दुपारी दोघे कॅम्पसच्या बागेत बसले होते.

"मधुरा,ऐक ना... माझं एक स्वप्न आहे." अभिजीत म्हणाला.

"काय?" मधुराने उत्सुकतेने विचारलं

"आपण दोघांनी एकत्र जगभर फिरायचं. प्रत्येक ठिकाणच्या आठवणी या फक्त कॅमेऱ्यात नाही, तर आपल्या मनात साठवायच्या." अभिजीतच्या बोलण्यावर मधुरा हसली.

"पण तुला हे माहीत आहे का, मी ही एक स्वप्न पाहिलंय ते म्हणजे तू माझ्या आयुष्याचा कायमचा प्रवासी होशील." मधुरा त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. त्याचवेळी अभिजीतने तिचा हात हातात घेतला

"ते स्वप्न नाही गं मधुरा, ते सत्य आहे. आपण कायम एकमेकांसोबत राहणार आहोत." अभिजीत म्हणाला त्याच क्षणी त्या दोघांचं जग पूर्ण झालं. असं त्यांना वाटलं.

त्यानंतर एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता. कॉलेज सुटलं आणि सगळे विद्यार्थी पळत पळत बाहेर पडत होते.
मधुराने डोक्यावर फाईल धरली होती आणि रस्त्याने धावत निघाली. अचानक अभिजीत तिच्या समोर आला.

"ए मधुरा, पळू नकोस. पडशील!" तो म्हणाला. तसं ती थांबली.

"पळू नकोस तर काय करू? छत्री तरी आहे का तुझ्याकडे?" ती चिडून बोलली. त्याचवेळी तो हसला आणि तिच्यापुढे हात पसरले.

"छत्री नाहीये, पण माझं खांदे आहेत ना!" त्यावर डोकं ठेव, म्हणजे तुला हा पाऊस आवडेल." तो म्हणाला तसं ती हसू लागली आणि दोघंही हसत हसत पावसात भिजत घरी गेले.

कॉलेज संपल्यावरही त्यांचं प्रेम तसंच टिकून होतं. नोकरीसाठी अभिजीत एका कंपनीत कामाला लागला आणि मधुरा पुढे शिकत राहिली. दोघे कमी भेटत होते पण मनाने अजून जवळ येत होते.

एका संध्याकाळी दोघं नदीकाठी भेटले होते. तेव्हा ते त्यांच्या लग्नाबद्दल बोलत होते.

"मधुरा, आपण घरी सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल सांगायचं?" अभिजीतने थोडं गंभीर होत विचारलं. त्यावर ती हलकंसं हसली.

"तू म्हणशील तेव्हा सांगू… पण मला तुच हवा आहेस. मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही." मधुरा भावुक होऊन बोलली.

"मग आपण लवकरच घरी सांगू कारण लग्नाशिवाय आपला हा प्रेमाचा प्रवास पूर्ण होणारच नाही." अभिजीत म्हणाला.

त्या रात्री मधुरा त्याच्यासोबत भविष्याचं एक सुंदर चित्र मनात रंगवत झोपी गेली. पण नियतीला वेगळंच काही ते मान्य नव्हतं.

एके दिवशी ऑफिसमधून घरी परतताना अभिजीतच्या गाडीचा अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या ट्रकने त्याच्या गाडीला जोरात धडक दिली. आणि काही सेकंदांत सगळंच संपलं.

मधुराला फोन आला तेव्हा ती अभ्यास करत होती. फोनवरचा आवाज ऐकून तिचं हृदय थांबल्यासारखं झालं.

"अभिजीत… अपघात… हॉस्पिटल…" एवढंच तिला ऐकू आलं. ती लगेच धावत हॉस्पिटलमध्ये पोहचली. डॉक्टर बाहेर आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच तिच्या अंगातलं त्राण निघून गेले.

"आम्ही खुप प्रयत्न केला, पण…" डाॅक्टरांचे ते शब्द ऐकून मधुराच्या आयुष्यातला रंग क्षणात पुसला गेला आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मधुरा हॉस्पिटलमध्येच जोरजोरात रडत होती.

"तू मला सोडून कसा जाऊ शकतोस अभिजीत? आपण कितीतरी स्वप्नं पाहिली होती… अजून जगभर फिरायचं बाकी होतं… अजून माझ्या पुस्तकात तुझं नाव लिहायचं होतं…" असं बोलून ती हुंदके देत रडत होती. तिचा आवाज सगळीकडे घुमत होता. पण तिला उत्तर कुणी देत नव्हतं. तिला उत्तर देणारा तर कायमचा दूर गेला होता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all