Login

आठवणींचा कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - ३

अपुर्ण प्रेमाची हळवी प्रेमकहाणी
आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - ३

अभिजीत गेल्यानंतर मधुरा खूप खचली होती. सकाळ कधी होते, संध्याकाळ कधी होते, याचं भानही तिला राहत नसायचं. तिच्या मनात एकच प्रश्न असायचा. तो म्हणजे "का? का... फक्त माझ्यासोबतच असं का झालं?"

तिचं खोलीतलं कपाटच आता तिचं संपूर्ण जग बनलं होतं.
अभिजीतने दिलेली प्रत्येक वस्तू तिने तिथे नीट ठेवली होती. रुमाल, पेन, त्याचा फोटो आणि एक वही ज्यात त्याने तिच्यासाठी काही कविता लिहील्या होत्या.

आताही मधुरा खोलीतच बसलेली होती. तिची आई खोलीत आली आणि पाहिलं तर मधुरा बसून फोटो हातात धरून रडत होती.

"मधुरा, अगं किती दिवस झाले… आता स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. आम्हाला बघवत नाही तुझी अशी अवस्था." आई डोळ्यांत पाणी आणत म्हणाली.

"आई, तुला कसं समजावू मी? अभिजीत शिवाय मी अपुर्ण आहे. त्याने दिलेल्या या वस्तूंमध्येच माझं जग आहे. तू म्हणतेस पुढे जग, पण माझं जग पुढे कुठे आहे?" मधुरा म्हणाली तसं आईने तिचा हात हातात घेतला.

"मधुरा, आपण ठरवू तसंच आयुष्य आपल्याला कधीच जगता येत नाही. आता तरी सावर स्वतःला, अभिजीतच्या आठवणींना कायमचं ओझं करू नकोस, त्यातून बळ घे आणि नव्याने जगायला शिक." आई म्हणाली. त्यावेळी ती काही बोलली नाही पण आईच्या डोळ्यांतलं दुःख तिला जाणवलं.

तिचे बाबा फार बोलणारे नव्हते. पण तिला सारखं खोलीत बसलेलं पाहून त्यांनी सुद्धा आज विचारलं.

"मधुरा, तुला काय हवं आहे सांग. ते मी तुला देईन पण तू अशी दुःखात बसू नकोस. आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत." त्यांच्या बोलण्यावर मधुराने हसण्याचा प्रयत्न केला.

"बाबा, मला काही नको. फक्त अभिजीत परत हवा आहे. आणि ते शक्य नाही हे मलाही माहीत आहे." ती म्हणाली तसं बाबा तिच्या खांद्यावर हात ठेवून बाहेर निघून गेले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतलं मौन शब्दांपेक्षा जास्त बोलून गेलं.

तिचा भाऊ आदित्य अजून कॉलेजला होता. त्याला बहिणीची अवस्था पाहवत नव्हती.

"ताई, तू असं करून स्वतःलाच नाही तर आम्हालाही शिक्षा देत आहे. आम्हाला परत आमची जुनी ताई हवी आहे. जी हसत होती, ज्यामुळे हे घर उजळायचं." तिचा भाऊ म्हणाला तसं मधुरा त्याला मिठी मारत रडू लागली.

"आदित्य, मी प्रयत्न करतेय… पण जे आतून तुटलंय ना, ते पुन्हा बांधता येत नाही." मधुरा दुखऱ्या आवाजात बोलली. त्यावर आदित्यकडे बोलायला काहीच नाही राहिलं.

पुढेही ती प्रत्येक रात्री ती कपाट उघडून त्या वस्तूंशी बोलत होती.

"आई म्हणाली पुढे जा. पण तू नाहीस तर पुढे जगायचं कसं? आदित्य म्हणतो मी हसावं, पण तुझ्या आठवणींनी माझे डोळे भरतात…" ती कपाटातल्या आरशात बघून दुखऱ्या आवाजात बोलली.

रात्री झोपेत तिला स्वप्न पडलं. अभिजीत तिच्यासमोर उभा होता आणि तो तिच्याशी बोलत होता.

"मधुरा, एवढा त्रास करून घेऊ नको, जास्त रडू नकोस. मी तुझ्यापासून दूर गेलो तरी माझं प्रेम कायम तुझ्यासोबत आहे. माझ्या आठवणींना शाप बनवू नकोस, त्यांना बळ बनव." त्याच्या त्या बोलण्याने ती झटकन उठली. डोळे भरलेले होते. पण आता मनात एक नवा विचार चमकला... "कदाचित खरंच… आठवणींतून ताकद मिळू शकते. मला आता माझ्या आठवणींना ताकद बनवायलाच हवं." ती स्वतःशीच बोलली आणि तिने मनाशी निश्चय केला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all