Login

आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग -१

अपुर्ण प्रेमाची हळवी प्रेमकहाणी
आठवणींचं कपाट - अपुर्ण प्रेमकहाणी. भाग - १

संध्याकाळचे सात वाजत आले होते. घरभर शांतता पसरलेली होती. खिडकीबाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पण मधुराच्या खोलीत मात्र काळोख दाटलेला होता. दिवा लावायचंही भान तिला नव्हतं. कधी कधी अंधारात राहणंच तिच्या मनाला थोडा दिलासा देत असे.

ती हळूच उठली आणि जुनं कपाट उघडलं. जणू काही त्या कपाटातच तिने तिचं अर्ध आयुष्य जपून ठेवलं होतं. आत ठेवलेल्या वस्तूंकडे ती एकटक पाहू लागली. प्रत्येक वस्तू म्हणजे एक आठवण… एक कहाणी.

मधुराच्या हातात पहिल्यांदा आला तो छोटासा पांढरा रुमाल. अजूनही त्यावर हलकासा सुगंध शिल्लक होता.
"नेहमी हसत राहा, कधी रडलीस तर हा रुमाल तुझ्या कामी येईल." त्याचा आवाज तिच्या कानात घुमला. जणू काही तिच्या नशिबी त्याच्या आठवणीत रडणंच येणार आहे हे त्याला आधीच माहिती होते. त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यांतून पाणी आलं आणि तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं.

"तू नाहीस म्हणूनच हा रुमाल आजही ओला होतोय..." ती म्हणाली आणि रुमाल बाजूला ठेवताच तिच्या हातात चांदीचा पेन आला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी त्याने तिला दिला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की "याच पेनाने एक दिवस तुझ्या नावाने पुस्तक लिहिलं जाईल." त्याचं ते वाक्य आठवून ती हसली, पण डोळ्यांतून अश्रू ओघळले.

"हो… लिहीन मी पुस्तक. पण तुझ्याशिवाय त्यातली पानं अपुरीच राहतील." ती त्या पेनकडे बघत म्हणाली. कपाट बंद करताना तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता – "हे दार बंद झालं, पण मनाचं दार कसं बंद करू? ते तर कधीच बंद होणार नाही." त्या प्रश्नाने तिचं मन भुतकाळात गेलं.

भूतकाळ

काही वर्षांपूर्वी…
मधुरा कॉलेजच्या पहिल्या दिवशी खूप घाबरलेली होती. मोठं कॅम्पस, अनोळखी चेहरे, कुठे जायचं, कुणाशी बोलायचं काहीच कळेना. क्लासरूममध्ये जागा मिळाली नाही म्हणून ती मागे जाऊन उभीच राहिली होती. तेवढ्याच मागून आवाज आला.

"इथे माझ्या बाजूला बसलीस तरी चालेल इतकं घाबरून उभी राहायची काही गरज नाहीये." त्या आवाजाने तिने वळून पाहिले तर एक मुलगा हसऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता. त्याचे डोळे चमकत होते, तर चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता.

"नाही... नाही… मी इथेच ठिक आहे." ती अडखळत म्हणाली. त्यावर तो लगेच उठून उभा राहिला.

"बरं तू बस. मी उभा राहतो. एक मुलगी उभी असताना मी असं आरामात बसणं बरं नाही दिसत." त्याच्या त्या बोलण्याने तिचं मन जिंकलं. ती लगेच हसून त्याच्याकडे बघू लागली.

"थॅक्य यू सो मच, पण आपली ओळख नसताना सुद्धा तू मला जागा का देतोय?" तिने विचारलं.

"एक काम कर, आता तू माझ्या बाजूलाच बसं. म्हणजे आपली ओळख होईल." तो म्हणाला तसं ती हलकंसं हसत त्याच्या बाजूला बसली आणि त्या क्षणापासून त्यांची ओळख झाली. त्याचं नाव अभिजीत होतं.

पुढची दोन वर्षं त्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरली.
कधी कॉलेजच्या कँटीनमध्ये एकत्र बसून चहा पिणं, कधी लायब्ररीत एकच पुस्तक दोघांनी वाचणं, तर कधी तासनतास गप्पा मारत बसणं… असं त्या दोघांचं चालू असायचं. हळूहळू त्यांची मैत्री सर्वांना माहिती व्हायला लागली.

एके दिवशी पावसाळ्यात दोघं कॉलेजहून परतत होते. पाऊस अचानक जोरात पडायला लागला. ते दोघे बसस्टॉपवर उभे होते.

"बघ ना, किती पाऊस पडतोय! छत्रीही नाही आणली. छत्री आणली असती तर घरी तरी जाता आलं असतं." मधुरा म्हणाली.

"छत्री नाही आणली त्यामुळे का होईना पण तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळालं, ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे." अभिजीत म्हणाला.

ती हसली, पण मनात एक वेगळी धडधड जाणवली. त्याच्याकडे पाहताना तिच्या गालावर ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांनी जणू त्याच्या प्रेमाचं बीज पेरलं होतं.

कॉलेजचं शेवटचं वर्ष होत. वार्षिक सांस्कृतिक सोहळ्याच्या दिवशी अभिजीतने तिला स्टेजच्या मागे बोलावलं आणि ती ही लगेच गेली.

"मधुरा, मला तुझ्याशी काही तरी बोलायचं आहे." तो थोडा गंभीर होऊन म्हणाला.

"काय झालं?" तिने घाबरतच विचारलं. त्यावर तो क्षणभर थांबला आणि तिच्याकडे निरखून पाहू लागला.

"मधुरा, मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. मला माहित नाही तुला काय वाटतं, पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे." तो म्हणाला तसं तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ती काही बोलली नाही. फक्त हलकंसं हसली आणि त्याचा हात हातात घेतला.
तो हातात हात घेतल्याचा स्पर्श म्हणजेच तिचं उत्तर होतं.

त्या दिवसानंतर त्यांच्या मैत्रीच्या नात्याला एक नवीन नाव मिळालं ते म्हणजे प्रेम.

आता ती कपाटाजवळ बसलेली होती आणि तिला सगळं आठवत होतं.

"का रे अभिजीत… एवढं सुंदर नातं असूनही ते अपुर्ण का राहिलं?" ती स्वतःशीच पुटपुटली.

खिडकीबाहेरचा पाऊस अजूनही तसाच कोसळत होता.
तिच्या डोळ्यांतले थेंब आणि खिडकीवरचे थेंब जणू एकच झाले होते. त्याच्या आठवणीत तिला वेळेचंही भान नव्हतं राहिलं.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all