Login

आठवणींचा स्वाद

मुलाच्या आठवणीत तळमळणारी आई. कामाच्या व्यापात आईला भेटणं विसरून गेलेला मुलगा. भेटतील का दोघं? जाणून घेण्यासाठी वाचा भाग्यश्री लिखित "आठवणींचा स्वाद"
चॅम्पियन ट्रॉफी २०२५

आठवणींचा स्वाद

" राघव.. राघव.. ऐका ना. दोन मिनिट.. "

" माया.. कृपा करून मला त्रास नको देऊ. मला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. तुला जे काही बोलायचं ते संध्याकाळी बोलू. आता मी जातोय. " एवढं बोलून राघव मायाच काही न ऐकता निघून गेला.

राघव गेल्यावर माया मनातच " राघव तुम्ही आज खूपच महत्वाची गोष्ट विसरत आहात जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार."

राघव घाईघाईत एका हॉटेलजवळ पोहचतो आत शिरल्यावर तो कोणालातरी शोधतो. चहूबाजूंनी नजर फिरवल्यावर त्याला हवी असलेली व्यक्ती भेटते. तो त्या व्यक्तीजवळ जात " नमस्कार केतन सर.. " असे म्हणतो.

" नमस्कार.. या बसा. " केतन बोलतो.

" माफ करा.. मला यायला उशीर झाला. " राघव माफी मागतो.

" हरकत नाही.. आधी काहीतरी मागवू मगं आपण कामाबद्दल बोलूया. " केतन बोलतो तेव्हा राघव होकारार्थी मान डोलावतो.

केतन आणि राघव दोघं आपापल्या फ्लेवरचे आइस्क्रीम मागवतात. थोड्यावेळात दोघांची ऑर्डर येते.

राघव आइस्क्रीमचा एक सीप घेतो तेव्हा त्याच अचानक हृदय धडधडायला लागतं. असं का होतं आहे ? ते त्याला काहीच समजत नव्हतं. तो दुसरा सीप खाण्यासाठी खाली बघतो तर त्या आईसक्रीमकडे बघून तो नकळत भूतकाळात जातो.

भूतकाळ ;

" आई.. आई.. मला आइसक्रीम खावीशी वाटत आहे. "

आपल्या मुलाची इच्छा बघून ती पदराच टोक हातात घेत चाचपडते तर तिला त्यात दोन रुपये सापडतात. ती त्या दोन रुपयाकडे बघत आपल्या दहा वर्षाच्या चिमुकल्या मुलाकडे बघते तर तिला त्याच्या डोळ्यात आशा दिसत होती की ' आई मला आइसक्रीम खाऊ घालेल. ' त्याची ही इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते पण तिने ते त्याला न दाखवता शिताफीने गिळले पण माहीत नाही त्या चिमुकल्या मुलाला कसं समजल जणू त्याने तिच्या मनातलं ओळखून घेतलं होतं.

" आई.. मला नको आइसक्रीम. आपण घरी जाऊ. "

त्याच्या या वाक्यावर तिला मोठ्याने रडावसं वाटत होतं पण तिने ते आतच दाबून ठेवलं. ती त्याच्याकडे बघत मनात " आज तुझे बाबा असते तर त्यांनी लगेच तुझी इच्छा पूर्ण केली असती. जेव्हापासून तुझे बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हापासून दुःखाचे सागर वाट्याला आले तरी या दुःखाना कवटाळून आयुष्य जगत आहोत. राघव बाळा मला माफ कर मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकत नाहीये पण मी खूप कष्ट करणार आणि तुझ्या ज्या काही इच्छा अपूर्ण आहेत त्या पूर्ण करणार. "


त्यानंतर राघवच्या आईने मनात निर्णय घेतला की खूप कष्ट करून राघवला कोणतीच कमी पडू द्यायची नाही. एक दोन दिवस तिने घराघरात काम करून चार पैसे कमवले आणि राघवासाठी आवडती आइसक्रीम त्याला खाऊ घातली. आपल्या मुलाला आनंदाने आइसक्रीम खाताना बघून तिच्याही चेहऱ्यावर हसू पसरत होतं. राघव जसजसा मोठा होत होता तसं तसे खर्च वाढत होते तरीही तिने कोणतीच तक्रार न करता त्याची इच्छा पूर्ण करत. जेव्हा जेव्हा राघव आइसक्रीम मागायचा तेव्हा त्याची आई त्याला प्रेमाने खाऊ घालायची आणि राघव आनंदाने आइसक्रीम खायचा.

असेच दिवस जात होते राघव जसा समजूतदार झाला तस त्याला आईचे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेले कष्ट बघून त्याच्या डोळ्यात अश्रू जमा व्हायचे. आपल्या आईला अस बघून त्यानेही तिला कामात मदत करायला सुरूवात केली.

दोन वर्षानंतर राघवची बारावी पूर्ण झाली आणि तो चांगल्या मार्काने पास झाला. त्याला पुढचे शिक्षण मुंबईला घ्यायचं होतं पण आईला बघून त्याने ती इच्छा तशीच मनात ठेवली पण आईला त्याच्या इच्छेबद्दल समजलं. तिने कष्टाने कमावलेले पैसे त्याचा हातात सोपवून त्याला मुंबईमध्ये शिक्षण घेण्यास सांगितलं.

" आईं.. मी तुला एकटीला सोडून कुठे नाही जाणार. मी इथेच गावी राहून शिक्षण पूर्ण करणार. " राघव म्हणाला.

" बाळा.. माझी काळजी नको घेऊस. मी कुठे एकटी आहे तुझ्या आठवणी आहेत ना माझ्यासोबत. तसही तू सुट्टीच्या दिवशी भेटायला येणारच. " त्याच्या आईने त्याला समजावून मुंबईला जाण्यास मनवलं. एक दिवस मुंबईला जाण्याचा दिवस उजाडला. त्याची आई त्याला बस स्टँडवर सोडायला आलेली. काही वेळाने मुंबईची बस स्टँडवर लागली. दोघांना निरोप घेणं कठीण जात होतं.

राघव बसमध्ये चढणार त्याची आई त्याला थांबवत त्याच्या हातात आइस्क्रीमचा कोन हातात देत " हे घे.. "

" अगं.. आई याची कायं गरज होती ? " आई बोलते

आई हसत त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत " तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाने माझं मन तृप्त होतं बाळा. "

आईच्या वाक्याने राघवला रडू येत होतं. त्याच्या डोळ्यातले अश्रू बघून आई " नाही.. रडायचं नाही. ( आपल्या चेहऱ्यावर हसू आणत ) हसत हसत निरोप द्यायचा. "

दोघांनी एकमेकांना हसत हसत निरोप दिला. मुंबईची बस जसजशी लांब जात होती तसतसं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि इथेही जसजशी बस पुढे जात होती तसतसं राघवच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते.

वर्तमान ;

" मि. राघव काय झाल तुम्हाला ? " केतनच्या आवाजाने राघव भानावर येतो " सॉरी सर.. " एवढेच म्हणतो.

" कायं झाल तुम्हाला? तुमच्या डोळ्यात अश्रू? " केतन विचारतो

राघव अचानक उठत " सॉरी सर.. आपण मीटिंग नंतर घेऊ. मला आता महत्वाच काम आहे. " एवढ बोलून तो केतनच न ऐकता तिथून निघून जातो.

थोड्यावेळाने घरी आल्यावर मोठ्या आवाजात " माया.. माया.. कुठे आहेस ? "

राघव मायाला शोधत असताना त्याचा समोर आईला बघून मटकन खाली बसत " आई.. आई.. मला माफ कर. मी या कामाच्या दुनियेत तुला विसरलो. तू गेल्या पाच वर्षांपासून मला कॉल करून भेटायला येण्यासाठी विचारायची पण मी.. मी कामाचा व्याप म्हणून भेटायला येत नव्हतो. आज तुझा वाढदिवस म्हणून भेटायला येणार होतो. पण.."

राघवची आई " हे बाळा.. शांत हो रडू नको. आता मी कायमची इथे राहणार आहे."

" कायं ? " राघव जोरात ओरडतो

" हो.. तुमचं वागणं बघून आणि आईची तुम्हाला भेटण्याची तडफड बघून मी आईला इथे बोलावलं. आता आई कायमची आपल्यासोबत राहणार आहे. " माया बोलते

माया जे काही बोलली ते ऐकून राघवच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आईचं मन तृप्त झालं.

समाप्त
©भाग्यश्री परब
0

🎭 Series Post

View all