शीर्षक:- आत्मसन्मान
भाग:- १
"आह ऽ ऽ.." चालता चालता नेहाचा पाय अडखळला म्हणून तिने घाबरून तिचा नवरा सुमितचा दंड जोरात पकडला.
तिने जोरात दाब दिला, त्याच बरोबर त्याच्या अंगावर आदळल्याने तो पडता पडता राहिला. त्यामुळे त्याला तिचा रागच आला.
अंगावरील माशी झटकावी तसं त्याने तिचा हात त्याच्या दंडावरून झटकून दिला आणि सटाक ऽ ऽ.. जोरात तिच्या कानशिलात लगावत तिच्यावर रागाने खेकसत म्हणाला,"पडलो असतो ना मी आता. नीट चालताही येत नाही का तुला? जेव्हा बघावं तेव्हा नेहमी धडपडत असतेस. कुठेही नेण्याच्या लायकीची नाहीस तू?"
आपण कुठे उभे याचही त्याला भान नव्हतं. तो वाट्टेल तसे तिच्यावर तोंड सुख घेत होता.
नेहा आणि समीर त्यांच्या छोट्या मुलाला, शर्वला घेऊन खरेदीसाठी गेले होते. वाटेत तिचा पाय अचानक अडखळला. ती पडणार म्हणून घाबरून तिने त्याचा हात धरला होता. जे त्याला आवडलं नव्हतं. तो तिला खूप तावातावाने बोलत होता. शर्व घाबरून सुमीतच्या मागे थोडं मागं सरकून उभा राहिला.
रस्त्यावरील येणारी जाणारी सर्व माणसे त्या दोघांकडे बघत आपापासात कुजबुजत होती. कोणाला नेहाची कीव येत होती तर कोणी सुमितकडे रागात पाहत होती तर काहीजण त्यांच्याकडे पाहून हसत होती.
नेहा खाली मान घालून रडत त्याचे बोलणे ऐकत होती. रस्त्यावरचा फुकटचा तमाशा बघायला कोणाला आवडत नाही. बघणाऱ्याला काय फक्त मनोरंजन पाहिजे असते. तसेच तेथे झाले.
"घ्या, झालं ! थोडं काही बोललं तर लगेच डोळ्यांना धार लागते. आता अशीच रडत माझ्या डोक्यावर उभी राहणार आहेस का? चल लवकर." तिचा हाताला धरत तिला पुढे ओढत हाताला हिसडा देत तो तिला म्हणाला.
ती पडणार पण तिने कसे बसे स्वतःला सावरत अश्रू गाळत चालू लागली.
"च्या मायला! काय बघून आईबाबांनी हा धोंडा माझ्या गळ्यात बांधला काय माहिती?" तिला तसे पाहून पुन्हा त्याचा रागाचा पारा चढला आणि कपाळावर हात मारत म्हणाला.
शर्व अजूनही घाबरून मागेच होता. त्याच्यावरही सुमित जोरात ओरडला," ए शर्व, तुला काय वेगळं सांगायचं का रे? चल लवकर. सगळे नमुने माझ्याच नशीबी कसं काय आले, देव जाणे?"
शर्व थरथरत त्याच्यासोबत चालू लागला.
त्या दोघांना घरी सोडून सुमित त्याच्या कामासाठी निघून गेला.
नेहाला राहून राहून आजचा प्रसंग पुन्हा आठवत होता. तिचे डोळे सारखे भरून येत होते. शर्व उशीर पर्यंत आईचे रडणे पाहत होता. नेहाला तसं पाहून त्याला गलबलून आले. तोही स्फुंदत तिच्याजवळ जात त्याच्या छोट्या हाताने तिचे डोळे पुसत म्हणाला,"आई, तू रडू नको ना. मला वाईट वाटतं. बाबा का नेहमी असं वागतात गं आपल्याशी?"
तिला अजून भरून आलं. ती त्याला कवटाळून रडू लागली. नंतर तिने स्वतःचे व त्याचे डोळे पुसत मनाशी निर्णय घेतला आणि त्याला म्हणाली,"माहिती नाही, बाळा; पण इथून पुढे असे होणार नाही. चल आपण जाऊ इथून."
संध्याकाळी सुमित घरी आला. आल्या आल्या त्याने हुकुम द्यायला सुरुवात केली," ए नेहा, कुठे खपलीस? ऐकू येत नाही की कानात खुट्टा मारून घेतलास. पटकन पाणी आण आणि चहा बनवं आलं टाकून."
क्रमशः
काय निर्णय घेतला नेहाने?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा