शीर्षक:- आत्मसन्मान
भाग:- २
"हुश्श ! किती दमलो आज." स्वतःशी म्हणत त्याने रूमालाने घाम पुसत हाॅलमधला फॅन चालू केला आणि पायावर टाकून सोफ्यावर आरामात बसला.
बराच वेळ झाला तरी नेहा बाहेर आली नाही तेव्हा तो चिडत पुन्हा तिला मोठ्याने आवाज देत म्हणाला,"ए मेल्यावर पाजशील का पाणी? तुझ्या तर.. सकाळी चार चौघात मारलेली कानशिल कमी पडली वाटतं."
दात ओठ खात तो सोफ्यावरून उठून जाणार तोच नेहा हातात बॅग घेऊन आतल्या रूममधून बाहेर आली.
ती बॅग बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
तो रागात तिला म्हणाला,"हे काय आहे, नेहा? कुठे चाललीस?"
"मी शर्वला घेऊन हे घरं सोडून चालले आहे. या घराच्या चाव्या." ती शांतपणे घराच्या चाव्या त्याच्या हातात ठेवत म्हणाली.
त्याने त्या चाव्या भिरकावून दिल्या आणि गुरगुरत फणकाऱ्याने म्हणाला,"काय नवीन नाटक लावलं आहे हे सगळं? गुपचूप जाऊन चहा टाक आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करं. माझे मित्र येणार आहेत जेवायला."
"नाही जमणार मला. मी चाललेय. तुमचं तुम्ही पाहा. चल शर्व, आपल्याला उशीर होतोय." नेहा पुन्हा शांत आवाजात शर्वचा हात पकडत म्हणाली आणि दार उघडून बाहेर पडणार तोच सुमितने पटकन पुढे येऊन शर्वचा हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि मागून तिचे केस हातात घेत ओढत दात ओठ खात म्हणाला," खूप मस्ती आली का तुला? थांब, आता बघ कसे उतरवतो तुझी मस्ती?"
शर्व घाबरून भीतीने थरथरू लागला.
सुमितने केस धरल्याने नेहा आधी तर कळवली पण नंतर धीर एकवटून तिने केस सोडवून घेत त्याला पूर्ण शक्ती लावून त्याला ढकलून दिले.
"शर्व, तू बाहेर जा मी आलेच." तिने शर्वला बाहेर पाठवले.
नेहाने सुमितला ढकलल्याने त्याचा राग सातव्या आसमानावर गेला. प्रचंड संतापाने थरथरत तो तनतनत तिच्यावर चावताळून जात म्हणाला,"तुझी इतकी हिंमत ! मला ढकलून देतेस. खूप चरबी चढली काय तुला? बऱ्या बोलाने ऐकू येत नाही वाटतं तुला?"
तो दात ओठ खात तिच्यावर हात उचलला तोच हात तिने हवेत धरून झिडकारत चढ्या आवाजात म्हणाली,"आवाज खाली करून बोला. ऐकू येत मला. आणि हो माझ्यावर हात उगारण्याची चूक पुन्हा करू नका."
"ए आधी तू आवाज कमी करून बोल. काय फालतूची नाटकं चालू केलेत. चल हो बाजूला. शर्वला आत घेऊ दे आणि तू ही ती बॅग आत नेऊन ठेवं." तो पुढे येऊन दार उघडण्यासाठी जात म्हणाला.
"थांबा, त्याला आत घ्यायची गरज नाही. मी जातच आहे बाहेर. आणि हो फालतूची नाटक नाही हे. मी जात आहे. सरका." ती त्याच्या समोर आली.
"तुझी अक्कल ठिकाणावर नाही. जास्त बोलू नकोस. शांततेत सांगतोय, उगीच मला राग आणू नकोस. आणि हो सकाळबद्दल तुला राग आला असेल तर चुकून झालं. साॅरी." तो शक्य तितक्या राग आवरत जरा वरमून बोलला.
क्रमशः
नेहा थांबेल की तिच्या निर्णयावर ठाम राहिलं?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा