Login

आत्मसन्मान (भाग:-३ अंतिम)

आत्मसन्मानाची जाणीव झाल्यावर तो जपण्याचा निर्णय घेणाऱ्या नेहाची कथा

शीर्षक:- आत्मसन्मान

भाग:- ३ (अंतिम)

"हं, साॅरी म्हटलं की झालं का? आणि हो आधी अक्कल नव्हती ठिकाणावर पण आता आली ठिकाणावर. चला व्हा बाजूला, जाऊ दे मला." ती ही आता माघार न घेता, घेतलेल्या निर्णयावर ठाम होती म्हणून ती मागे न हटता शांततेत म्हणाली.

"हे बघ मी तुला साॅरी म्हणतोय ना. चल आत हो, मी शर्वला पण आत घेतो." तो पुन्हा वरमून नरमाईने म्हणाला.

"हो, आता साॅरी बोलाल. पण नंतरच काय ओ? लग्न झाल्यापासून मी सगळं सहन करतेय. कधी प्रेमाने जवळ घेतलं नाही की कधी बोलणं नाही. नेहमी हिडीसफिडिस वागणं. तुमच्या लेखी पायपुसणी इतकीही किंमत नाही माझी. आज तर हद्द केलीत तुम्ही चारचौघांत तुम्ही मला किती बोललात, हात उचललात. तेही आपल्या मुलासमोर !" ती थरथरत बोलत होती.

"हे बघ, मला राग सहन होत नाही हे तुला चांगलच माहिती आहे ना. आणि चुकलो म्हणालो ना मी. रागात बोललो मी. राहिला प्रश्न शर्व समोर ते घडले तर इथून पुढे त्याच्या समोर असं काही होणार नाही, याची काळजी घेईन मी." तो तिला समजावत म्हणाला.

ती हलकेच हसत म्हणाली," शर्व समोर नाही पण तो नसल्यावर तुम्ही तेच कराल हो ना. माझी मर्जी काय? मला काय आवडतं याचा कधी विचार केला का तुम्ही? का कराल तुम्ही ? तुमच्यासाठी सगळे काही आयत हातात मिळत ना."

"हे बघ नेहा, मला माझी चूक कळली आता. इथून पुढे नाही होणार तसे. मी .." तो बोलत होता पण मनापासून बोलत नव्हता हे त्याची नजर तिला सांगत होती म्हणून ती त्याला अडवत म्हणाली,"असू द्या हो, कोरडी आश्वासन नको आहेत मला. मलाही आत्मसन्मान आहे हो हे विसरलात तुम्ही. किती वेळा आत्मसन्मान पायदळी तुडवून टाकलंत तुम्ही. माझ्या मनाला ठेस पोहोचवलीत. इतके घायाळ केले की आता किती ही मलमपट्टी केली तरी ती बरी होणार नाही. खूप विचारपूर्वक मी निर्णय घेतलाय. त्यात तुम्ही आड येऊ नका."

"कुठे जाणार ? काय करणार आणि लोक काय म्हणतील याचा विचार केलास का तू?" त्याने उपहासात्मक हसत विचारले.

"आता पर्यंत लोक काय म्हणतील आणि आईवडीलांचा विचार करून गप्प होते. मी शिकलेली आहे, अंगात पाककला आहे. त्याचा वापर करून मी माझ्या मुलाचा सांभाळ करेन." ती एकदम आत्मविश्वासाने म्हणाली.

"ठीक आहे, तुला जायचे असेल तर खुशाल जा. पण लक्षात ठेव, या घरात पुन्हा तुला जागा नाही. आणि हो, शर्व माझ्यासोबत राहिलं, समजलं." तिला इतकं समजावूनही ती ऐकत नाही म्हणल्यावर तो थोडा चिडत म्हणाला.

"नाही, अजिबात नाही. शर्व माझ्यासोबतच राहिलं. तुमच्या सोबत राहिल्यावर तो तुमच्या सारखाच होईल. ज्याला स्त्रीचा सन्मान, आदर करता येत नाही, कदर नाही. ते मला नकोय. आणि राहिला या घरात जागेचा प्रश्न तर ज्या माणसाच्या मनात मला जागा नाही त्या घरात मला जागा नकोय. चल, शर्व." असे म्हणत तिने घराचा उंबरठा ओलांडला आणि शर्वचा हात घट्ट धरत निघाली.

पाठीमागून सुमित तिला हाक मारत होता पण ती मागे वळून न पाहता पुढे सूर्यास्ताकडे पाहत होती.

तो सूर्यास्त म्हणजे तिच्यासाठी तिचा आत्मसन्मानाचा सूर्योदय होता.

समाप्त -

स्त्रीला तिच्या आत्मसन्मान कळायला हवा. तो पायदळी तुडवण्या आधी तिने तो जपावे.