Login

माझे जीवन गाणे - आत्मचरित्र

aatmchritra
माझे जीवन गाणे - आत्मचरित्र

नमस्कार मी सौ. सोनल गुरुनाथ शिंदे, मी कोणी मोठी लेखिका नाही, मी हि तुमच्यातलीचं एक सर्वसामान्य स्त्री आहे.


माझा जन्म मुंबई मध्ये भांडुप या ठिकाणी झाला. लग्नानंतर मी आता रत्नागिरीला असते..


आम्ही तीन भावंड, दोन बहिणीं एक भाऊ, मी दोन नंबर आई - वडील आणि आम्ही तिघे असं आमचं पाच माणसाचं कुटुंब, वडील एका एक्स्पोर्ट कंपनीमध्ये क्लार्क होते, आई गृहिणी होती. घरची आर्थिकस्थिती मध्यमवर्गीय होती, आमचं घर चाळीत होतं. दहा बाय बारा च्या रूम मध्ये आम्ही राहत होतो. लग्नाआधीची सत्तावीस वर्ष मी तिथेच राहिले आहे.


घरी वडील एकटेच कमवणारे होते. त्यामुळे कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट जास्त असा केलाच नाही, आहे त्यात आणि जे मिळेल त्यात कायमचं समाधान मानले. जास्त कधीच कसलीही अपेक्षा केली नाही. आपल्या नशिबात जे आहे ते मिळणारच आहे ह्यावर माझा खूप विश्वास आहे.


पुन्हा वळूया - माझ्या शिक्षणाकडे


पप्पांना हातभार लागावा म्हणून दहावीपासूनच नोकरीं करावी असा विचार मनात असें, दहावीच्या सुट्टीत अकरावी ची फी भरायला पैसे साठावेत म्हणून दोन महिने आठशे रुपयाच्या पगारावर एका फॅनच्या कंपनीत काम केलं. आणि मग अकरावीला विक्रोळीला अस्मिता लेडीज कॉलेजला आर्ट्सला ऍडमिशन घेतले. कॉलेजचे दिवस छान होते. त्यावेळी मुलींना बसप्रवासासाठी कनसेशन असे, तिकीट फार कमी असें मुलींना अगदी भांडूप ते विक्रोळी दोन रुपये असें तिकीट असायचे.


बारावी पास झाल्यानंतर सुरु झाला आयुष्याचा प्रवास, पुढे शिकायचं तर कॉलेजची ऍडमिशन फी जास्त होती मग कसं शिकणार ह्या विचाराने कॉलेजचं नको ह्यावर मत पक्क झालं मग पुढे काय शिकायची प्रचंड जिद्द होती. कसे कसे सुट्टीत छोट्याशा एका साडीच्या दुकानात साड्या विकण्याचं काम करून दोन महिन्यात बाराशे रुपये जमवले आणि बाहेरून मुंबई युनिव्हर्सिटी मधून परीक्षा द्यायची फी तेराशे होती. फी पण कमी होती म्हणून मग म्हंटल चला नोकरीं करत परीक्षेला पण जाता येईल म्हणून मुंबई युनिव्हर्सिटीला तेरावीला ऍडमिशन घेतलं.


आणि मग सुरु झाली नोकरीसाठी शोधाशोध आणि मग एक महिन्याने वी टी ला एका कंपनीत लेखी काम, फॉर्म भरणे अशी अकराशे रुपयांची नोकरीं मिळाली. मग तिथे नंतर नंतर कॉम्पुटर चालवता येत नाही म्हणून अडचणी येऊ लागल्या आणि खरंच त्यावेळी कॉम्पुटर क्लास ची अडीज हजार फी सुद्धा भरणे मला कठीण वाटतं होते. मग काय करावे ह्या विचारात असताना एका मैत्रिणीने सांगितले अगं दादर - नायगावला एक क्लास आहे तिथे फ्री मध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चा सरकारतर्फे क्लास आहे. त्यासाठी तुला तुमच्या एरियाच्या वार्ड ऑफिसला जाऊन अर्ज करावा लागेल आणि आणखी एक तो क्लास सकाळी सात - ते नऊ असतो त्यामुळे तुला सकाळी भांडुप वरून साडे - पाचला घर सोडावं लागेल त्या नंतर तुझा दहाचाचा जॉब तुझी दगदग होईल....


पण मी म्हंटल चालेल अगं मी करेन.... मी दुस्र्या दिवशी भांडुप च्या वॉर्ड ऑफिसला गेले तिथे अर्ज केला आणि त्यांनी सांगितले तुमचा नंबर लागला की कळवू असं आणि अशाप्रकारे सहा महिन्यांनी माझा त्या क्लास मध्ये नंबर लागला.. एक वर्षाचा कोर्स होता मग सुरु झाला रोज सकाळी साडे - चार ला उठून साडे - पाचला घरातून निघण्याचा प्रवास. त्या नंतर क्लास संपला की तिथूनच डायरेक्ट दादर वरून व्ही टी ला ऑफिसला जायचे मी. ऑफिस दहा ते सहा असायचे.


मी युनिव्हर्सिटी मधून परीक्षा देत होते त्यामुळे घरी स्वतःचा अभ्यास स्वतःच पुस्तक वाचून करा हे नोकरीमुळे चौदावीला जड जावू लागले त्यातच एक मैत्रीण म्हणाली अगं ठाणेला केळकर कॉलेजला संध्याकाळी युनिव्हर्सिटी चे फ्री लेक्चर चालतात.


पण मग मनात म्हंटल सकाळी मी साडे - चार ला उठून तयारी करून साडे पाच ला घर सोडायचं ते डायरेक्ट रात्री साडे - नऊ ला घरी यायचं हे जमेल ना...पण जमवलं आणि तिथे ठाणेला जाऊन एका मैत्रिणीबरोबर केळकर कॉलेजला सांगून आले मी ऑफिस मधून सहाला सुटते तर लेक्चरला सात ला पोचेन ते शिक्षक हॊ म्हणाले... आणि मग मी ऑफिस सुटल्यावर लेक्चर ला जाऊ लागले पण मग असं होऊ लागलं की लेक्चर अर्धच मिळत असें मग अभ्यासच होतं नसे...


सकाळी साडे - पाच ला जी मी घर सोडत असें ती डायरेक्ट घरी रात्री - सकाळचा कॉम्पुटर चा क्लास, नोकरीं, संध्याकाळी लेक्चर असं सर्व करून रात्री नऊ वाजता घरी पोचत असें.. मग अभ्यास कसा होणार ह्या विचाराने त्यावेळी आमच्या एरिया मध्ये अभ्यासिका ( लायब्ररी ) होती ती जॉईन करायचं ठरवलं तिथे तेव्हा वर्षाचे अडीजशे रुपये फी भरून तुम्ही दिवसभरात केव्हाही जाऊन तुमचा अभ्यास करू शकता एक स्टडी टेबल आणि एक खुची असं असें तिथे, त्यावर तुम्ही कितीही वेळ सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करू शकता अशी सुविधा होती. ती अभ्यासिका मग मी अभ्यास करण्यासासाठी रात्री दहा ते साडे - अकरा अशी जॉइन केली.


आई - पप्पा बोलत असायचे अगं तू सकाळी साडे - पाच ला बाहेर पडतेस ती रात्री नऊ साडे नऊला येतेस आणि लगेचं जेवून अभ्यासिकेत जातेस किती ती दगदग करतेस तू.. आणि माझा बॉयफ्रेंड गुरुनाथ जो माझा आता नवरा आहे तो हि तेव्हा माझे कष्ट बघून म्हणायचा किती जिद्दी आहेस तू अभ्यासाच्या बाबतीत तर अशा ह्या माझ्या बॉयफ्रेंड ( गुरुनाथ ) बरोबर मी बारा वर्षाच्या आमच्या अफेअर नंतर लग्न केले आता आमच्या लग्नाला चौदा वर्ष झालीत आणि आम्हाला दोन ( देवश्री आणि अनुश्री ) नावाच्या गोड मुलीं आहेत. नवऱ्याबद्दल पुढे लिहिते हा...


त्या वेळेस मला रात्री बारा ते सकाळी चार एवढीच झोप मिळत असें. पण पर्याय चं नव्हता शिक्षण घेण्यासाठी नोकरीं करणं गरजेचं चं होतं. आणि मग एका वर्षाने कॉम्पुटर क्लास पूर्ण झाला. आणि मग मी नौकरी डॉट कॉम ह्या वेबसाईटवर नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज करू लागले. पण ह्या वेबसाईट चं एक असें त्यांच्या थ्रू तुम्हाला नोकरीं लागली की पहिला पगार त्यांना द्यावा लागत असें, काहीवेळी अर्धा पगार हि ते घेत असतं. पण तिथून मला नोकरीसाठी खूप कॉल्स येत असतं.


पंधरावी ची परीक्षा जवळ येत होती आणि मी इकडे तिकडे इंटरव्हिएव देत होते. आणि मग बऱ्याच ठिकाणी इंग्लिश नीट न बोलता येत असल्याने मी इंटरव्हियु मध्ये फेल होतं असें, खूप निराश होऊन मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करत असें. अजूनही मला पंधराशे चं पगार होता पण त्यात शिक्षण तरी होतं होतं. आणि मी त्यात समाधानी होते.


आणि मग असं करता करता पंधरावी ची परीक्षा मी फर्स्ट क्लासने अर्थशास्त्र हा स्पेशल विषय घेऊन पास झाले, घरी सगळे खूप खुश झाले. नोकरीं, क्लास, आणि अभ्यास हे सगळं वेळेच गणित नीट जुळत नसूनही मी चांगल्या मार्कांने पास झाले.


आमचं भांडुप स्टेशन ते घर असं पस्तीस मिनिटाच अंतर मी बसतिकीट चे पाच रुपये वाचावेत म्हणून रात्री नऊ वाजताहि स्टेशनवरून एकटी चालत येत असें त्यात बॅग खूप जड असें कॉम्पुटर क्लास ची पुस्तकं, पंधरावी च्या लेक्चर ची पुस्तकं असं सगळं धोपट पाठीवर असें त्यात घरी जाऊन जेवून लगेचं अभ्यासिकेत अभ्यासाला जात असें ती डायरेक्ट साडे - अकरा ला येत असें...सकाळी साडे पाचला मी घर सोडत असें. पण ह्या सगळयाचं चीज पंधरावी पास झाल्यावर मिळालं.


पप्पा तर खूप खुश झाले होते माझा रीझल्ट ऐकून. माझे पप्पा म्हणजे खूप सुंदर माणूस कधीच आम्हाला ओरडणं नाही मारणं नाही आई जरा कडक स्वभावाची आहे.


देवाच्या कृपेनें पंधरावी पास झाल्यावर नौकरी डॉट कॉम वरून चं एका चांगल्या कंपनी मध्ये जॉब मिळाला. पगार पाच चं हजार होता पण माझ्या दृष्टीने खूप होता. छोटंसं दहा चं माणसाचं ऑफिस होतं पण बॉस खूप चांगली होती खूप सपोर्टिव्ह होती. तिथल्याच एका वयोवृद्ध सरांनी मला एक दिवस म्हंटल मॅडम तुमचा कॉम्पुटरवर स्पीड खूप चांगला आहे, तुम्ही कॉम्पुटरमध्ये हुशार आहात तर तुम्ही इंग्लिश स्पीकिंग चा कोर्स कां करत नाहीत, इंग्लिश नसल्यामुळे तुम्ही मागे पडताय असं मला वाटतं. खरंच त्या जोशी सरांनी सुचवलं आणि मी तो कोर्स केला सहा महिन्याचा तो कोर्स होता. आणि आज मी त्यामुळेच माझ्या मुलीशी इंग्लिश मध्ये बोलू शकते, तो कोर्स खरंच टर्नींग पॉईंट ठरला. इंग्लिशबद्दल न्यूनगंड असणारी मी इंग्लिशमध्ये ई-मेल्स सुद्धा करू लागले. इंग्लिश मध्ये बोलायचा प्रयत्न करू लागले. आणि सगळे प्रयत्न सफळ झाले.


आणि लवकरच मी दादर ला सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ असणाऱ्या एका मोठ्या ऑफिसमध्ये कामाला लागले. पगार चांगला होता, पोस्ट चांगली होती. घरी आर्थिक गणित सुधारू लागलं होतं.


पण म्हणतात ना सगळं चांगल चाललं की काहीतरी विपरीत घडतंचं तसं माझ्या मोठ्या बहिणीचं मे महिन्यात लग्न करायचं असं ठरलं होतं आणि एप्रिल च्या दोन तारखेला माझे पप्पा हार्ट अटॅक येऊन वारले. पप्पा वारले तेव्हा छोटा भाऊ तेरावीला होता. ताई लग्न करून तिच्या सासरी जाणार होती आणि असं सगळं असताना पप्पांसारखा सतत घर आनंदि ठेवणारा माणूस अचानक सोडून जाणे काय होते हे आता मला शब्दात सांगता येणार नाही.


माझा पप्पांवर अतिशय जीव होता, पप्पा वारले तेव्हा ताई ऑफिस वरून आली नव्हती, भाऊ बाहेर मुलांबरोबर उभा होता आई किचन मध्ये भांडी घासत होती, किचन एकदम जवळ होतं आमचं घर चाळीत होतं दहा बाय बारा च्या खोलीत आमचं कुटुंब राहत होतं. पप्पा जेवले आणि बेडवर बसून टीव्ही बघत होते मी त्यांच्या थोडं बाजूला बसून हातांच्या बोटांना नेलपेंट लावत होते. ते कशे वारले मला समजले सुद्धा नाही. आई थोड्या वेळाने बाहेर आली आणि भावाने पप्पा थोड्या वेळापूर्वी त्याला बोलले होते की आज जरा जेवण जड झालं आहे म्हणून सोडा आणून दे त्याने तो दिला पप्पा तो पियाले आणि टीव्ही बघत बसले होते.


आई - पप्पांचं नात खूप छान असं होतं, त्या दोघांना मी कधीच भांडताना बघितलं नाही, त्यामुळे आई बाहेर येऊन पप्पाना हात लावून मस्करीत बोलली खानविलकर मला सोडा नाही ठेवलात आणि पप्पा बसलेले होते ते पटकन खाली कोसळले मी बाजूला असूनसुद्धा मला ते वारलेत हे समजले नाही एवढा मेजर अटॅक होता. आई जोराजोरात ओरडू लागली. सगळे जमा झाले. तो प्रसंग लिहिताना आता हि डोळ्यांत पाणी आहे.


मी माझ्या शिक्षणासाठी खूप धडपड केलेली बघून निदान छोट्या भावाने पंधरावी पर्यंत नियमित कॉलेज करून शिकावे असं पप्पांचं मत होतं पण पप्पा वारल्यावर भावाने घरची परिस्थिती अजून हालकीची झालेली बघून माझ्यासारखंच नोकरीं करून कमी वेळ सकाळी दोनचं तास कॉलेज करायचं ठरवलं, त्याने पण खूप कष्ट केले पहिली नोकरीं एका अकाउंट ऑफिस मध्ये हजार रुपयाच्या पगाराची केली आणि आज तोच माझा भाऊ खूप शिकून एका ऑफिस मध्ये खूप मोठ्या पोस्ट ला आहे. चाळीतून आईला एका मोठ्या बिल्डिंग मध्ये राहायला घेऊन गेला आहे..खूप कष्ट करून खूप खूप पुढे गेला आयुष्यात.


अजून बरंच आहे लिहिण्यासारखं पण पोस्ट खूप मोठी होईल म्हणून आता माझ्या लग्नाकडे येऊयात - माझा नवरा म्हणजे तेव्हाचा माझा बॉयफ्रेंड गुरु आमच्या लग्नाच्या दोन वर्ष आधी त्याच्या वडिलांच्या आग्रहा खातर त्याच्या गावी रत्नागिरीला - देवरुख या ठिकाणी नोकरीसाठी शिफ्ट झाला तो सेमी गव्हर्मेंट च्या इंजिनिरिंग कॉलेज मध्ये इथे जॉबला आहे.


त्यावेळी मी खरंच खूप अस्वस्थ झाले कारण मुंबई सोडून लग्नानंतर गावी राहणे मला जमणारच नव्हते, मी लग्नाआधी माझ्या गावी जास्तीत जास्त दोनदा चं दोन - तीन दिवसासाठी गेले होते त्यामुळे मुंबईच अतिप्रिय होती. त्यात मला नोकरीं चांगली लागली होती. पण कसं असतं ना एका मुलाबरोबर तुम्ही एवढे वर्ष नात्यात आहात आणि त्याच्या एका निर्णयाने त्याच्यापासून दूर होणे मला पटले नाही. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या दोन वर्षात तो दर महिन्यातून एकदा मला भेटायला येत असें.


माझ्या बॉयफ्रेंड ला माझं सतत सांगणं असायचं की आईकडचं सगळं स्थिर सावर झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही भावाला चांगली नोकरीं लागुदेत. वय पंचवीसच्या पुढे जात होतं पण तो माझ्यासाठी थांबायला तयार होता आणि थांबलाहि, त्याच्या घरातून लग्नाचं कोणी विचारलं की तो अजून वेळ आहे असं बोलत असें.


आणि मग कालांतराने भाऊ चांगला नोकरीला लागला आणि मग मला सत्तावीसवं वर्ष लागल्यावर मी त्याला बोलले तू घरी सांग तुझ्या आणि मग त्याने त्याच्या घरी सांगितल्यावर कोणीच काहीच आढे वेढे न घेता सगळे सरळ हॊ बोलले...माझ्या घरी आई नाराज होती लव्ह मॅरेज म्हणून पण नंतर निवळली आणि मग बारा वर्षांच्या अफेअर नंतर आमचं लग्न झालं. लग्न करून लग्नाच्या आठव्या दिवशी मी इथे गावी आले.


सुरवातीला अक्षरशः मुंबईची आठवण येऊन सतत रडायला यायचं, तसं आमचं घर देवरुख सिटी मध्ये आहे अगदी गावात नाही आहे त्यामुळे तेवढं ऍडजस्ट करणं तेव्हा कठीण गेलं नाही, तेव्हा गावचं जून घर असतं तसं आमचं घर होतं... आता आम्ही सात वर्षांपूर्वी तिथे मोठं घर बांधलं आहे..


इथे आल्यावर नोकरी ची सवय होती म्हणून मग घरी बसून कंटाळा येऊ लागला म्हणून मग एका क्लास मध्ये कॉम्पुटर टीचर म्हणून नोकरी केली, मग लग्नानंतर दोन वर्षांनी मुलीच्या डिलीव्हरीच्या वेळी ती नोकरी सोडली. मग मुलगी एक वर्षाची झाल्यावर मिस्टरांना म्हंटल मी पुढे शिकते आणि त्याने पटकन हॊ म्हंटल आणि मग पुन्हा युनिव्हर्सिटी च्या रत्नागिरीच्या सेंटर मधून एम - ए ला ऍडमिशन घेतलं, बाहेरून परीक्षा देण्यासाठी आणि मग एम - ए झाले.


छोटया एक वर्षांच्या मुलीला सांभाळून रात्र - दिवस अभ्यास केला आणि एम - ए ला पासष्ठ टक्के मिळवले. आणि मग नोकरी करावी असें वाटू लागले पण इथे कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विषयाच्या जागाच नव्हत्या म्हणून मग पुन्हा समाजशास्त्र मध्ये पुन्हा एम - ए केले, नवऱ्याची खूप साथ लाभली तेव्हा तो मुलीला अगदी मस्त सांभाळत असें, माझ्या पेपरच्या दिवशी तो सुट्टी घेऊन मुलीला सांभाळायला घरी राहत असें. आणि अशाप्रकारे मी लग्नानंतर डबल एम ए झाले.


पण मग मी नोकरी केली तर मुलीला कोण बघणार असा प्रशन उभा राहिला.पण योगायोगाने एक चांगल पाळणाघर मिळालं आणि मी तिथे मुलीला ठेवून एका इंग्लिश मेडीयम शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाले. तिथे बरीच वर्ष नोकरी केली. आणि मग दुसऱ्या डिलिव्हरीनंतर नोकरी सोडली.


आणि मग दुसऱ्या मुलीच्या डिलिव्हरी नंतर दोन वर्षाने वाता चा प्रचंड त्रास सुरु झाला, हात - पाय आखडू लागले, सांधे दुखू लागले. खूप डॉक्टर झाले पण गुण पडेचना. अजूनही थंडी किंवा वातावरणात गारवा आला की हा त्रास खूप होतो आहेचं. पण औषध चालू आहेतच. म्हणून मग पुन्हा नोकरी करणारच नाही असा विचार केला. आणि मग वाचनाची प्रचंड आवड म्हणून इरा, प्रतिलिपी सतत वाचायचे त्यातून चं आपण पण एखादी कथा लिहावी का या विचाराने इरा वर लिहू लागले आणि वाचकांचा छान रिस्पॉन्स बघता अजून लिहू लागले.


हळू हळू कथा खूप गाजु लागल्या एकदा तर लिहायला लागल्यानंतर आठ महिन्यांनी इरातर्फे एक इंटरव्यू पण झाला. खूप छान वाटू लागलं इराच्या संजना मॅडम चे तर आभार मानावेत तेवढे कमी आहेत त्यांनी मला अँप वर कुठलीही अडचण आली की लगेचं रिप्लाय देऊन मला प्रोत्साहित केलं... आणि मग मी लिहू लागले आणि हा लेखणाचा प्रवास वाढत गेला आणि ह्या प्रवासात मी खूप खुश आहे.

माझे पप्पा वारले तो दिवस आजही मला विसरता येत नाही आज माझ्या पप्पाना जाऊन अठरा वर्ष झाली तरीही मी कोणालाचं वारल्यानंतर हाक मारायला जात नाही कारण मला ते सगळं आजही आठवत आणि खूप रडू येत आणि अस्वस्थ व्हायला होतं आजही टी व्ही वर कोण वारल असल्याचा सिन असला तर मिस्टर लगेचं माझ्या मुलीला बोलतात चॅनेल बदल नाहीतर तुझी मम्मी रडायला लागेल.

एखाद्याचे जाणे कधीच विसरता येत नाही, आज माझे पप्पा असते ना तर माझ्या मुलींचे आजोबा म्हणून त्यांनी खूप लाड केले असते...त्यांना गाव खूप आवडायचं ते माझ्याकडे येऊन राहिले असते पण असो.... असं सगळं आहे...

कसं असतं ज्याला सगळंच खूप उशिराने किंवा अथक प्रयत्नाने मिळालेलं असतं ना ती व्यक्ती पुन्हा कधीच हट्ट करत नाही. ...... पण आता देवाच्या कृपेनें नवरा न सांगताच सगळं घेतो...

असं आहे माझं आयुष्य जे आहे त्यात मी सुखी समाधानी आहे. मी गावाला राहत असूनही आज माझ्या दोन्ही मुलीं सि बी एस सी बोर्डच्या इंटरनॅशनल शाळेत शिकत आहेत ह्याचा मला आनंद आहे..... मी आज नोकरी करत नसले तरी माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या मुलींना शिकवायला होतो आहेच की त्या खूप शिकल्या, मोठ्या स्थानावर गेल्या की मी सक्सेस झालेच की...

चला तर मग इथेच थांबते..सगळ्या वाचक वर्गाचे खूप खूप आभार आज तुमच्यामुळे चं मी इथे आहे....