Login

आत्मसन्मान

रेवती आणि तिच्या आईला लोक कमी समजून किती काय बोलतात. पण शेवटी रेवती आपल्या कामानी त्यांना त्यांची चूक दाखवते.
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )

शीर्षक : आत्मसन्मान

"रेवती, उद्या मोठे लोक येणार आहेत तुला बघायला. नीट तयार रहा. त्यांच्यासमोर जास्त बोलायचं नाही बरं का... त्यांनी जे विचारलं, तेवढंच उत्तर द्यायचं. मुलगी संस्कारी, शिस्तीत असावी, हेच महत्त्वाचं असतं." आई, म्हणजेच आशा रेवतीला समजावत होती.

रेवती मात्र थोडी गोंधळली आणि म्हणाली,
"आई; पण मी स्वतःबद्दल काही तरी बोलू शकते ना? मला वाचन, चित्रकला हे आवडतं. मी तसं सांगितलं तर..."

यावर आशा तिला मधेच थांबवत म्हणाली, "बाळा, ते मोठे लोक आहेत. त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच बघतात. जसं की मुलीला स्वयंपाक जमतो का, घर चालवता येतं का आणि बाहेर लोकांमध्ये कशी वागते. बाकीचं त्यांना काहीच पडलेलं नसतं."

तशी रेवतीच्या चेहऱ्यावर उदासी दाटून आलेली.

"म्हणजे आई, मला तिथे स्वतःची ओळख मांडायलाही जागा नाही?"

आशा हळूच म्हणाली, "बाळा, मला सगळं कळतंय; पण हेही खरं की असं घर तुला मिळणार नाही."

दुसऱ्या दिवशी दुपारी गेटमधून दोन मोठ्या गाड्या आल्या. त्यात मुलगा निहाल, त्याचे आई-बाबा आणि मोठी बहीण होती.

रेवती हॉलमध्ये आली. तिने साधीशी साडी नेसली होती. गळ्यात छोटीशी चैन आणि केस वेणी घालून बांधलेले.

निहालच्या बहिणीने विचारलं, "काय शिकली आहेस?"

"मी बी.ए. करत आहे, अजून शेवटचं वर्ष बाकी आहे."

"बरं स्वयंपाक जमतो ना?"

"हो, थोडंफार येतं." रेवती म्हणाली.

पुढे मुलाच्या आईने सांगितलं, "उभी रहा, थोडं चालून दाखव. गाणी म्हणता येतात का? येत असेल तर म्हणून दाखव."

या सगळ्या प्रकारामुळे रेवती मनातून त्रस्त झाली होती; पण आईकडे बघून तिने सर्वांना गाणंही गाऊन दाखवलं.

हे सगळं सुरू असताना मुलगा मात्र काहीच बोलला नाही.

त्या लोकांनी होकार दिला आणि म्हणाले की साखरपुडा दोन दिवसांत ठरवू.

आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि एकप्रकारचा दिलासा दिसत होता. रेवतीच्या मनात मात्र हजार प्रश्न होते; पण ती काही बोलली नाही. कारण तिने लहानपणापासून आईला संघर्ष करताना बघितला होता. बाबा गेल्यानंतर आईने शिवणकाम करून रेवतीचे शिक्षण आणि घर दोन्ही सांभाळून घेतले होते. आता ती इतकी खूश होती म्हणून रेवतीही गप्प राहिली.

दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी रेवतीला फोन आला.

"हॅलो, मी निहाल बोलतोय. तुला भेटायचं होतं. आपण कॅफेत भेटू शकतो का? मला जरा बोलायचं आहे."

रेवती हसली आणि स्वतःशीच म्हणाली, 'व्वा! हा मुलगा समजूतदार वाटतोय. कदाचित मला समजून घेईल, माझ्या आवडी पण जाणून घेईल.'


ती ठरल्यापेक्षा थोडं लवकर कॅफेत पोहोचली. आत गेल्यावर तिला तो दिसला; पण तो कोणाशीतरी फोनवर जोरजोरात हसत बोलत होता.

"अरे यार, मी तर परत परदेशात चाललोय. हो, इकडचं लग्न म्हणजे फक्त प्रॉपर्टी वाचवायला आहे. माझं खरं आयुष्य तर तिथे सेलिना सोबतच आहे..."

रेवतीचं हृदय हे ऐकून धडधडू लागलं. ती जवळ जाऊन उभी राहिली.

"हे खरं आहे का? तुझं परदेशात आधीच लग्न झालंय?"

तो अडखळला आणि कारणं द्यायला लागला; पण मग नंतर म्हणाला, "हो, हे खरं आहे. हे लग्न मला प्रॉपर्टीतून बेदखल होऊ नये म्हणून करायला लागतंय. तू जरा समजूतदार दिसतेस. म्हणून विचार केला..."

रेवतीच्या डोळ्यांतून अश्रू आले होते; पण आता बोलताना तिचा आवाज ठाम होता, "लाज वाटत नाही का तुला? एका मुलीचं आयुष्य असं खेळण्यासारखं समजतोस? मी इथेच हे नातं संपवते. मला नको असलं खोटं नातं!"

तसा तो चिडून म्हणाला, "नाटक नको करूस. श्रीमंती बघूनच तर तुम्ही होकार दिलात. मग आता का मागे हटतेस?"

रेवती म्हणाली, "श्रीमंती नाही... माणुसकी महत्त्वाची असते आणि तुझ्याकडे ती नाहीये."


घरी परतल्यावर तिने आईला सगळं सांगितलं.

आई थरथरली आणि कातर स्वरात म्हणाली,
"बाळा, माझी चूक झाली गं. मी विचार केला की त्या श्रीमंत घरात तू अगदी सुखात राहशील. म्हणून तुला गप्प राहायला सांगितलं होतं; पण आज खरंच मला जाणीव झाली की पैसा नाही, तर तुझं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे."

पुढे आईने तिचा हात धरला आणि म्हणाली, "आता तूच ठरव, तुला काय करायचं आहे."

रेवती म्हणाली, "मला आयएएस व्हायचं आहे आई. मला माझ्या मेहनतीने स्वतःचं जग बनवायचं आहे."

आई म्हणाली, "ठीक आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझं स्वप्न नक्की पूर्ण कर."

गावात लोक बोलत होते,
"लग्न मोडले, आता कोण करेल हिच्याशी लग्न?"

"खूप मोठमोठी स्वप्नं पाहत आहे."

पण रेवतीला या सगळ्याची काही पर्वा नव्हती. ती रोज अभ्यास करायची, मॉकटेस्ट द्यायची. ग्रंथालयात तासनतास बसायची. नोट्स तयार करायची.

वर्षभराने निकाल लागला आणि संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली,
"रेवती आयएएस झाली."

आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. गावातले लोकही आता अभिनंदन करायला लागले.

गावातले लोक भेटायला आले तेव्हा म्हणाले, "आम्हाला माफ कर बाळा. चुकलो आम्ही. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय."

रेवती हसून आत्मविश्वासाने म्हणाली, "कर्तृत्व हीच खरी ओळख असते आणि हे मला माझ्या आईनेच शिकवलंय."

आई हसत म्हणाली, "माझ्या सगळ्या कष्टांचा परिणाम आज मला दिसून येतोय. माझ्या कष्टाचं फळ मिळालं जणू मला... रेवती माझा खरा अभिमान आहे."

आई-मुलीच्या या नात्याने आत्मसन्मान आणि कर्तृत्वाची व्याख्या जणू सिद्ध केली होती.

समाप्त.
©® निकिता पाठक जोग
0