"शी …. बेवडा कुठला …. निट बघून चालता येत नाही का? डोळे फुटलेत की काय तुझे?"
तन्वी ऑफिस सुटल्यावर, बाजारातून भाजीपाला घेऊन घाईघाईने घरी जायला निघाली होती. तिला आधीच घरी जायला खूप उशीर झाला होता. त्यात त्याचा, तिला धक्का लागून, तिची भाजीपाल्याची पिशवी खाली पडली होती. तिने घेतलेली अर्धीआधिक भाजी, पिशवीतून बाहेर पडून, रस्त्यावर विखुरली गेली होती. म्हणून ती त्याच्यावर चांगलीच भडकली होती.
"ओ मॅडम, बेवडा कोणाला म्हणता तुम्ही? तुम्हीच येऊन मला धडकलात … वरून मलाच दिसत नाही म्हणता? तुम्हाला दिसत होते तर, तुम्ही का नाही बाजूला झालात?" भररस्त्यात झालेला अपमान सहन न होऊन तोही तिच्यावर भडकला होता.
त्याचा धक्का लागला होता तेव्हा, तिला त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या उग्र वासाचा दर्प जाणवला होता.
'बेवड्याच्या नादाला लागून काही फायदा नाही. उलट घरी जायला अजूनच उशीर होईल, नचिकेतची यायची वेळ झाली आहे. उगाच तो दरवाजाला कुलूप बघून वैतागेल.' असा विचार मनात येताच, त्याला उत्तर न देता, तिने रस्त्यावर सांडलेले टमाटे, बटाटे, वांगी एकेक गोळा करत पिशवीत टाकायला सुरुवात केली.
तिच्या पिशवीतल्या रस्त्यावर सांडलेल्या भाज्या, तिला उचलताना पाहून त्याला वाईट वाटले. तोही तिला मदत म्हणून, एकेक बटाटा, टमाटा गोळा करत, जवळ येऊन तिच्या पिशवीत टाकायला लागला. तसा तिने साडीचा पदर नाकातोडांला लावला.
" सॉरी, चुकून माझा धक्का लागला असेल तर " म्हणतं हातातला बटाटा पिशवीत टाकताना, त्याची नजर नेमकी तिच्या डोळ्यांकडे गेली आणि तो थबकला … " रेखा " … त्याच्या तोंडातून अस्पष्ट बाहेर पडले.
"रेखा" तो बोलल्याचे तिला जाणवले तसे तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. तिच्या काळजात काहीतरी चमकून गेल्याचा भास झाला.
ती त्याच्याकडे पहातच राहिली पण काही क्षणचं. ती तशीच पिशवी घेऊन उठली आणि घाईघाईत पुन्हा चालू लागली.
तिच्या हृदयाची गती एकाएकी वाढली होती. अचानक तिला अनामिक भीती जाणवू लागली होती. कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. पदराने ते पुसून ती स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच्याकडे न पाहता, झपाझप पावले टाकत ती घराच्या दिशेने चालू लागली.
सुदैवाने ती घरी वेळेच्या आत पोहचली होती. नचिकेत घरी यायला अजून दहा मिनिटे तरी अवकाश होता.
घरात शिरल्या शिरल्या तिने भाजीच्या पिशव्या किचनच्या ओट्यावर तशाच टाकल्या आणि फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली काढून गटागट पाणी प्यायली. पंख्याचा स्पीड वाढवून, ती सोफ्यावर बसली.
कोरड पडलेला घसा ओला झाल्याने तिला जरा बरे वाटले. तिच्या डोळ्याच्या पापण्या आपोआप मिटल्या गेल्या. वाढलेल्या श्वासाची गती हळूहळू कमी होत गेली.
काही वेळातच ती शांत झाली होती. ती अजूनही डोळे बंद करूनच बसून राहिली होती. आत बाहेर अंधार पडला होता. परंतु तिच्या बंद डोळ्यासमोर त्याचाचं चेहरा उभा राहिलेला लख्खपणे तिला दिसत होता. त्यासरशी मनानेही भूतकाळात मुसुंडी मारली होती.
' तो तोच होता … हो … नक्की तोच …. त्याला कशी विसरू शकते मी? .....
रंगाने काळा सावळा, जेमतेम सर्वसाधरण उंची, धारधार नाक, अभिताभ बच्चन सारखी केसांची स्टाईल, तेच ते धीर गंभीर, समोरच्यांच्या हृदयाचा ठाव घेणारे डोळे आणि कुणालाही प्रेमात पाडणारा भारदस्त आवाज … तो अमितच होता.
थोडासा सुटलेला वाटत होता. तेव्हाच्या आणि आत्ताच्या त्याच्यात, वाढलेले पोट आणि विरळ केस सोडता फारसा फरक पडलेला जाणवत नव्हता.’
तेवढ्यातल्या तेवढ्यात, तो अजून तिला विसरला नाही या जाणिवेने ती मनात खोल कुठेतरी सुखावलीही होती. त्याने, तिला इतक्या वर्षांनीही केवळ एका नजरेत ओळखल्याचे तिला खूप आश्चर्य वाटत होते.
' त्याने मला कसे काय ओळखले असेल? तेव्हाची मी चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ आणि आत्ताची मी बऱ्यापैकी स्थूल झालेली. तेव्हा ड्रेसमध्ये अन् आता साडीत. एवढा जमीन अस्मानाचा फरक असताना कसे काय त्याने मला लगेच ओळखले? तेही इतक्या वर्षांनी? अजूनही मी त्याच्या आठवणीत आहे?
परंतु इतक्या वर्षांनी तो, आज माझ्यासमोर कसा काय आला?
अन् तो ही अगदी माझ्या घराच्या काही अंतरावर? बापरे!
तो इथेच जवळपास रहात तर नसेल न? रहात असेल तर असा वरचेवर तो भेटत राहीलं.'
विचार मनात येताच तिच्या अंगाचा थरकाप उडाला.
' नसेल कदाचित … गेले सहा महिने मी इथे रहात आहे ….. तो इथे रहात असता तर, या आधी कधीतरी भेटला असता.' मनातून घाबरलेली ती मध्येच स्वतःची समजूत काढत होती.
' मग नक्की काय? काहीतरी कामानिमित्त इथे आला असावा का? ' स्वतःला पडलेले प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती.
आला असेल कोणत्याही निमित्ताने? मला काय त्याचे आता? त्याचा विचारही मनात आणायला नकोय … नचिकेतला त्याच्याविषयी कळले तर? … काय वाटेल त्याला? …. नकोच … विषाची परीक्षा घ्यायला नकोच. ... माझे सगळे चांगले चालले असताना …. उगाच त्याच्यामुळे माझ्या सुखी संसाराला तडा जायला नको.
सगळे चांगले चालले असताना? .... माझा सुखी संसार? .... ' स्वतःच्याच प्रश्नावर ती कुत्सिकपणे हसली.
' सुखी संसार .... ! खरचं आहे का तो? का मी सुखी म्हणून माझीच समजूत काढतेय .... केवळ दोघे एका छताखाली राहतो म्हणून? की तो मला इतर नवऱ्यासारखा मारहाण करत नाही म्हणून? की मला सासुसासरे, दिर, नणंद यांचा काहीच त्रास नाही म्हणून? की इतर मैत्रिणींच्या तुलनेत मी बऱ्यापैकी श्रीमंत आहे म्हणून? की एकुलत्या एका मुलाला ....
डिंग .. डाँग.. दरवाजाची बेल दोनदा वाजली तशी तन्वी तिच्या विचार शृंखलेतून बाहेर आली.
.
.
.
.
.
रस्त्यात अचानक भेटलेल्या अमितने, तिला नावासहीत ओळखल्याने, मनात कुठेतरी सुखावलेली तन्वी इतकी का घाबरली होती? पाहूया पुढच्या भागात ....
©® विद्या थोरात काळे "विजू"
==============================
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा