Login

आवड -निवड भाग 3 अंतिम

घर की नोकरी? निवडीची गोष्ट
सुनेसमोर कुठल्या तोंडाने कबूल करणार म्हणून आशा ताई हळूहळू घरच्या कामातून अंग काढून घेऊ लागल्या. दुर्लक्ष करू लागल्या. रात्रीचा स्वयंपाक उत्साहाने करणाऱ्या ताई आता सुनेची वाट बघू लागल्या.
'सून वेळेत येत नाही. मला कुठे बाहेर जायला मिळत नाही.' बहिणी जवळ अशा तक्रारी करू लागल्या.

"ही अजून कशी आली नाही?" म्हणून परागला रोज विचारू लागल्या. तिचा रागराग करू लागल्या. पण माझ्या हातून काही काम होत नाही हे वास्तव मान्य करायला त्यांचं मन अजूनही तयार नव्हतं. मी केलं तसं तिनेही करावं हा त्यांचा हट्ट अजूनही कायम होता.

सकाळी जाताना सगळं करून जायचं. कामावरून येऊन पुन्हा घरचं पाहायचं. आई घरचं काम सांभाळतील या सासू - सुनेत न बोलता झालेल्या अलिखित करारावर तिने नोकरी धरली होती. आता ताईंनी अचानक आपला पवित्रा बदलल्याने गौरीची चिडचिड होऊ लागली. घर आणि नोकरी याचा मेळ बसत नव्हता. नोकरी करणं हा तिचा मनापासून हट्ट कधीच नव्हता.
पण सासुबाईंचा मान राखावा किंवा त्यांचं मन दुखवायला नको म्हणून घेतलेला निर्णय टिकवून ठेवणं गौरीला जड जाऊ लागलं. आपल्या आईला आदर्श मानून ती इतके दिवस घर सांभाळत होती. पण आजच्या जगात हे दोन्हीही जमायलाच हवं, असा विचार तिच्या मनावर बिंबवल्याने ती ही संसाराची कसरत करत होती.

"आईंना मी आधीच म्हणाले होते, घर आणि नोकरी मला एकत्र जमणार नाही. घर सांभाळणं ही माझी आवड होती. त्यात मला समाधान मिळत होतं. या नोकरीत स्वतः ला सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरी मनापासून कामाचा आनंद मिळत नाही. फक्त पैसा हातात पडतो म्हणून काम करावं वाटतं. मनात संभ्रम असेल तर ना घरचं काम नीट होतं ना ऑफिसच्या कामात मन लागतं. मग काय खावा बॉसची बोलणी." गौरी परागला म्हणाली.

"गौरी, कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून आपण आपली आवड -निवड का बाजूला ठेवावी? घर की नोकरी? हा प्रश्न सर्वस्वी तुझा होता. तसं मी आईला बोललो देखील होतो. पण अचानक तू तुझा निर्णय जाहीर केलास. तेव्हाच मला शंका आली होती. पण तू खुश होतीस यातच मी आनंद मानला. आई आणि तू..तुम्हा दोघींत हवा तसा संवाद नाही त्यामुळे तुम्हा दोघींत थोडंसं अंतर आहे, असं मला वाटतं." पराग.

"खरं आहे. पण टाळी एका हाताने कशी वाजेल? मलाही वाटतं, आईंशी मनमोकळं बोलावं. त्यांच्याशी काही गोष्टी शेअर कराव्यात. पण त्या मला परकं समजून अंतर ठेऊन वागतात. मी या घरची एक महत्वाची व्यक्ती आहे असं मला कधीच जाणवलं नाही."

गौरी म्हणाली ते सगळं खरं होतं. या दोघींचं नातं सुधारण्यासाठी आपणही थोडे प्रयत्न करायला हवेत असं परागला मनापासून वाटलं. गौरीला घरच्या महत्त्वाच्या निर्णयात सहभागी करून घेण्याचा विचार त्याला बरा वाटला. सगळे निर्णय आई मलाच विचारून घेते..गौरीला काही हक्क आपणहून दिले तर आई सुद्धा तिचं मत विचारात घेईल आणि तिच्यावर कोणतेही निर्णय लादणार नाही.
"समोरच्या व्यक्तीचा मान ठेऊन तूही तुझी मतं ठामपणे, आत्मविश्वासाने मांडत जा. शेवटी हेही घर तुझंच आहे." पराग काहीसा विचार करून म्हणाला. बऱ्याच काळानंतर असा मनमोकळा संवाद नवरा- बायकोमध्ये झाला होता. दोघांची मनं मोकळी झाली.

गौरीलाही परागचं म्हणणं पटलं. आपल्याला आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडता यायला हवं. नाहीतर समोरची व्यक्ती गृहीत धरून मोकळी होते. तसंच आपणही समोरच्याला गृहीत धरून त्याकडून जास्त अपेक्षा करू नयेत.
महिन्याचा पगार झाल्यावर गौरीने आपला राजीनामा देऊ केला आणि घरी येऊन आशा ताईंपुढे ती व्यक्त झाली. आपल्याकडून घर आणि नोकरीचा ताळमेळ बसला नाही, हे तिने मनापासून मान्य केलं.

हे ऐकून आशा ताई नाराज झाल्या.
"तरुण पोरी तुम्ही. इतका मेळ बसत नाही म्हणजे काय?"

"आई, एकमेकांशी तुलना करून गोष्टी कधी साध्य होत नसतात. प्रत्येकाची क्षमता ठरलेली असते. तुम्हाला जे जमेल ते मला जमेल असं नाही आणि मी जे करेन तेच तुम्हाला जमायला हवं असंही नाही." गौरी सौम्य शब्दात म्हणाली.

पराग समोरच असल्याकारणाने आशा ताई फार काही बोलल्या नाहीत. पण आता घरची जबाबदारी अंगावर पडणार नाही या विचाराने त्यांना बरं वाटलं. 'नोकरी करताना आपण तरी घरची जबाबदारी कुठे घेत होतो? ऑफिसला जायचं म्हणून काम टाळत होतो की सासुबाई होत्या म्हणून नोकरी मिरवली आपण?

आपण आपली आवड जपली. तशीच गौरी तिची आवड जपत असेल. काहीही म्हणा, पण पोरीच्या हाताला चव आहे खरी! तशी आपल्या हाताला नाही, हेही तितकंच सत्य आहे.'
"असो, मी आधीच म्हणाले होते की गौरीवर कसलीही जबरदस्ती नाही. तिला जे हवं ते करू दे." आशा ताई म्हणाल्या.

हे ऐकून गौरीच्या डोक्यावरचं ओझं काहीसं उतरलं.' राहता राहिला प्रश्न नातं सुधारण्याचा. सुरुवात आपणच करू म्हणजे चार शब्द बोलल्यानंतर समोरची व्यक्ती एक तरी शब्द बोलेलंच ना? थोडा वेळ लागेल. पण याची दोघींना आपोआप सवय होऊन जाईल.' गौरीने मनाशी ठरवलं.
'आईंची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नाही. माझ्यासारखाच त्यांचाही स्वभाव वेगळा आहे हा विचार आपणही करायला हवा.'

आपल्याच विचारात गौरी स्वयंपाक घरात आली.' उद्यापासून घाई -गडबड नाही. रात्रीच्या जेवणाच्या तयारीचं टेन्शन नाही. ऑफिसच्या कामात चुका होणार नाहीत की बॉसची बोलणी म्हणून खावी लागणार नाहीत.'

"आज जेवायला काय करायचं?" गौरी मोठ्याने म्हणाली.

"जे तुझ्या आवडीचं असेल ते कर." काही मिनिट शांततेत गेल्यावर आशा ताईंचा आवाज आला आणि गौरीने हसत -हसत पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. आजपासून पुन्हा आपली आवड -निवड जपण्याची जबाबदारी सर्वस्वी तिच्यावरच होती ना!