Login

आवाज भाग-१

आवाजा मागचे कारण काय असू शकेल?
#जलदकथालेखनस्पर्धा

विषय: अकस्मात.
शीर्षक: आवाज भाग-१

"मला तर हे घर खूप आवडले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण आपले पेपर वर्क पूर्ण करूया." कैवल्य म्हणाला.

"ठीक आहे. उद्याच मी यासाठी कामाला लागतो." तो मध्यस्थी असणारा माणूस म्हणाला.

बाजूलाच असणाऱ्या अपार्टमेंटमधून काही डोकी डोकावत होती, परंतु तसे कैवल्यने त्यांच्याकडे बघितले तसे लगेच त्यांनी दरवाजे बंद केले.

' काही लोकं विचित्रच वाटतात.' तो आपल्या मनाशीच म्हणाला.

" हॅलो काव्या, इथले काम झाले आहे आणि लवकरच आपल्याला ह्या घराचा ताबा मिळणार आहे."  त्याने तिथूनच व्हिडिओ कॉल केला होता आणि तो आपल्या बायकोशी बोलत होता.

" पप्पा, कम फास्ट ." ईशा, त्याची पाच वर्षाची मुलगी  म्हणाली.

कैवल्यने एक नवीन घर खरेदी केले होते. त्यामुळे त्याला त्याच्या बजेटपेक्षा पण कमी किमतीमध्ये ते मिळाले तर तो खुश होता. आपल्या कुटुंबासोबत आपण इकडे राहणार म्हणून, त्याला खूप आनंद झाला होता.

लवकरच तो आपल्या परिवाराकडे जाण्यास निघाला.

कार चालवत असताना मस्तपैकी रेडिओवर गाणी लावून, आपला एकटेपणा दूर करत आपल्या बायको आणि मुलीकडे निघाला होता.

वाटेत फक्त चहा पिण्यासाठी तो थांबला होता, कारण लवकरच घरी जाण्याची त्याला जणू घाई लागली होती.

" मम्मा, तिथे नवीन घरामध्ये सर्व गोष्टी मला हव्या आहेत. तू तर सांगितलेलं होतं की मी आता झोपाळा आणि बिन बॅग सर्व तिथे घेऊ शकते. त्यामुळे तू विसरू नकोस." छोटी ईशा आपल्या इच्छा सांगत म्हणाली.

" एकदा पप्पा आले की, आपण सर्व गोष्टी घेऊया. तू जे आता सांगितलंस ते सुद्धा आपण एका लिस्टमध्ये ऍड करूया. ठीक आहे, बाळा."  काव्या आपल्या मुलीला म्हणाली.

कैवल्य कधी घरी येतोय याकडे दोघींचे डोळे लागले होते.

काव्याचा फोन वाजला आणि फोनवरचे बोलणे ऐकून तिच्या हातातून फोनच खाली पडला.

ईशा सुद्धा सोबतच होती. त्यामुळे ती लगेच आपल्या आईला बिलगुन काय झालं, म्हणून विचारत होती.

कसे तरी स्वतःला सांभाळत, आलेल्या फोनवर काव्याने पुन्हा फोन लावला आणि त्यांना पत्ता विचारून लगेच आपल्या मुलीला घेऊन ती तिथून बाहेर पडली.

काव्याकडे स्कुटी होती, परंतु अशा वेळेस ऐकलेली बातमी यामुळे काही व्हायला नको; म्हणून तिने कॅब बुक केली होती. कॅब येण्याच्या त्या वेळेपर्यंत सुद्धा तिचं चित्त थार्‍यावर नव्हते.

" मम्मा, काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस?" छोट्या मुलीने विचारले.

" बाळा, मी तुला एक सांगते ती गोष्ट ऐकशील?"  तिने ईशाच्या उंचीप्रमाणे खाली वाकून तिला विचारले.

" मी सर्व ऐकते. मी गुड गर्ल आहे ना." ती म्हणाली.

" मग आता आपण जिथे जाणार आहोत ना, तिथे गडबड गोंधळ आणि किंचाळायचे नाही. एकदम शांत राहायचे आणि मला काही सुद्धा प्रश्न विचारायचे नाहीत. ठीक आहे?"  तिने विचारले.

" हो, पण आपण कुठे जात आहोत ?" तरीसुद्धा तिच्या बालबुद्धीने विचारलेच.

" आताच मी सांगितलं ना, तू मला काही विचारायचं नाहीयेस आणि मी जिथे सांगेल तिथे शांतपणे फक्त बसून राहायचं. तिथे गेल्यावर मला थोडंसं काम आहे."  ती म्हणाली.

मग तिनेसुद्धा आपल्या आईला मानेने होकार दिला.

कॅब आल्यावर काव्याने लवकरात लवकर तिने सांगितलेल्या लोकेशनवर जायला सांगितले.

आपल्या आईची होणारी गडबड आणि तिच्या शरीराची होणारी थरथर ईशाला जाणवत होती, परंतु तिला जास्त प्रश्न विचारायचं नाही; ते आत्ताच सांगितल्यामुळे ती शांत बसली होती.

आपल्या मुलीचा हात घट्ट पकडून, ती मनातल्या मनात देवाचा धावा करत होती.

ऑनलाईन पेमेंट करून कॅबचे भाडे दिले आणि लगेच आपल्या मुलीचा हात पकडत ती घाईत पळायला लागली.

क्षणभर तर ती विसरूनच गेली होती की, तिच्या सोबत लहान मुलगी आहे, परंतु मध्येच तिच्या मुलीने हा झटकल्यावर तिच्या लक्षात आले.

क्रमशः

फोनवर असे काव्याने काय ऐकले होते?

© विद्या कुंभार.

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all