Login

आवाज.... भाग - २

तिला ऐकू येणाऱ्या आवाजाचे रहस्य
आवाज.... भाग - २


सिया पूर्ण रात्र झोपू शकली नाही. आरशात दिसलेला तो चेहरा, तो आवाज, तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता.
सकाळी ती उठली तेव्हा तिच्या मोबाईलमध्ये कालच्या रेकॉर्डिंगचा व्हिडिओ अजूनही होता.

हात थरथरत तिने तो प्ले केला. व्हिडिओत ती स्वतः आरशासमोर उभी होती. सुरुवातीला सगळं सामान्य होतं, पण काही सेकंदांनी स्क्रीनवर काळसर सावली दिसली.
ती सावली हळूहळू स्त्रीच्या रूपात बदलली आणि आवाज आला, “सिया… मला वाचव…”

सियाच्या अंगावर काटा आला. ती ताबडतोब अर्जुनकडे गेली आणि म्हणाली. “हे बघ, मी काही वेडी नाही! ती खरोखर होती!”

अर्जुनने व्हिडिओ पाहिला आणि थोडा गप्प झाला.
“हे… हे एडिटेड नाही दिसते,” तो म्हणाला.
“आपण काहीतरी करायला हवं,” सिया म्हणाली.
“पण कोणाला विचारायचं?”

त्याच वेळी तिला आठवलं — विजया काकू!
गावातल्या लोकांना त्या “भुतांची माणसं” वाटायच्या, पण त्या नेहमी म्हणायच्या की काही आत्मे अडकून राहतात.

सिया आणि अर्जुन संध्याकाळी काकूंच्या घरी गेले.
घर जुनं, धुळीचं, आणि मंद दिव्याच्या प्रकाशात विचित्र भासत होतं.
विजया काकू दारातच उभ्या होत्या, जणू त्यांना आधीच माहित होतं की कोण आलंय.

“सिया… तू अखेर आलीस,” तिला बघून काकू म्हणाल्या. ते ऐकून सिया चकित झाली.

“तुम्हाला माझं नाव कसं कळलं?” सियाने आश्चर्याने विचारलं. त्यावर काकू हसल्या.

“कारण ती तुला शोधत होती. ती आरशात आहे, बरोबर बोलतेय ना मी." काकू म्हणाल्या. ते ऐकून अर्जुन थक्क झाला.

“तुम्हाला कसं माहीत?” अर्जुनने विचारलं. तेव्हा काकूंचा चेहरा गंभीर झाला.

“तो आरसा साधा नाही. तीस वर्षांपूर्वी एका मुलीचा त्या खोलीत मृत्यू झाला होता. आणि तिचा आत्मा तिथल्या त्या आरशात कैद झाला...” विजया काकूंनी सांगितले.

सियाने घाबरून विचारलं “ती कोण होती?” त्यावर काकू हळू आवाजात म्हणाल्या,
“तिचं नाव होतं माया… आणि ती तुझ्यासारखीच दिसायची.” ते ऐकून सिया घाबरली आणि ती म्हणाली, “काय म्हणालात? माझ्यासारखी?”

“हो, सिया… आणि ती परत यायचा प्रयत्न करतेय.” काकू म्हणाल्या ते ऐकून सियाला धक्का बसला.

ती पुन्हा घरी आली त्याचवेळी खोलीतील दिवा अचानक लुकलुकला,आणि आरशातून पुन्हा तो आवाज आला,
“माझं अपूर्ण काम… पूर्ण कर सिया…” सियाच्या कानात फक्त तो आवाज घुमत राहिला.

त्या रात्री सियाला झोपच आली नाही. विजया काकूंनी सांगितलेलं एकेक वाक्य तिच्या मनात घुमत होतं,
“ती तुझ्यासारखीच दिसायची…”

“माझ्यासारखी म्हणजे नेमकं काय?” सिया विचार करत राहिली.
काकू काहीतरी लपवत होत्या, हे तिला जाणवलं.
सकाळी उठताच ती पुन्हा त्यांच्या घरी गेली.

दार उघडं होतं. घरात शांतता. काकू खुर्चीत बसलेल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यांत भीती होती.

“काकू, मला सगळं खरं ऐकायचं आहे,” सिया ठामपणे म्हणाली. त्यावर काकू तिच्याकडे एकटक बघत राहिल्या.