Login

आवाज.... भाग - ५

तिला ऐकू येणाऱ्या आवाजांचे रहस्य.
आवाज.... भाग - ५

आरशातून आत गेल्या क्षणी सियाला थंडगार झटका बसला.
तिच्या आजूबाजूला सगळं काही विचित्र होतं. ते जग अगदी तिच्या जगासारखं दिसत होतं, पण प्रत्येक गोष्ट थोडी उलटी, विकृत आणि शांत वाटत होती.

घरात मंद प्रकाश, भिंतींवर काळे डाग, आणि वातावरणात जळक्या धूपाचा वास येत होता. ती हळूच चालत पुढे गेली.
कोठेतरी लांबून एका मुलीच्या हसण्याचा आवाज येत होता. एका वेळी गोड तर दुसऱ्या वेळी भयानक वाटायचा.

“कोण आहे तिथं?” सियाने विचारलं. त्याक्षणी तो आवाज थांबला आणि एका क्षणात तिच्या समोर उभी राहिली ती म्हणजे माया.

ती अगदी सिया सारखीच दिसत होती, फक्त तिचे डोळे काळसर, आणि ओठांवर थंड स्मित होते.

“शेवटी तू आलीस." सियाला बघून माया म्हणाली.

“तुला काय हवं आहे माझ्याकडून?” सियाने विचारलं. तसं माया हसू लागली आणि परत गंभीर झाली.

“मी जे सुरू केलं ते तू पूर्ण कर. नाहीतर या आरशाच्या जगात तू कायमची कैद होशील.” माया म्हणाली. ते ऐकून सिया गोंधळली.

“काय सुरू केलंस तू?” सियाने विचारलं. तसं माया थोडी पुढे आली आणि बोलू लागली,
“ती हवेली… राणे वाडा… तिथे एक गुप्त प्रयोग झाला होता. मानवी आत्मा आणि आरशाच्या सावलीला जोडण्याचा.” ते ऐकून सिया थक्क झाली.

“कोणाचा प्रयोग?” सियाने घाबरतच विचारलं.

“माझ्या वडिलांचा आणि त्यांनी मलाच त्या प्रयोगाचा विषय म्हणून वापरलं.” माया म्हणाली.

“म्हणजे तू… तू मारली गेलीस?” सियाने विचारलं तेव्हा मायाच्या डोळ्यातून काळे अश्रू वाहू लागले.

“हो… पण मी अजून संपले नाही. माझा आत्मा या आरशात अडकला आहे, आता मला कोणीतरी हवं, जो हा प्रयोग पूर्ण करेल आणि मला मुक्त करेल.” माया म्हणाली तसं सिया घाबरून मागे सरकली.

“पण मी का?” सियाने विचारलं.

“कारण तू माझ्यासारखी आहेस… माझ्या रक्ताची.” माया म्हणाली.

“काय म्हणालीस तू?” सिया ओरडली. त्यावेळी माया पुढे येऊन तिच्या कानात कुजबुजली,
“मी तुझी सावली आहे सिया… तुझ्या आईची पहिली मुलगी मीच आहे.” हे ऐकून सिया स्तब्ध झाली. तिच्या श्वासाचा आवाजही हरवला. आरशाच्या भिंतींवर काळं धुरकट रक्त वाहू लागलं.

“आता तुला समजलं ना, तू इथे का आली आहेस?” माया म्हणाली.

आता सियाला समजलं होतं, ही लढाई भूतांविरुद्ध नाही,
तर स्वतःच्या भूतकाळाविरुद्ध आहे. ती तिथेच विचार करत राहिली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all